कहाणी आम्रवनाची
आम्रतरूंचे मोहोर करपले
उदास झालं रान
जेव्हा पावसानं सोडलं
काळ वेळेच भान
अवेळीच दाटून येऊन
पाऊस तूफान कोसळला
शेतकऱ्याच्या पोटावर
चाबूक त्याचा आदळला
पाऊस जरा थांबतोय
तर कडाडले ऊन
पारा चढला वेगाने
हवेत निखारे पेटवून
मुळाशी घातला पैसा
पाण्यात गेला वाहून
फळे गळली टपाटप
तापमान न साहून
बापजाद्यानी शिकवली शेती
त्यावर पडल पाणी
ज्ञान झाले पोरके
उरली केवळ गाऱ्हाणी
मान फिरवती लोक
ऐकून कहाणी खरी
भाकड कथा नकोत म्हणती
आंबा द्या शंभर नंबरी
— शर्मिला पटवर्धन
