अभिप्राय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा “तमाशा”

दिनांक १८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मंडळ येथे गणपती उत्सवाच्या निमित्ताने “सवाल-जबाब” हे नाटक झाले. नाटकाचे नाव ऐकून जयश्री गडकर, अरुण सरनाईक, सुरेखा पुणेकर, अप्सरा आली मधील सोनाली अशी अनेक नावे मनात तरळून गेली. गणपती उत्सवात “लावणी-तमाशा” हे माझ्या पारंपरिक विचारांना जरा खटकलेच. पण ही अलीकडची तरुण मंडळी काय करता आहेत हे बघू म्हणून गेले. गणपती बाप्पाकडे खूप गोष्टी मागायच्या होत्या पण बरोबर सात वाजता नाटक सुरू झाले त्यामुळे नुसतेच हात जोडून खुर्चीवर जाऊन बसले.

नाटकाचा पडदा उघडला. समोर रंगमंचाच्या मागे चक्क फक्त काळा पडदा. उजव्या बाजूला चार कलाकार प्लॅटफॉर्मवर बसले होते. हातात घुंगरू घेतलेली एक स्त्री, एक हार्मोनियम वादक, एक गायक आणि ढोलकी, दिमडी, ड्रम अशा विविध तलवाद्यांवर साथ करणारा एक कलाकार. सुरवातीचे संगीत वाजल्यावर एका साधा झब्बा-पायजमा घातलेल्या कलाकाराने मंचावर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधायला सुरुवात केली. स्वच्छ आवाज, शुद्ध वाणी आणि रंगमंचावरचा सहज वावर. विषय देखील खूप वेगळा असल्याची जाणीव झाली. प्रेक्षक खुर्चीतच जरा सावरून बसले.

थोड्‍याशा संभाषणानंतर् त्याने मुख्य कलाकाराला साद घातली. ती होती “कलावती”. एक लोककलाकार. तमाशात नाचणारी लावणी नृत्यांगना. इतका वेळ सूत्रधार म्हणून संवाद साधणाराच “दादांचा” चेला म्हणून दादांवरची कोर्टकेस मागे घ्या अशी धमकीवजा विनंती करायला येतो आणि त्या बदल्यात कलावतीला पुरस्कार आणि लावणीच्या कार्यक्रमाचे आमंत्रण असे आमिष देखील दाखवितो. कार्यक्रमात लावणी कोणती घ्यायची यावर तोच सेन्सॉरशिपची कात्री लावायला सुरुवात करतो आणि मग मात्र सवाल-जबाबाला सुरुवात होते. उत्तर देताना कलावती शिकलेली असूनही सरळ संवादात उत्तर न देता ढोलकीच्या तालावरच्या आपल्या लावणी-नृत्यातून देते. एवढ्याशा मंचावर तिचे नृत्याचे पदन्यास बघण्यासारखे होते. लावणी सादर करताना तिचे हावभाव… बसली की डोळ्यात पाणी आणि उभी राहिली की त्याच डोळ्यात अंगार! तिच्या अभिनयातील ऊनपावसाचा खेळ प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवत होता. ओठ न चावता आणि नको ते हावभाव न करता देखील लावणी पाहणाऱ्याच्या काळजात कळ उठवू शकते हे दाखवून देणारे नृत्य पापणी न लवता बघत रहावे असेच होते. 

सध्याचा वादग्रस्त विषय म्हणजे “अभिव्यक्ती स्वातंत्र्य”. त्यातून लोककलावंतांभोवती फिरणारी ही कथा. गिरीश दातार आणि अपूर्वा कुलकर्णी यांनी नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही बाजू अत्यंत जबाबदारीने समर्थपणे सांभाळल्या आहेत. “कलावतीबाई! मी तुमची शाळा घ्यायला आलो होतो पण तुम्हीच माझी शाळा घेतलीत” हे वाक्य खूप काही सांगून जाते. वादग्रस्त विषय प्रेक्षकांच्या मनात सहजपणे रुजविण्याचे कौशल्य वादातीत. कलावतीची भूमिका करणाऱ्या सुकन्या गुरवने तर संवादफेक, मुद्राभिनय, उत्कृष्ट गायन आणि डौलदार नृत्य या साऱ्याच सादरीकरणातून प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा मिळविली. वेगवेगळ्या लावण्यांना जाणीवपूर्वक लावलेला आवाजाचा विशिष्ट पोत…

सूत्रधाराच्या भुमिकेबरोबरच त्याच कलाकाराने दादांचा वैयक्तिक कारभारी आणि तमाशातला, सोंगाड्‍या, नाचा अशा अनेक भूमिका ताकदीने वठवल्या. 

नाटकाला सुसंगत संगीताची साथ हेही या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य.

बऱ्याच दिवसांनी नाटकाचा एक सर्वांग सुंदर प्रयोग बघायचा योग आला. अशा धर्तीचा नाट्यप्रयोग आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नाटकाचे अनेक प्रयोग व्हावेत ही मनापासून शुभेच्छा.

अलका बोकील

अनुक्रमणिका

1 thought on “अभिप्राय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *