चोखंदळ वाचक हो!
सप्रेम नमस्कार
बघता बघता नवीन वर्षाचा एक महिना संपला सुद्धा. भोगी आणि संक्रांतीचे निमित्त साधून भोगीची भाजी, वाग्यांचे भरीत, बाजरीची भाकरी, तिळगुळ आणि गुळाची पोळी अश्या महाराष्ट्रीय पदार्थांचा सगळ्यांनी आस्वाद घेतलाच असेल.
मंडळाच्या सभागृहात ८ जानेवारी रोजी असाच एक सुनियोजित, देखणा, कायम लक्षात राहील असा कार्यक्रम झाला निमित्त होते ते स्त्री सखी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाचे. त्याचा सविस्तर वृत्तांत आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळेल.
९ जानेवारीला डॉ. अरुणाताई ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखन कार्यशाळा घेण्यात आली. ह्या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला. अरुणाताई वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करणार असल्याने सहभागी सदस्य संख्येवर बंधन होते. हाऊस फुल्ल कार्यशाळा झाली असे म्हणायला हरकत नाही. कार्यशाळेबद्दलचा सविस्तर वृत्तांत आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळेल. सर्व सहभागी लेखक, कवींचे मनःपूर्वक आभार!
सहित्योन्मेष स्पर्धा जरी संपली असली तरी त्याचा निकाल अजून जाहीर व्हायचा आहे. तो जाणून घ्यायला स्पर्धकांबरोबरच वाचकही उत्सुक आहेत, ह्याची आम्हाला जाणीव आहे.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून २६ फेब्रुवारी २०२३ रोजी हा पारितोषिक वितरण समारंभ मंडळाच्या सभागृहात होणार आहे. त्याच बरोबर ग्रंथालय शाखाधिकारी आणि वाचनालय स्वयंसेवक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मंडळाची आता शतकोत्तर वाटचाल सुरू आहे. अनेक ज्येष्ठ सभासदांनी मंडळाच्या उत्कर्षात हातभार लावला आहे. अशा ज्येष्ठ सभासदांचा सन्मान २६ फेब्रुवारी रोजी केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठी स्नेह भोजन आयोजित करण्यात आले आहे. भोजनाची व्यवस्था करण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्व सभासदांनी आपल्या मित्र मंडळीना घेऊन जरूर यावे.
दरवर्षी देण्यात येणारा योगदान पुरस्कार २ एप्रिल २०२२ रोजी देण्यात येणार आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल. तूर्तास इतकेच.
आपल्या सूचना, प्रतिक्रिया आमच्या पर्यंत नक्की पोहचवा.
स्मिता बर्वे
संपादक मंडळ
स न वि वि
