संवाद

— स्मिता बर्वे, टीम सनविवि —

महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या सर्व सभासदांना, चोखंदळ वाचकांना आणि जाहिरातदारांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

निसर्ग जसा नवा साज लेवून नवीन वर्षाच्या स्वागताला सज्ज झाला आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र मंडळही नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. ते कार्यक्रम नेमके कोणते ह्याची उत्सुकता जरा ताणून धरते, तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाविषयी. 

६ मार्चला महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू नॉर्थतर्फे 

“शनिवारवाड्यातील अस्वस्थ हुंकार” हा आगळावेगळा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून सादर झाला. त्याचा सविस्तर वृतांत मासिकात आहेच.

१२ मार्चला “वसंतोत्सव” हा राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम चौडय्या मेमोरियल हॉल मध्ये सादर झाला. सुमधुर गीतांनी कान आणि स्वादिष्ट, चटकदार पदार्थांमुळे जिव्हा तृप्त झाली. “मी वसंतराव” ह्या आगामी चित्रपटाची झलकही पाहिला मिळाली. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूने ‘काटदरे मसाले’ च्या संचालिका सौ. शैलजा काटदरे यांची मुलाखत फेसबुकच्या माध्यमातून १३ मार्च रोजी प्रसारित केली. त्याचा वृतांत आपण जरूर वाचा. 

ऑनलाइन ऑफलाईन असे कार्यक्रम सुरू असतानाच 

नवीन वर्षाची चाहूल लागली आणि महाराष्ट्र मंडळाचे महत्त्वाचे दोन पुरस्कार .. अभिमान आणि योगदान कुणाला मिळणार ह्याची उत्सुकता सभासदांना वाटू लागली. सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे स्थापनादिनी सत्यनारायणाची पूजा होणार आहे आणि १० एप्रिल २०२२ रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ह्यावर्षीचे अभिमान पुरस्काराचे मानकरी आहेत उद्योगपती विक्रम किर्लोस्कर आणि योगदान पुरस्काराच्या मानकरी आहेत पद्मा टोळ.

२३ एप्रिल २०२२ रोजी ‘नवा शुक्रतारा’ हा अरुण दाते यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम मंडळाच्या सभागृहात होणार आहे. सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे.

जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली साहित्योन्मेष स्पर्धेतील स्पर्धकांची स्पर्धा वसंत ऋतुप्रमाणे भरली आहे. ह्या महिन्यापासून विषयांनुरूप लेखन करायचे आहे. एप्रिलचा विषय आहे – कथापूर्ती. तब्बल वीस कथा आपल्याला वाचायला मिळतील. पण नुसते वाचून थांबू नका, तर अभिप्राय मेल करून प्रोत्साहन सुद्धा द्या. एप्रिलचा हा e सनविवि वासंतिक विशेषांकच आहे. 

१ मे महाराष्ट्र दिन, वर्षा सहल असे अनेक कार्यक्रम विचाराधीन आहेत, त्याबद्दलची माहिती लवकरच. 

पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *