संवाद

सप्रेम नमस्कार 

मंडळी गणेशोत्सव, एकांकिका स्पर्धा एकदम जोशात, दणक्यात झाल्या. खरं सांगायचे तर त्याची झिंग अजून उतरलेलीच नाही. तुम्हालाही तसेच वाटते का?

बाप्पाची प्रतिष्ठापना ढोल ताशाच्या गजरात, दणक्यात झाली. आपल्या महानाद पथकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तरुणाईचा उत्साह संपूर्ण सभागृहात पसरला होता.

गीतरामायण, सिम्पली सई, गोष्ट इथे संपत नाही, गारे गोडे ह्या सर्व कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

स न वि वि गणेशोत्सव विशेषांकाचे प्रकाशन, स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि महाप्रसाद हे सगळे कार्यक्रम वेळेत आणि योग्य पद्धतीने संपन्न झाले. परंपरेप्रमाणे अर्थवशीर्ष पठण झाल्यामुळे, सकारात्मक ऊर्जेने वातावरण प्रसन्न झाले होते.

बाप्पाची विसर्जन मिरवणूक जोमात करायची संपूर्ण तयारी झाली होती, पण वरुण राजाने कृपा केल्याने त्यात थोडा बदल करावा लागला. पण महानादच्या उत्साही वादकांनी भर पावसात जोशात वादन केले आणि बाप्पाचे यथोचित विसर्जन केले. पुनरागमानायच म्हणत साश्रू नयनानी गणरायला निरोप दिला. 

लगेचच एकांकिका स्पर्धा असल्यामुळे कार्यकारिणी त्या तयारीला लागली. ह्या वर्षी सहा संघांनी सहभाग घेतला होता. मराठी माणूस नाटक वेडा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ह्या सर्व कार्यक्रमाचे अभिप्राय तुम्हाला ह्या अंकात वाचायला मिळतील. 

विशेष कौतुकाची, अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र मंडळाच्या ‘महानाद’ पथकाला वैकूम ह्या केरळातील गावातून वादनासाठी आमंत्रित करण्यात आले. गणपती उत्सवात भरपूर दमणूक झालेली असून सुद्धा, संपूर्ण संघ त्याच उत्साहाने केरळमध्ये जाऊन वादन करून आला. त्याचा वृत्तांत ह्या अंकात आहेच. 

पुढील वर्ष सुद्धा संस्मरणीय करण्यासाठी कार्यकारिणी कटिबद्ध आहे. आहे. आगामी कार्यक्रमाबद्दलचा तपशील अंकात आहे. 

त्याच बरोबर आपली नेहमीची लोकप्रिय सदर आहेतच. अंक वेबसाईटवर असल्यामुळे आपण आपला अभिप्राय तिथे जरूर द्यावा. लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा. 

स्मिता बर्वे 

संपादक मंडळ

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *