सनविवि ललित,साहित्योन्मेष सुट्टीचे आत्मवृत्त

सुट्टीचे आत्मवृत्त

सुट्टीचं मनोगत

अजिता पणशीकर

“तथास्तु”, ब्रह्माने पंचमहाभूतांना आशीर्वाद दिला आणि माझा जन्म झाला! बुचकळ्यात पडलात नं? त्याचं असं झालं की आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी ह्यांना सतत वाटे की आपण आहोत खरे निसर्गाचे प्रतीक, पण माणसाला आमचं रूप सहज अनुभवायला कसं मिळेल? त्यातून त्याला नेहेमी आनंद कसा लुटता येईल? आम्हाला त्याच्या दैनंदिन आयुष्यात कसं सामावून घेता येईल? आणि अचानक एक दिवस ‘सुट्टी’ ही  कल्पना सुचली. पाण्यासारखी वाहती, आकाशासारखी व्यापक, अग्नीसारखी उर्जिता, वाऱ्यासारखी स्वछंदी आणि धरतीसारखी निश्चिन्त अशी एक युवती लोकांना भेटली, तर काय मजा येईल! तिचं वय २७-२८ असावं, म्हणजे फार लहानही नाही आणि फार पोक्तही नाही. सगळ्यांत रमणारी, मनमिळाऊ, आकर्षक आणि उत्साही असावी. ब्रह्मदेवाने नुसतं तथास्तुच नाही म्हंटलं, तर त्याला ती कल्पना एवढी आवडली की त्याने लगेच मला (म्हणजेच ‘सुट्टी’ला) घडवून भूतलावर पाठवून देखील दिलं!

तर अशी माझी कहाणी… मी पृथ्वीवर आले तेव्हा अगदी भांबावून गेले. अहो, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’! ह्या म्हणीचा अर्थ मला विचारा…..सतत मला त्याचा प्रत्यय येत होता आणि अजूनही येतच आहे!  ‘सुट्टी’ पडले नं मी! माझी पहिली ओळख मुलांना झुक-झुक अगीनगाडीत बसून, मामाच्या गावाला जाण्यासाठी होते. किती गमतीचे, निरागस दिवस असतात ते! पण मोठं झाल्यावरही प्रत्येकाचा माझ्यावर तितकाच हक्क असल्याने जो तो माझा उपयोग स्वतःच्या मनाला येईल तसा, झेपेल तसा, आणि मुख्य म्हणजे, मूड असेल तस्सा करून घेतो! माझ्याबरोबरचा वेळ संपणार ह्या कल्पनेनें लोकं जेव्हा थोडी उदास होतात नं, तेव्हा माझ्या मनाला गुदगुल्या होतात. दुसऱ्याच्या दुःखाने खुश होऊ नये म्हणतात….पण खोटं कशाला सांगू? माझ्या सर्वांगावरून अलगद एखादं मोरपीस फिरल्यासारखं वाटतं, आणि मग पुन्हा लवकरच त्यांना भेटावं असं वाटू लागतं.

“अरेच्या, ह्या सुट्टीला मन आहे?” असा विचार आला नं डोक्यात तुमच्या? अहो, मी पण तुमच्यासारखीच आहे, फक्त चिरतारुण्य घेऊन आले आहे, तेही खास तुमच्यासाठी ! त्यामुळेच मी येते, मी जाते, अगदी संपते सुद्धा! पण पुन्हा हजर होते खास तुमच्या दिमतीला. येतांना नेहेमीच हसत, खेळत येते आणि मग मात्र स्वतःला पूर्णपणे तुमच्या हवाली करते. अगदी अल्लादिनच्या जादूच्या दिव्यातील प्रेमळ जिनीसारखंच! तुम्ही सांगाल ते करायला ताबडतोब तय्यार! तुम्ही सर्व प्लॅन एकट्याने ठरवत असाल तर ठीक आहे, पण जर जोडीला अजून लोकं असतील तर प्रत्येकाला नेमकं वेगवेगळंच करायचं असतं. मग मात्र माझी अगदी तारेवरची कसरत होते.    

आता परवाचीच गोष्ट घ्या ना. दोघे चांगले मित्र आणि त्यांच्या बायका असा ग्रुप होता. एका मित्राला मनापासून साहसी ऍक्टिव्हिटीस मध्ये रस तर दुसऱ्याला निसर्गाचं सौंदर्य बघायचं वेड. पण एकत्र गेल्याने आता कुणाच्या आवडीचे कार्यक्रम ठरवायचे – माउंटन बाइकिंग करायचं की डोंगरातील विविध गुहा पहायच्या – हा मोठा गहन चर्चेचा विषय झाला. बरं, त्यातून प्रत्येकाला वाटे की दुसऱ्याने त्याचं ऐकावं. चार दिवसांपैकी दोन संध्याकाळ ह्याच वादात, चर्चेत गेल्या. माझा जीव वरखाली होत होता; माझी जाण्याची वेळ जवळ येत चालली आणि निर्णय होईना. मी माझ्याबरोबर आनंद घेऊन येते खरी, पण तो तसाच ठेवण्याची जबाबदारी मात्र तुमचीच असते. मग काही ऍक्टिव्हिटीज एकत्र आणि काही वेगळ्या करायच्या ठरल्या आणि मी हुश्श केलं! प्रत्येक अनुभवातून मलाही समृद्ध व्हायचं असतं. जितके वेगळे अनुभव तुम्ही घेता तितकीच मी तुम्हाला अधिकाधिक सुखद आठवणी देऊ शकते, जशा ह्या ट्रीपच्या मग झाल्या.

‘रोजचा दिवस नवा’ हे माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्यच आहे म्हंटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. दिवस काय घेऊन येईल हे माझ्यासाठी तुम्हीच ठरवता. त्यात प्रत्येकाला पडणारी माझी गरज वेगळी, माझ्याकडून अपेक्षा वेगळी. तुमच्या मते ‘सुट्टी’ ही केवळ बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाऊन साजरी केलेली नसते तर कधी कामातून सुट्टी, ताणतणावांपासून सुट्टी, स्वयंपाकातून सुट्टी, घरच्यांच्या जाचक प्रश्नातून सुट्टी, मुलांच्या काळजीतून सुट्टी…… अशी अनेक प्रकारची सुट्टी (की सुटका?) हवी असते. मला भेटल्याने कुठेतरी दिलासा मिळेल ही आशा असते. आणि म्हणूनच तर मला मी ‘सुट्टी’ नावाची संजीवनी असणं फार आवडतं. तुमच्या आयुष्यात नवचैतन्य आणते आणि ओठांवर स्मितरेषा!    

बोलता-बोलता एक नुकतीच झालेली घटना आठवली. त्या दिवशी वातावरण अगदी तंग होतं. आई आणि मुलीमध्ये सकाळी-सकाळी जोरदार भांडण झालं होतं. तिचं कुणावर प्रेम आहे असं आईच्या ध्यानात आलं होतं, आणि तो तिच्याच ऑफिसमधला असला तरी वेगळ्या जातीचा असल्याने अजूनच राग आला होता. ती मुलगी समजूतदार वाटली मला. आता मी तिथे काय करत होते, आणि मला हे सर्व कसं माहित, हा प्रश्न तुमच्या मनात आला नं लगेच? सांगते, सांगते….त्या मुलीने तातडीने मला बोलवून घेतलं होतं; ऑफिसमध्ये कळवून टाकलं की ती काही वैयक्तिक कारणामुळे येऊ शकत नव्हती. त्या मुलाला बाहेर भेटायला बोलावलं (त्यानेही माझा आधार घेतलाच) आणि खूप रडली त्याच्याजवळ. मलासुद्धा कसंतरीच झालं. पळून जाऊन लग्न करण्याची इच्छा सुद्धा दर्शवली. खूप सबुरीने त्याने तिचं सगळं ऐकून घेतलं, दोघे जेवले, चालत-चालत समुद्रकिनारी येऊन बोलत बसले, त्या मोकळ्या हवेत ती हळू-हळू शांत झाली. त्याने तिला पटवलं की ते आई-वडिलांची मान्यता मिळवूनच लग्न करणार. तो निवळण्यासाठी, त्यांना पटवण्यासाठी वेळ लागला तरी. मला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. जगाविषयी, माणसाच्या  चांगुलपणावरचा विश्वास वाढला. सकाळचं तिच्या मनातलं वादळ आता शमलं होतं आणि माझ्याही. कारण मी जरी ‘सुट्टी’ असले तरी तुमच्याबरोबर असतांना तुमचंच मी प्रतिबिंब बनते, तुमच्या भावनांच्या हिंदोळ्यावर कधी झुलते तर कधी थकूनही जाते. 

एक महिन्यापूर्वी असाच एकदा मानसिक थकवा मला आला होता. त्याचं काय झालं…. मी आरामात बसले होते आणि नकळत तो मला तातडीने घेऊन निघालाही! मी निमूटपणे सोबत करत होते कारण तो ओक्शाबोक्शी रडत होता. कळलं की गावाकडे वडीलांना पॅरालीसीस झाल्याची बातमी आली होती. एकुलता एक तो, आई गेलेली, आणि अजून शिक्षणही पूर्ण नाही….तब्येतीची काळजी एकीकडे आणि भविष्याची दुसरीकडे! अशावेळी माझं अस्तित्व अदृश्य असल्याचं फार उपयुक्त ठरतं. कारण मी बरोबर असूनही त्यावेळी माणसाला हवी असलेली निस्तबद्धता, अंतर्मुख होण्याची संधी, खोलवर झालेल्या जखमेवर फुंकर मारायला वेळ मिळतो.  प्रश्न सुटत नाहीत, पण मळभ मात्र नक्की दूर व्हायला मदत होते. त्याचंही तसंच झालं. गावी गेल्यागेल्या त्याने सूत्र हातात घेतली आणि वडिलांनाही ट्रीटमेंट सुरु केली, त्यांच्याशी चर्चा करून बँकेतील काही ठेवी मोडल्या, त्याच्या चुलत भावाने वडिलांसोबत राहण्याचं मान्य केलं होतं. सर्व व्यवस्था करून काही दिवसांनी आम्ही परतलो. थकलो होतो दोघेही, पण एक वेगळंच समाधानही होतं.

आश्चर्य वाटतंय नं? इतकी कशी मी गुंतून जाते तुमच्यात? काय राव, मी तुमची पाठराखीणच आहे नं! मग मला नसेल का तुमच्या चांगल्या-वाईटाचा विचार? माझा मूळ स्वभाव जरी आनंदी, स्वछंदी असला तरी तुमचा मूड-वातावरण-प्रतिक्रिया पाहून मी माझं रूप बदलते. तुम्हाला पंचमहाभूतांनी बनलेल्या ह्या सुंदर निसर्गाच्या जवळ न्यायचा प्रयत्न करते, आणि तसं जरी नसेल तर शांतपणे सोबत राहून तुम्हाला स्वतःच्या आत दडलेल्या निसर्गदत्त देणग्यांची ओळख करून देते. आपल्याला एकमेकांचा सहवास अगदी हवाहवासा वाटतो नं? मग माझा, ह्या ‘सुट्टी’चा, पुरेपूर आनंद लूटा, मोकळा श्वास घ्या, आणि आयुष्य अधिक खुलवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *