संवाद
चोखंदळ वाचक हो!
सप्रेम नमस्कार,
सगळ्यांची दिवाळी उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली असेलच. महाराष्ट्र मंडळाने हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ ह्या नाटकाचे दोन प्रयोग आयोजित केले होते. दोन्ही प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी होते. दोन्ही प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नाट्यगृहातून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहून, कार्यकारणीने चार पाच महिने घेतलेल्या कष्टांचे चीज झाले असे वाटले. लिव्ह इन रिलेशनशिप सारखा, अतिशय संवेदनशील विषय हलक्या फुलक्या पद्धतीने हाताळल्याने, नाटकाने प्रेक्षकाचे मन जिंकले. दिग्गज कलाकारांच्या सहज वावराने, साध्या सोप्या शाब्दिक विनोदामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
हा नाट्यप्रयोग आयोजित केल्यामुळे अनेक नवीन माणसं मंडळाशी जोडली गेली. नवीन लोकांनी सभासदत्व घेतले. ‘पुस्तके तुमच्या दारी’ ह्या नवीन योजनेची चौकशी अनेक लोकांनी केली आणि योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. नाटकाबद्दलचे अभिप्राय आमच्याकडे येऊ लागले आहेत. ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहचवू.
आता थोडे आगामी कार्यक्रमा विषयी.
4 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता मंडळाच्या सभागृहात कॅनव्हास ते वॉल ह्या पुस्तकाचे अभिवाचन होणार आहे. ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत शर्मिला पटवर्धन. ख्यातनाम शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड यांचा जीवन प्रवास ह्या पुस्तकातून उलगडला आहे. रसिकांनी ह्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
सर्वांना माहितीच आहे की साहित्यान्मेष ही आगळी वेगळी स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. ह्या स्पर्धेमुळे अनेक लेखक मंडळाशी जोडले गेले आहेत. नवोदित लेखक कवींना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून मंडळातर्फे 7 जानेवारी 2023 रोजी लेखन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध लेखिका डॉ. अरुणा ढेरे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेबद्दलचा बाकी तपशील लवकरच देण्यात येईल.
आपले अभिप्राय, सूचना, कल्पना आमच्यापर्यंत जरूर पोहचवा.
लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा.
स्मिता बर्वे
संपादक मंडळ
सनविवि
