संवाद

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

वाचकहो नमस्कार..

मराठी मनाला भुरळ घालणारे खास मराठी धर्तीचे संगीत..म्हणजेच ढोल ताशा लेझीम होय!!नुकतेच मंडळाच्या महानाद पथकाने १ आणि २ मार्च रोजी ढोल ताशा कार्यशाळा घेतली. त्याविषयीचा अभिप्राय आपल्या ह्या अंकात समाविष्ट केला आहे.मार्च महिना आला की मराठी मनाला ओढ लागते ती गुढी पाडव्याची! आपण सर्व जण परंपरागत पद्धतीने गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करत असतो.

ह्या दिवशी आपण मंडळाचा संस्थापक दिन साजरा करतो. 

प्रतिवर्षी संस्थापक दिनानिमित्त आपण  सभासदांच्या दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचे कौतुक करत असतो. तेव्हा अशा यशस्वी विद्यार्थ्यांच्या निकालाची xerox प्रत आपण मंडळाच्या ऑफिसमधे २२ मार्च पर्यंत आणून द्यावी. आपला अद्ययावत सभासद क्रमांक त्यासोबत जोडणे आवश्यक आहे. 

दिनांक २२ मार्च रोजी शब्दाक्षरी स्पर्धेची प्रथम फेरी घेण्यात येईल. त्याबद्दल माहिती देणारे पोस्टर आपल्याला आमच्या सोशल मीडिया/whatsapp गृप वर दिसले असेलच. जास्तीत जास्त संघ यामध्ये भाग घेतील अशी आमची अपेक्षा आहे. 

संस्थापक दिन हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण ह्या दिवशी आपण मंडळाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले आहे अशा सभासदाचा सत्कार करत असतो. ह्या वर्षी सौ.ऋताताई दीक्षित यांना योगदान पुरस्कार दिला जाईल. तसेच श्री.जितेंद्र जाधव यांना अभिमान पुरस्कार देण्यात येणार आहे. ह्या दोन्ही मान्यवरांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठी आपण सर्वांनी दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी ५.१५ वाजता मंडळाच्या सभागृहात अवश्य यावे.

मंडळाच्या प्रथेनुसार संस्थापक दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे. आपण सर्वांनी जरूर यावे. एप्रिल महिन्यात आपला आगामी कार्यक्रम; एक आगळावेगळा नाट्यप्रयोग असणार आहे. हे नाटक पाहण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे . त्याकरिता पोस्टरमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

मार्च २०२५ चा आपल्या सनविवि चा हा अंक गणनेनुसार ३९ व्या वर्षातील तिसरा आहे. इतक्या उज्ज्वल परंपरेतील अंकासाठी सभासदांकडून उत्तमोत्तम साहित्य मिळत रहावे अशी संपादक मंडळाची नेहमीच इच्छा असते. आपण आपले लिखाण व सूचना आमच्या ईमेल आयडी वर नक्की पाठवा.

शेवटी एक विनंती आहे की आपल्या सभासदत्वाचे नूतनीकरण करण्यासाठी अंकात दिलेल्या लिंक्स वापराव्या. आपले सभासदत्व अद्ययावत असणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे सनविवि च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणे, आपल्याला विविध उपक्रमांची, कार्यक्रमाची माहिती देणे सोपे होते.

कळावे,

लोभ आहेच.. तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती.

राधिका मराठे

संपादक मंडळ

सनविवि

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *