सनविवि ललित,साहित्योन्मेष भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे

भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे

—– सौ. उज्वला तायडे —–

 

           ज्या भाषेतून मुलाच्या भावनिक जाणिवा विकसित होत असतील, ज्या भाषेतून मूल पहिल्यांदा विचार करण्याच कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असत, ज्यातून आजुबाजुच्या परिसराच ज्ञान होत असत,ती त्याची प्रथमभाषा म्हणजे मातृभाषा असते.आजकाल मात्र परदेशी आणि मातृभाषा यांची सरमिसळ करून घराघरातून मुलांचा दोन्हीही भाषांमधून  भावनिक विकास होत असतो.

 

लहानपणी मुलांना घरातील सदस्य बोलायला शिकवतांना तिथे भाषेची शुचिता बघत नाहीत, तर त्याला समजेल अश्या भाषेतूनच मुलांशी संवाद साधत असतात.पुढे शाळेत गेल्यावर त्यात आणखी एक दोन भाषांची भर पडते.परस्परांशी संपर्क साधायला,संवाद साधायला एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरले जाते,त्यात हावभाव, कृती आणि ध्वनी चा समावेश असतो.

 

       आनंद, दुःख, वेदना व्यक्त करण्यासाठी जी भाषा लागते, ज्या भाषेतून मनुष्य प्रथमतः विचार करतो तीच त्याची मातृभाषा असते.शास्त्रीय दृष्टिकोनातून मूल जी भाषा प्रथमतः शिकते ती त्याची मातृभाषा.

 

आजची मुले मराठी बोलत नाहीत,मराठी संस्कृती लयाला चालली आहे या प्रकारचे निष्कर्ष काढले जातात.तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्यानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले त्याचे परिणाम त्या त्या राष्ट्रांतील भाषा आणि संस्कृतीवरही झाले आहेत, त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा पोत बदलतो आहे पण संवाद मात्र कायम आहेत.परदेशी कपड्यात वावरणारी, उत्तम इंग्रजी बोलणारी तरीही मोबाईल वर मराठी गाणी ऐकणारी आणि आपल्याला  त्यांच्या बोलीभाषेतील गाणी ऐकवणारी तरुण मुले बघितली की त्यांचं कौतुक वाटते. मराठीत ब्लॉगवर लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. आजच्या या ई मेल च्या जमान्यात.मुलांना  पत्रलेखन तर दूरच पण त्यांनी पत्र ही वस्तूच पाहिलेली नसते. ‘पोस्ट ऑफिस’अशी एक शासकीय संस्था असते हेदेखील त्यांना माहीत नसते.

 

भाषेचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा लहानपणी वाचलेल्या आहेत. त्यापैकी अकबर-बिरबलाच्या एका कथेमध्ये अकबर बिरबलाला एका  पंडितांची मातृभाषा ओळखायला सांगतो. त्या पंडितांची अनेक भाषांवर हुकूमत असते.

 

नेहमीप्रमाणे चतुर बिरबल एका रात्री त्या पंडितांच्या घरी जातो आणि गाढ निद्रिस्त झालेल्या पंडितला मारतो. अनपेक्षित माऱ्यामुळे जागा झालेला पंडित तेलगु भाषेत ओरडून अपशब्द वापरायला लागतो. त्यावरून बिरबल अकबराला सांगतो की पंडितांची मातृभाषा तेलगू आहे; कारण माणूस नेहमी आश्चर्यात, अपघातात सहजगत्या प्रतिक्रिया देतो, ती मातृभाषेतूनच.

 

भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते तर ती लोकजीवनाचा श्वास असते. जर आपले भाषाप्रेम ,साहित्यप्रेम ,वाचनप्रेम अन्य मार्गाने नव्या पद्धतीने व्यक्त होत असेल तर त्याचेही स्वागत करायला आपण शिकले पाहिजे.हातात पुस्तके घेवून वाचणाऱ्यांची संख्या भलेही कमी असेल परंतु ई बुक वाचणारेही आहेतच.

आसपास एवढे सारे बदल घडत असताना काळाची पावले ओळखून  बदलत्या काळात,तंत्रज्ञानाच्या युगात भाषेत बदल होणे साहजिकच आहे. तेव्हा भाषेची सरमिसळ करून जर संवाद साधला जात असेल तर त्यात काही वावग नाही.तंत्रज्ञानाच्या युगात भाषेत सरमिसळ होत आहे, पण संवाद थांबलेला नाही..संवाद साधण्यासाठी  भाषा नुसती ओठांतून येऊन उपयोगाचे नाही ती पोटातून यायला हवी. कोणतीही भाषा टिकवायची असेल तर त्या भाषेमध्ये बोलणाऱ्या भाषकांचे पोट भरण्याचे सामर्थ्य असले पाहिजे.एकदा मी बारावीत असताना सुटीच्या दिवशी पेपर घ्यायचे शिकवणी वर्गात. त्या दिवशी मुले पेपर द्यायला आलीच नाही. सरांनी विचारले मुल्लींना मुलं नाही आली म्हणून तेव्हा डोळे येण्याची साथ होती.एक हिंदी भाषिक मैत्रिणीने उत्तर दिले सर सब लडकोके डोले आ गये,डोळे येण्याचा हिंदीत पर्यायी शब्द तिला येत नव्हता.हा झाला विनोदाचा भाग भाषेची सरमिसळ झाली पण संवाद साधल्या गेला.

 

मुलांमध्ये भाषेचे प्रेम निर्माण करण्यात जशी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे तशी पालकांची सुद्धा आहे.अलीकडे साहित्याच्या श्रवणातून वाचनाचा प्रवास थांबला आहे. शिक्षक आणि वडीलधारी माणसे वाचताना दिसली, तरचमुले वाचनासाठी प्रवृत्त होणार आहेत.वडीलधाऱ्या व्यक्तींना भाषेविषयी आस्था, प्रेम, आणि जिव्हाळा वाटला तरच तो मुलांनाही वाटेल.इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विदयार्थी, शिक्षक संवाद कमी साधला जातो. कारण काय तर परकीय भाषा बोलण्याचा अट्टहास. ज्याला आतून काही सांगायचे असते त्याचे व्यक्तिमत्त्व प्रवाही असते उत्सुक झऱ्यासारखे.अशावेळी जर अमुक अमुक भाषाच बोलण्याचा अट्टहास असेल तर तो समोरचा प्रवाहासारखा चैतन्यमय आहे, की प्रवाह हरवलेल्या आणि काठ घट्ट झालेल्या डबक्यासारखा आहे हे कळते.

 

कृष्णदेवरायाच्या दरबारातील एक  तेनालीरामची कथा आहे. कृष्णदेवरायाच्या दरबारात पंधरा भाषा अवगत असलेला एक पाहुणा पंडित येतो.कृष्ण देवरायच्या दरबारातील सर्व पंडित त्या पाहुण्या पंडितांची पंधरा भाषांतील वक्तव्ये ऐकून त्याची मातृभाषा ओळखण्याचे आव्हान पेलण्यास असमर्थ ठरतात. अपवाद फक्त तेनालीरामचा तेनालीराम कृष्ण देवरायकडे एका दिवसाची मुदत मागतो.दुसऱ्या दिवशी 

 

तेनालीराम,कृष्णदेवराय आणि पाहुणा पंडित एकत्र दिवसभर बाजारात फिरतात.तरिही त्याला पंडिताची मातृभाषा ओळखायला आली नव्हती. शेवटी थकूनभागून सर्वजण एका पारावर बसतात. तेनालीराम हळूच पंडिताच्या तळपायाला काट्याने जोरात टोचतो. अर्थातच पंडिताच्या मुखातून झालेली वेदना गुजराती भाषेतून बाहेर पडते. पुढचे काही सांगायला नको.

 

जेव्हा परदेशात आपली मराठी मुलं तेथील विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जातात तेव्हा व्यवहाराची भाषा म्हणून ते इंग्रजीत बोलतात ;पण चार मराठी मुलं एकत्र येतात तेव्हा ते मराठीतच संवाद साधतात.

 

भाषा शिकवण्याला आता यांत्रिक साधनं उपलब्ध झाली. ध्वनिमुद्रिकांमुळे एकच धडा पुनःपुन्हा ऐकून उच्चाराचं अनुकरण अधिकाधिक निर्दोष होऊ लागलं. ध्वनिफिती, ध्वनिशाळा इ. आधुनिक साधनांचा प्रसार झाल्याने भाषा शिकणं सोपं झालं.एकूणच काय तर सुसंवाद साधने महत्वाचे.

 

      माझ्या मते भाषेच्या शुचिता पेक्षा संवाद साधणे महत्वाचे.

 

@सौ. उज्वला तायडे, अकोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *