सनविवि श्रध्दांजली श्रद्धांजली

श्रद्धांजली

— डॉ. सुरेश देशपांडे. बंगलोर —

 ६ फेब्रुवारी२०२२ रोजीं, ज्यांना लाखो लोक प्रेमाने दिदी म्हणतात, त्या लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्या निमित्ताने अनेक जणांनी मला माझे विचार व्यक्त करण्याची विनंती केली. अनेक मान्यवरांनी, नामवंत कलाकारांनी यावर लिहिले आहे. आपले मनोगत व्यक्त केले आहे.

तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचे तर या विषयी बोलताना ” काय म्या पामरे बोलावी उत्तरे ” अशी मनःस्थिती होते. पण ज्ञानोबा माऊलींनी आपली सोय केली आहे.

” राजहंसाचे चालणे । भूतळी जातिया शहाणे ।

  आणिक काय कोणे । चालावेचिना ।। ज्ञा.- ७७ – १७१३

मास्टर दिनानाथांची ही  कन्या, असा काही कोकिळकंठ घेऊन जन्माला आली की त्याबद्दलचे वर्णन करताना एक संस्कृतवचन आठवते. ” न प्रभा तरलं ज्योतिः उदेति वसुधा-तलम् ।।” अशी अलौकिक प्रभा तरल ज्योत भगवंताकडून घेऊनच काही माणसे जन्माला येतात.

असंख्य चाहत्यांना आपल्या मधुर स्वरांचा स्वर्गीय आनंद देणाऱ्या लतादिदी. म्हणजे ” आनंदे भरीन तिन्ही लोक ” याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. लहानपणी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या कोकिळकंठी लतादिदींनी असा काही दैवी चमत्कार केला की, असंख्य चाहते त्यांच्या स्वरातील माधुर्यावर भाळून गेले. आकंठ आनंदात बुडाले —– ” आनंदाचे डोही आनंद तरंग ” असा  अनुभव त्यांनी घेतला. स्वतः भारताचे प्रधानमंत्री त्यांना फोन करतात, आशीर्वाद मागतात आणि त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहतात.

आपण मराठी भाषिक, अमृतातेही पैजा जिंके अशी आपली मराठी मायबोली. आपल्यासाठी तर दुप्पट फायदा आहे. आपण भारतरत्न लतादिदींची मराठी भावगीते, संतांचे अभंग यांचा आनंद तर घेतोच त्या शिवाय त्यांनी गायिलेल्या एकापेक्षा एक सुमधुर बॉलीवूडच्या हिंदी गाण्यांचा पण आनंद घेऊ शकतो.

लतादिदींची अत्यंत भावमधुर गाणी ऐकत ऐकत त्यांचा रसास्वाद घेत घेत आपण मोठे झालो. त्यांचे अमर पसायदान कितीदा ऐकले. माऊलींचे पसायदान आणि त्यांचा कोकिळकंठ यांच्या मधुर मिलाफाने आपण तृप्त झालो. धन्योहं धन्योहं असे वारंवार वाटले. पांडुरंगानेच भूतलावर पाठवलेली लतादिदी पांडुरंगाच्या चरणीच विलीन झाली.

माझी एक इच्छा आहे, आणि लतादिदींचे असंख्य चाहते त्याकरता सहकार्य देऊन ती पूर्ण करतील असा विश्र्वासही आहे. Hologram Technology आणि आधुनिक तंत्रचा उपयोग करून नेवासे येथील ” पैस “खांब मंदिरात — जेथे साक्षात माऊलींच्या मुखातून पसायदान बाहेर पडले त्या ठिकाणी लतादिदींची थ्रीडी इमेज पसायदान गात आहे अशी  virtual reality निर्माण करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *