–रेवती कुलकर्णी, सनविवि संपादक मंडळ.
नमस्कार रसिकहो!!
बघताबघता नवीन वर्षाचा एक महिना संपला! आणि आता आपण सर्वांनी जानेवारीचा अंक वाचला असेलच!
आपल्या आवडत्या सनविविचे बदलेले रूप आपल्याला खूप आवडल्याचे आपण कळवल्यामुळे खूप आनंद झाला
साहित्योन्मेषच्या स्पर्धकांच्या विविध विषयावरच्या लेखांनी सजलेला अंक तुम्हा रसिक वाचकांच्या पसंतीला उतरल्याचे तुमच्या भरभरून आलेल्या प्रतिक्रियांवरून आमच्या लक्षात आले आहे. आपल्याला माहिती आहेच की उत्तम प्रतिक्रियांनादेखील बक्षिसे मिळणार आहेत. ( सौजन्य: पुरूषोत्तम करमरकर) त्यामुळे काही निवडक प्रतिक्रिया ह्या अंकात वाचायला मिळतीलच.
साहित्योन्मेषचे स्पर्धक सांगितलेल्या वेळेतच आणि दिलेल्या शब्दसंख्येतच त्यांचे लेख लिहिताहेत हे खूप कौतुकास्पद आहे. माननीय परिक्षकांनी दिलेल्या काही मौल्यवान सूचना त्यांच्यापर्यंत वेळोवेळी पोहचवूच.
आपल्या प्रत्येक अंकात स्पर्धकांव्यतिरिक्त बाकी रसिकांच्या विविध साहित्याचे -जसेकी स्केचेस, कविता, गज़ला, कथा लेख इत्यादी – स्वागत आहे.
सर्वांना माहिती आहेच कोरोना सारख्याच ओमायक्रॅानचा प्रादुर्भाव पुन्हा सगळीकडे झाला आहे. त्यामुळे मंडळाकडून घेतली जाणारी अतिशय लोकप्रिय रंगदक्षिणी ही एकांकिका स्पर्धा डिजीटल मिडिअम- झूमवरच लाईव्ह घ्यावी लागणार आहे. एन्ट्रीज यायला सुरवात झाली आहे. त्याबद्दल ह्या अंकात वाचायला मिळेलच.
कोविडच्या आचारसंहितेनुसार प्रजासत्ताकदिनाचा सोहळाही आपल्या मंडळाच्या मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि फेसबुक लाईव्हवर मोठ्या दिमाखात साजरा झाला. आपले भाग्य असे की ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला माजी DCP श्री. अरूण घाटगे हे पाहुणे लाभले होते. ते शहिद फ्लाईंग ॲाफिसर मदन घाटगे ह्यांचे बंधू आहेत. उर्मिलाताईंनी ह्या कार्यक्रमाचे सुंदर शब्दांकन केले आहे ते ह्याच अंकात वाचायला मिळेल.
आपला आणखी एका लोकप्रिय कार्यक्रम “अभिव्यक्ती” बद्दलचा वृत्तांत वाचायला मिळेल वैशालीताईंकडून!!
२७ फेब्रुवारीला मराठी भाषादिन आहे. सर्वांनी शक्य तितके व्यवहार मराठीत करून, आपल्या मोबाईलमधे देवनागरी कीबोर्डाचा टायपिंगसाठी वापर करून मराठीच्या संवर्धनात आपला खारीचा वाटा उचलूयात.
मंडळाच्या वाचनालयाच्या सभासदांसाठी “मला आवडलेला दिवाळी अंक “ ही जी स्पर्धा स्पर्धा ठेवली आहे त्यासाठी आपापले लेख लवकर पाठवावे ही विनंती!
आता आपला अंक डिजीटल झाला असल्यामुळे वाचकसंख्या खूपच वाढली आहे. त्यामुळे सर्वदूर आपली उत्पादने किंवा आपल्या काही ग्राहकसेवा पोचवण्यासाठी जाहिरातदारांनी आपल्या जाहिराती महिन्याच्या २५ तारखेच्या आत मिळतील अश्या रितीने पाठवाव्या. रेशीमगाठी ह्या सदरासाठी विवाहोत्सुकांनी आपापली माहिती लवकर पाठवावी ही विनंती!
ह्या महिन्यातल्या माघी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!
पुन्हा आलेल्या महामारीच्या संकटाचे त्याने निवारण करावे अशी प्रार्थना करून निरोप घेते!!!