अजिता पणशीकर
‘तारे जमी पर’ हा आमिर खानचा सिनेमा परवा पुन्हा एकदा पाहिला. वरवर दिसायला, अभ्यासात गती नसलेल्या एका सामान्य शाळकरी मुलाची ही गोष्ट! पण खोलात जाऊन पाहिलं तर मनुष्य स्वभावाचे अनेक नाजूक पदर उलगडत जातात. वडिलांच्या अपेक्षांचं दडपण, आईची त्याला वाचवण्याची निष्फळ धडपड, त्याचं नकळत काल्पनिक जगात हरवून जाणं, इतर मुलांचं खिजवणं, शिक्षकांच्या हताश नजरा,…. ह्या सर्व काळीज हेलावून जातात. असं कसं वागू शकतात लोकं? असंही प्रकर्षाने वाटतं. पण खरंतर आपल्याभवती अशी कित्येक उदाहरणं असतात, पण आपल्याला ती दिसतही नाहीत. मान्य करायला जड जातं, पण आपणही त्यातलेच एक असतो, नाही का? सिनेमा संपला, पण मनात मात्र विचारमंथन चालू करून गेला.
अनेक वर्षांपूर्वी मी माझ्या नवीन वर्गात चॉक-डस्टर घेऊन शिरले, आणि त्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल पूर्वग्रह देखील घेऊन शिरले. माझ्या सहकाऱ्यांनी त्याबद्दल मला सविस्तर कल्पना दिली होती आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे सुद्धा अगदी आवर्जून सांगितलं होतं. “तो मग्रूर आहे”, “ती आळशी आहे”. “ती आगाऊ आहे”. “तो जरा मंद आहे”. “मागच्या बाका वरच्या त्या मुलाकडे बारीक लक्ष ठेव”. “ती मुलगी एवढंसं बोललं की लगेच गळा काढते”.….मला सावध करण्यासाठी अश्या अनेकांच्या स्वभावांवर ‘शिक्कामोर्तब’ करण्यात आलं.
ते विद्यार्थी त्यांना चिकटवलेल्या लेबलची पूर्तता कशी करतात हे मी सतत पहात गेले. त्यांचा उपदेश पाळून मुलांशी मी त्यांनी सुचवलं होतं तशीच वागत गेले. पण जसजसं मी त्यांना जवळून पाहू लागले, समजू लागले, तसतसं मला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. चांगुलपणाच्या हेतूने सांगितलेल्या त्या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक विसरायला मला महिना लागला! हाच महिना मी त्या मुलामुलींना समजून घेण्यात घालवला असता तर! पण मुलांना शिकवण्यापेक्षा सिलॅबस शिकवण्याकडे कल असल्याने रोजचं शिकवणं, पेपर काढणं-तपासणं, मुलांचे प्रश्न,… ह्या सर्वांनी गांजलेल्या शिक्षकांनी किती सहज असे शिक्के मारले होते. त्याचा मुलांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो हे त्यांच्या गावीही नव्हतं! एक शिक्षक, एक पालक, म्हणून आपला हा अधिकारच आहे असं आपण गृहीत धरतो. पुढच्या काही महिन्यातच मुलांशी मोकळेपणानी बोलल्याने मला कळलं की ‘मग्रूर मुलगा’ हा घरी आजोबांच्या खूप धाकात होता, आणि ती ‘आळशी मुलगी’ थायरॉइड असल्याने चटपटीत होऊ शकत नव्हती, ‘आगाऊपणा’ हा खरंतर कमीपणाची भावना लपवण्याचा प्रयत्न होता, तर ‘मंदपणा’ हा डावरेपणा जबरदस्तीने घालवण्याच्या हट्टापायी झाला होता!
किती सहजपणे आपण इतरांना नावं ठेवतो. त्यांचं ढोबळ वर्गीकरण करून त्यांना कुठल्यातरी कप्प्यात टाकून वरून एक छाप मारून टाकतो! मग त्या दिलेल्या उपाधीला साजेसं जगण्यासाठी ही मुलं आयुष्यात तशीच बनून जातात. एखाद्या लहान मुलीला “शहाणी आहे ही” म्हणा की तिला आयुष्यभर तसं वागायला भाग पाडतो, तिला कधीतरी थोडा वेडेपणा करावासा वाटला तरीही. एखाद्या छोट्या मुलाला “हा नेहमी ऐकतो” म्हंटलं की तो आजन्म दुसऱ्याने आखलेल्या चौकटीत अडकतो आणि त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक संघर्षांना सतत सामोरे जातो. आणि मग तसे जगणे हे त्याला स्वतःलाच दांभिक वाटू लागतं. एखाद्याला “परफेक्शनिस्ट” म्हणून लेबल लागलं की ती व्यक्ती कायमची परिपूर्णतेच्या चक्रात गुंतून पडते. अपेक्षांच्या ओझ्याखाली, इतरांच्या आणि स्वतःच्या, वाकून जाते. कुणावर “स्वच्छंदी” असा छाप पडला तर तो आपल्या सार्या भावना दाबून, स्वतःला त्रास करून घेऊन, नेहमीच आनंदी असल्याचा आव आणेल. केवळ ती मोहोर खरी करण्यासाठी!
नुसत्या स्वभावावरच नाही तर आपण दिसण्यावरही किती सहज ताशेरे झोडतो. एक समाज म्हणून आपण एखाद्याला अवास्तव मोठेपणा बहाल करतो तर एखाद्याला कमीपणाची भावना देऊन जातो. ह्या दोन्ही बाबतीत आपण त्यांच्यावर अन्यायच करत असतो. त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा किती वेळा विचार करतो? विनाकारण श्रेष्ठत्व अथवा न्यूनगंड निर्माण होतो आणि मग सर्वच करण्या-वागण्यात आयुष्यभरासाठी त्याचा प्रभाव पडल्याशिवाय रहात नाही. ह्याचा सगळ्यात जास्त उपयोग मार्केटिंग कंपन्या करून घेतात आणि आपल्या ह्या मानसिकतेचा फायदा घेऊन अजूनच त्या वेदनेच्या खाईत लोटतात. जसं नितळ गोरं होण्यासाठी क्रीम्स, झटपट बारीक होण्यासाठी डाएट्स व शस्त्रक्रिया, प्रेम व्यक्त करण्यासाठी डायमंडची भेट, तारुण्य टिकवण्यासाठी बोटॉक्स इंजेकशन्स, श्रीमंती दाखवायला महागड्या गाड्या,…. पुन्हा पुन्हा आपण जुन्या कल्पनांना, मान्यप्रतिमांना बळी जातो. फरक एवढाच की आपण त्यांना नवीन युगातल्या अपेक्षांच्या वेष्टनात गुंडाळतो. एवढेच नाही तर मैत्रीचे प्रदर्शन करण्यासाठी अनंत फोटोस, लाईक्सची आतुरतेने वाट पहातो. त्याने आजच्या पिढीमध्ये एक प्रकारची उदासीनता दिसून येते – “आय ऍम नॉट गुड इनफ”, माझ्यापेक्षा इतर सगळे चांगले आहेत, सुखात आहेत, असंच त्यांना वाटत रहातं. शिक्का-बंद होऊन संकुचित राहून श्वास कोंडतो, मग तो आपला असो वा दुसऱ्याचा! आपण गुदमरतो, पण विसरूनच जातो की ह्या पिंजऱ्याचं दार आपणच उघडू शकतो. आपल्या मुलांनाही आपलं व्यक्तिमत्त्व स्वतः घडवायचं स्वातंत्र्य देऊया. त्यांनाही खुलण्यासाठी अवकाश आणि अवधी दिल्यास कदाचित त्यांची आगळी-वेगळी प्रतिभा दिसून येईल. मग आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे?
एकदा मारलेला शिक्का पुसून काढणं फारच कठीण! त्याहून कठीण असते ती आपण दुसऱ्यावर शिक्कामोर्तब करण्याची, ब्रँड करण्याची, आपली सवय. कधीतरी ते लेबल इतरांनी लावलेलं असतं, तर कधी स्वतःनेच लावलेलं असतं. मग आपणच “मी असाच आहे”, “मी तशीच आहे”, असं स्वतःला ठासून सांगत रहातो आणि जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक सुंदर क्षणांचा, प्रसंगांचा आनंद गमावतो. असाच छाप मारून टाकणं खूप सोयीचं असतं कारण त्यामुळे आपल्याला स्वतःच्या, दुसऱ्याच्या वागण्या-बोलण्याचा अर्थ लावणं सोपं जातं. पण जर नाव ठेवायचं असलेच तर ते त्या कृत्याला ठेवा, त्या व्यक्तीला नाही. एखादं काम चांगलं केलं नाही, सर्व मुद्दे मांडले नाहीत, अक्षर वाईट काढलं, उत्तर अर्धवट दिलं,… तर ते तसं स्पष्ट सांगा. मठ्ठ, वाईट, बेजबाबदार, अजागळ, वगैरे विशेषणं लगेच त्या व्यक्तीला चिकटवू नका. आपल्या हे ध्यानातच येत नाही की ज्याच्यावर छाप मारला त्याहीपेक्षा ज्याने तो मारला त्याबद्दलच तो अधिक सांगून जातो.
‘तारे जमी पर’ मधल्या शिक्षकाने त्या मुलाला प्रेमाची ऊब दिली, त्याच्यातील मूल बाहेर येऊ दिलं, त्याच्या आवडी-निवडी समजून घेतल्या, त्याला त्याच्या परीने शिकू दिलं, प्रोत्साहन दिलं आणि हळू-हळू त्याचं व्यक्तिमत्व अलगद फुलत गेलं. त्याच्याबद्दलचे इतरांचे मत जसे बदलू लागले, त्याच्याविषयीचे शिक्के पुसट होत गेले, तसे त्या मुलाचे हसू परत आले, त्याला भोवतालचं जग सुंदर दिसू लागलं. प्रत्येकांत काही ना काही सुप्तगुण असतात, क्षमता असते, पण त्यांना व्यक्त होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणं हे आपल्या सर्वांच्याच हातात आहे, नाही का?
थोडं थांबा….जरा तटस्थपणे विचार करून पहा….तुमच्यावर कुठलं लेबल चिकटलेलं आहे का? त्या शिक्क्याने तुमच्या आयुष्याचा ताबा तर घेतला नाही नं?
