सनविवि साहित्योन्मेष नवे किरण नवी सुरूवात

नवे किरण नवी सुरूवात

--अंजली संगवई--

Hii आई

हो, पुन्हा एकदा पत्र! माझी पत्र लिहायची सवय  तुला तर माहितीच आहे. काहीतरी वेगळे मनात आले की हा सारा खटाटोप.  

लिखाण हा माझा आवडीचा छंद. याच छंदामुळे माझे जगणे खूप सुसह्य झाले. तू नेहमीच माझ्या लिखाणाला खत पाणी देऊन फुलवले. मी काही वेगळे लिहीले की तुला खूप आनंद होतो. मला आठतय मी पहिल्यांदा चार ओळी लिहिल्या, तेव्हा मी सहा-सात वर्षाचा असेल ना ग?!!

तू किती खूष झाली होतीस.

खूपच साध्याश्या ओळी होत्या ग!!

| किलबिल करती पक्षी सारे|

| दाणे भरवीते चोचीने |

| चिमणी आनंदाने बघते |

| पिल्लांचे ते पंख पसरणे |

(आजही तुला हया तोंडपाठ असतील.)

हे वाचतांना तुझ्या चेऱ्यावरील तो आनंद आजही मला आठवतो. सगळ्यांना तू किती कौतुकाने सांगत होतीस असो…

आयुष्य जेवढे मिळाले तेवढे परिपूर्ण जगावे असे तुझे तत्व !

मला जेव्हा समजायला लागले तेंव्हा तूझ्या या वाक्याचा अर्थ कळला आणि माझ्या बाबतीत त्याचा संदर्भ लागला.

तू खूप स्ट्राँग आहेस हा माझा समज आधीही होता आणि तसा तो नेहमीच राहील. मी तुझे आणि मावशीचे फोन वरचे बोलणें ऐकले नसते तर मला तुझा हा भावनीक पैलू लक्षातच आला नसता. तसे या गोष्टीने माझे मत बदलले नाही, आई तू स्ट्राँग आहेसच.

“आता खूप भीती वाटते ग, मन कातर कातर होत आहे ग” 

हे तुझे वाक्य ऐकले आणि मला त्यावेळी तुझ्यातील फक्त आईच दिसली.

इतके दिवस तू माझी मैत्रीण, मित्र, फिलॉसॉफर, टीचर आणि सगळयात महत्वाचे म्हणजे कौन्सिलर होतीस.

या भुमिका तू बखुबीने पार पाडल्या.

नकळत्या वयात तुला माझ्या आजाराबद्दल मला सांगावे लागले. इतर मुलांसारखा मी खूप खेळू बागडू शकत नव्हतो. खूप हिरमुसायचो तेव्हा एक दिवस तू मला सांगीतले.  तेव्हा कितपत कळले माहीत नाही पण आपण सामान्य नाही हे मात्र कळले. महिन्यातून काही दिवस शाळेत जायला मिळायचे आणि काही दिवस  हॉस्पीटल मध्ये ठरलेले, याची सवय झाली होती. त्याचे कधी काही वाटलेच नाही. बेड वर पडून पडून नेहमी काहीतरी नवीन सुचायचे लिहायला. आजी म्हणायची हा वारसा मला तुझ्या कडूनच मिळाला,  पण मला कधी तू लिहितांना दिसलीच नाही. कदाचीत माझ्या साठी तू तुझे सारे छंदच बदलवले…..

तसेही तुला सारखं माझ्या दिमतीला उभे राहावे लागत. माझ्या सगळ्या औषधांच्या वेळा, खाण्याच्या वेळा पथ्य पाणी हॉस्पिटलच्या खेटा यात तू पूर्ती गुंतली आहे. तूझी आवडती शिक्षिकेची नोकरी देखील माझ्यासाठी सोडून दिली. माझ्या आजाराबद्दल सखोल अभ्यास करून त्यात काही नवीन उपचार उपलब्ध झाले आहे का? माझ्यासाठी काय चांगले, काय लाभदायी याची सतत  माहिती गोळा करणे हा तुझा एक छंद होऊन बसला आहे.

बाबांची बदली झाली, खूप प्रयत्न करूनही बदली थांबवता आली नाही तेंव्हा बाबांना देखील तूच धीर दिला. माझ्या उपचाराचे गणित इथल्या हॉस्पीटलशी जमले असल्या कारणाने तू आणि मी इथेच थांबलो. बाबा दर आठ दिवसात यायचे. असे त्यांचे येणे जाणे दीड वर्ष चालले. पण तेव्हा देखील तू स्वतःला, मला आणि बाबांना कधीचं जाणवू दिले नाही सारे एकटीला करावे लागते म्हणून. 

 तू खरोखर सर्वाथाने खूप खंबीर, धीराची आहेस. मला नेहमी असेच व्हायला आवडेल. मी पण नेहमी या प्रयत्नात असतो की तूझ्या सारखे स्ट्राँग व्हावे. तसे दर वेळी blood transfusion करताना इतक्या सुया हातात घालतांना देखील शांत राहण्याचा प्रयत्न करतो. आता त्याची पण सवय झाली. तूझ्या कडे बघितले की नेहमी एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ती मला नेहमीच हवी असते. कधी-कधी माझी देखील चीड-चीड होते तेव्हा तू मला तितक्याच खुबीने शांत करते. 

आई, मला पुढला जन्म तूझ्या सोबतच हवा पण तेव्हा मात्र मी तूझी आई  आणि तू माझा मुलगा!  तूझ्या सारखी आई व्हायला मला खूप आवडेल..

 मी जेव्हा देवाशी बोलतो तेव्हा त्याला हे नेहमी आवर्जून सांगत असतो…

 मला वाटत आई व्हायला देवाची कणभर जास्त कृपा असावी लागते.

आपण  माझ्या वाढदिवसाला बालआधार आश्रमात जातो तेव्हा त्या मुलांमध्ये आपण किती रमतो. किती निरागस मुले आहेत ती. या  सतराव्या वाढदिवसाला तब्येतीमुळे नाही गेलो पण तू दर वेळीसारखा खाऊ आणि भेटवस्तू मात्र पाठविल्या…

परवा डॉक्टर अंकल सोबत तुझे काय बोलणें झाले माहीत नाही, पण यावेळी blood transfusion झाल्यावर डॉक्टर अंकल चा चेहरा बदलेला दिसला. त्यानंतर तुझे गळलेले अवसान बघीतले.

तुझे आणि बाबांचे उतरलेले चेहरे पाहून मला काय तो अंदाज आला.

 हे होणार होतेच ना ग! जरी कोण कधी एक्झीट घेईल हे त्याच्या हातात नसते तरी पण माझ्या बाबतीत त्याचा कालावधी अंदाजे डॉक्टरांनी आधीच सांगितला होता. तुला मात्र कुठल्यातरी चमत्काराची आशा होती. तुझे तसे प्रयत्न दिसत होते, मलाच नाही सगळयांनाच.

जरी आयुष्य छोटे असेल तरी ते कसे भरभरून जगावे त्याच्याच हातात असत, याची अनुभूती तू मला, माझ्या जगण्यात करून दिली. म्हणूनच मला दुखणे कधी गोंजारायला जमलेच नाही. मी म्हणेन की इथे तू मला खूप समृद्ध केले. 

आता बहुधा माझी एक्झीट घ्यायची वेळ जवळ आली आहे. 

म्हणून तुला हे पत्र लिहायला घेतले.

मी गेल्यावर दुःखी होऊ नको असेही नाही सांगणार…

मात्र तू एक नवीन विश्वात प्रवेश घ्यावा असे मला वाटत. 

यावेळी आश्रमातून आलेले आभार पत्र वाचतांना त्यांनी केलेले आव्हान वाचले, स्वयंसेवी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा आणि असे बरेच काही. 

मला तिथे एक नवा किरण दिसतोय तुझ्यासाठी. तू हाडाची शिक्षिका आहेसच, तर आता आश्रमात तू त्या मुलांना तुझा वेळ, तूझी शिकवण, तूझी जगण्याची कसब हे सारं देऊ शकते, किंबहुना तू ते करशीलच ही खात्री वाटते.

कुणाच्याही एक्झीट मुळे थांबायचे नाही, नवीन काहीतरी एंटर होणार आणि ती होऊ द्यायची एवढेच आपल्या हातात आहे. आश्रमात आणि तेथील सगळ्या चिमुकल्यांची तूझ्या जीवनात एन्ट्री होईल असे वाटते. आता इथेच थांबतो.

                      तुझा

                       श्रीरंग…..

रमाने परत एकदा ते पत्र वाचले होते. गेल्या आठ दिवसात कितीतरी वेळा वाचले होते. संपूर्ण आठवडा पावसांच्या सरी आणि रमाचे डोळे अविरत बरसत होते. 

आज मात्र पावसानी विश्रांती घेतली आणि सूर्य किरणांचे आज छान आगमन झाले. एक वेगळा उत्साह वातावरणात आला. सूर्याची कोवळे किरणे बघून  पत्रातील श्रीरंगच्या ओळी  आठवल्या . एक दीर्घ सुस्कारा सोडून  एका नव्या ऊर्जेने ती उठली. ड्रॉवर मधील आश्रमा तून आलेले पत्र बघीतले आणि  आश्रमाचा नंबर डायल करायला घेतला…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *