पानोपानी
“हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट ” किंवा “हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे “अशी गाणी ऐकली की डोळ्यासमोर सुखावह पोपटी हिरव्या रंगांच्या तऱ्हेतऱ्हेच्या रंगछटा येतात.
हे सगळे हिरवेपण त्यातल्या क्लोरोफिलमुळे असते.

अन्नाच्या साखळीतला हा प्रथम घटक ,ज्याच्यावर पूर्ण जीवनसृष्टी अवलंबून आहे .
आपण म्हणजे मानव, पशु ,पक्षी स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही .पण ही सर्व तऱ्हेची पाने सूर्याची ऊर्जा ,कार्बन डाय-ऑक्साइड वगैरे पासून स्वतः तर अन्न तयार करतातच पण त्याचबरोबर आपल्यालाही अन्न पुरवून जिवंत ठेवतात आणि तरीही आपण त्याची कृतज्ञता न बाळगता त्यांच्याशी कृतघ्न वागतो .
ही झाली पानाची शास्त्रीय बाजू पण लहानपणापासूनच या वृक्षवल्ली आपल्या जीवनाशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेल्या असतात नाही का !
बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेत कोंब फुटून बाहेर आलेल्या दोन पानांना दोन हात जोडून नमस्काराची उपमा दिली आहे. ती दिसतात तशीच.
खेड्यापाड्यांमध्ये उन्हाळ्यात लहान बाळांच्या झोळीत “चिवळीची” पानं टाकून नैसर्गिक गारवा निर्माण करतात आणि त्यावर बाळांना झोपवतात.
चिंच आणि गुंज यांची पाने दिसायला खूपशी सारखी असतात पण एक अगदी आंबट आणि दुसरी अगदी गोड. लहानपणी दोन्ही खाल्ली जायची. मेंदीच्या पानांपासून मिळणाऱ्या रंगाने आपण हातावर नक्षी काढतो हे सगळ्यांना माहिती आहेच पण साग वृक्षाची पानेही हातावर चुरगळल्यावर मेंदी सारखाच लाल रंग देतात आपण अगदी इन्स्टंट मेंदी त्याने काढू शकतो.
कण्हेरीच्या दोन पानांनी फटकफटक असा आवाज फटाक्यांसारखा येतो. दोन चिमटीत दोन पानांची टोकं धरून ती हलवायची.
रुईच्या पांढरट पानांमधल्या चिकाने न निघणारा ,आत मोडलेला काटाही निघू शकतो आणि रुईच्या पानांवर अन्न किंवा तूप ठेवून ते खाऊन हरितालिकेचा उपासही सोडतात. ओवा आणि पुईच्या ( मलबार spinach) पानांची छान भजी होतात तर कोकणात ,कोस्टल कर्नाटकात ओवा ,ब्राह्मीची पानं वाटून ताकाला लावून “तंबळी” नावाचं पेय तयार होतं .
गवती चहाच्या पानांचा उपयोग तर माहिती आहेच पण डासांना पळवून लावणारी ओडोमॉसचा वास येणारी ही पानं असतात. तसंच सुगंधी बासमती तांदुळाचा वास येणारीही काही पानं असतात ज्याचं एक पानही साध्या भातात शिजताना घातलं तर आसमंत बासमतीच्या घमघमाटाने दरवळतो.

काही पानांना चक्क पन्हं असल्यासारखा वास येतो ती थोडी चुरगळली की.
निलगिरी, तुळस, सब्जा, नागवेल, कडूलिंब, शेपू ,कोथिंबीर ,कांदापात ,लसूण पात ,मरवा ,दवणा अशी सगळीच सुगंधी पाने. प्रत्येकाचा स्वतःचा असा खास वास, चव आणि उपयोग!
काही स्वयंपाकात ,काही गजरे, हारात काही देवाला काही औषधी असे निरनिराळे उपयोग. शिवाय आंबटचुका, मेथी,पालक,अंबाडी,चंदन बटवा आणि इतर अनेक पालेभाज्यांची पानं खाऊन आपण कितीतरी चवी चाखतो आणि त्यातून कितीतरी खनिजे,जीवनसत्त्व मिळवतो . सरसो का साग मक्की रोटी पंजाबात नेऊन पोहोचवते तर किनारपट्टीवरील केळीच्या पानात लपेटलेले मासे भाजून त्याचा वास मासेखाऊंच्या तोंडाला पाणी सुटवतात आणि कोकणात हळदीच्या पानांच्या पातोळ्या/ पानग्या सकाळची न्याहारी करतात .फणसाच्या पानांच्या द्रोणातली इडली आणि पानात लपेटलेले कोट्टेकडबू आपण कर्नाटकात चाखलेले आहेतच.
असे कित्येक उपयोग पानांचे.
लहानपणी “आतिपाती गधे की छाती मुझे चाहिये…… गुलाब की पाती ‘असा एक खेळ खेळायचो खूप छान खेळ होता .राज्य देणारा ज्याची पाती म्हणजे पानं सांगेल ती शोधून त्याला आणून द्यावी लागत .आपोआपच कितीतरी पानांची नावे, झाडांची नावे त्याबद्दलची माहिती गोळा होई.
छोट्या जखमांवर निरगुडी किंवा कतरी पानांच्या हिरव्या रसाने झटपट antiseptic पसरवायचं.
तर न फुटणाऱ्या फोडावर हळदीचं किंवा विड्याच्या पानाचं पोटीस बांधलं जाई.
पानं असतातही कितीतरी प्रकारची, रंगांची ,विविध आकारांची .त्यातल्या शिरांवरून त्यांचे दोन विभाग पाडतात रेटीक्युलेट आणि पॅरलल वेनेशन. बहुसंख्य पाने रेटीक्युलेट प्रकारात मोडतात
निशिगंध, हळद ,तंबाखू ,कर्दळ यांची साधारण सारखी पाने पॅरलल वेनेशनची तर त्यातलाच थोडा जाडजूड प्रकार म्हणजे आताच्या लेटेस्ट सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जाणारी कोरफड /एलोवेरा .
प्राजक्ताची फुले जेवढी नाजूक,अलवार तेवढीच पाने रुक्ष आणि खरखरीत.
लाजाळूची थोड्याही स्पर्शाने लाजून मिटून जाणारी, कृष्णकमळाची छान आकाराची हाताच्या पंजासारखी तर त्याच्याच सारखी दिसणारी पण सर्व रंगांची उधळण करणारी मेपलची पानं तर कॅनडाच्या झेंड्यावर स्थान पटकावणारी! जास्वंदाची साधारण तशीच पण खूपच औषधी गुणधर्म असलेली.
गहू ,तांदूळ ,गवत किंवा तृण गटात मोडणारे .दुर्वांचे औषधात स्थान तर खूप वर आहे .ऋषींचे गवतापासून बनणारे दर्भासन आपल्याला माहिती आहेच .लहान बाळाला औक्षण करतात तेव्हा त्याच्या डोक्यावर गवत ठेवतात ,का तर त्याच्यासारखी तुझी आयुष्याची दोरी सतत वाढणारी आणि खंडित न होणारी असू दे म्हणून !
ऊस ,बांबू साधारण एका गटातले पण जपान आणि चीनने आपल्या पेंटिंग्स मध्ये बांबूच्या पानांचा इतका अप्रतिम उपयोग करून घेतला आहे की बघत राहावं.
बांबूच्या वनात उगवणारी आळंबी (मशरूम )खायला योग्य समजतात कारण ती विषारी नसतात .
मिरवेली कुठल्याही मोठ्या झाडावर चढतात पण तशीच दिसणारी “नागवेल” म्हणजे विड्याची पाने मात्र भलतीच मिजासखोर. त्यांची फारच काळजी घ्यावी लागते. वेलदोड्याची पानं कर्दळी सारखी पण पानांखाली बुंध्याजवळ छोटे पोपटी मणी धरतात ते म्हणजे वेलदोडे!
मसाल्यात ,पुलावात, बिर्याणी तेजपान नसेल तर काय उपयोग? कढीपत्त्याची फोडणी दिली की स्वयंपाकघराबरोबरच सगळं घर वासात बुडतं. थंडीच्या दिवसात शेतात हरभऱ्याची चिमुकली आंब असलेली कोवळी पाने तोडून लसूण, मिरचीची खमंग फोडणी देऊन भाकरी सोबत खायचा फर्मास बेत जमतो.
कॉफीच्या पानाआड दडलेले लाल बुंदक्याचे घोस एकदमच झाडाला रूप देऊन जातात तर सर्व जगभर ज्याच्याशिवाय सकाळच होत नाही ती चहाची पाने ही आपलीच की !
अळू जरी स्वतः निर्लेप असला तरी शुभकार्यात पानांची पातळ भाजी आणि अळूवड्या मात्र पाहिजेतच .इथे कर्नाटकात मात्र दुःखाच्या प्रसंगांमध्ये याचा उपयोग केला जातो ,शुभकार्यात नाही !
देवांना फुलाबरोबरच तऱ्हेतऱ्हेच्या पत्री म्हणजे पाने पाहिजेतच. बेल,आघाडा, केणा यासोबत दुर्वा आणि तुळस. सुगंधी फुलांच्या पत्रीची जंत्रीही लागली पाहिजेच.
पुराणातही शकुंतलेने दुष्यंताला कमळाच्या पानावर पत्र लिहिण्याचा उल्लेख आहे आणि भूर्जपत्रे तर ठाऊक आहेतच. कुठल्याही सणाला आणि शुभ कार्याला आंब्याचं तोरण लावलं जातंच.कलशात ठेवायलाही हे पाहिजेच. अगदीच सापडणं शक्य नसेल तर अशोकाची पानेही आपण चालवून घेतो.
पुराणातली वल्कल ही पानांची आणि झाडांच्या सालीचीच असायची की.
पिंपळ पानावर अंगठा तोंडात घातलेला बाळकृष्ण सगळ्यांना अगदी जवळून माहिती आहेच पण सळसळणारी ,चमकणारी, विविधरंगी पिंपळपाने किती सुंदर दिसतात नाही ?लहानपणी त्या पानांच्या पुस्तकात ठेवायला जाळ्या करायचो,आणि पिंपळावर मुंजा असतो असे वाटून भीती देखील वाटे.
सावलीसाठी प्रसिद्ध वटवृक्ष ही पानांनी भरलेला.

राजस्थानत खेजडीच्या झाडांना वाचवण्यासाठी कित्येकांनी जीवनदान केले ,कारण त्याची पाने अन्न म्हणून माणूस व प्राणी वापरतो ,त्यांचा तो जीवनवृक्ष .वाळवंटात असली झाडं असणं किती फायद्याचं! खूप उष्णतेने बरीच झाडे ,पानांचे रूपांतर काट्यामध्ये करून टाकतात किंवा खूप छोटा आकार देऊन आजूबाजूला काटे निर्माण करतात जसे बाभूळ ,शतावरी, कोरांटी ही पानांबरोबर काटे ठेवून असतात .
सूचीपर्णी वृक्षांची पाने उतरती , म्हणजे बर्फ गळून जायला सोपं. ख्रिसमस वृक्ष ही कोनिफेरस प्रकारातलाच .बर्फ गळून जावा म्हणून पानांवर प्लास्टिक सारखं पातळ मेणचट आवरणही असतं, जसं पाणवनस्पतींना खालच्या बाजूला असतं , कमळ किंवा पाणलिली .
राक्षसी पाणलिलीची पाने तर परातीसारखी कडा असलेली. मोठमोठी इतकी की छोटं बाळ आरामात त्यावर पडून राहू शकेल पण पाण्यात बुडणार नाही इतकी बलवान असतात .
कांचनची आणि शमीची पानं सोनं म्हणून आपण दसऱ्याला लुटतो.बालकवींचा जळात पाय टाकून बसलेला औदुंबर सगळ्यांना ज्ञात आहे पण खरंच जिथे उंबराचे झाड असेल त्याच्या जवळपास पाण्याचा मोठा साठा असतो असं बोअरवेल पाडणारे सुद्धा मानतात .हेच आवळा आणि जांभळाच्या झाडांचही आहे .
सदाफुलीचे पान कॅन्सर आणि इतर दुर्धर रोगांवर इलाज करण्यासाठी वापरतात. संशोधनाने त्याबद्दल अजून कळेल .
प्रत्येक झाडाचा नक्कीच उपयोग आहे. सुबाभूळ जमिनीत जास्तीत जास्त लावण्याचे प्रयोग सुरू आहेत कारण या झाडांना पाणी कमी लागतं आणि झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी पडतो. नारळाच्या झावळ्या अशाच गुणी. छप्पर शाकारण्यापासून मांडव घालण्यापर्यंत आणि खराटे बनवण्याकरता याचा उपयोग केला जातो .फळांबरोबर पानांचाही उपयोग केला जातो आणि म्हणून त्याचं नाव कल्पवृक्ष देखील आहे !
आपल्या पानांनी दृष्टीला सुख देणारी बदाम, रबर, अनेक प्रकारची क्रोटन्स ,फुलझाडे,सुगंधी फुलझाडे आहेत .
तर बागेचं रक्षण करण्यासाठी घाणेरी, निवडुंग, मेंदी ,बेशरमची झाडे लावली जातात .घाणेरीची काटेरी टोचणारी, खरखरीत पाने गाईगुरांना खाता येत नसल्यामुळे आपोआपच राखली जातात,पण ती जंगलांना घातक असतात त्यामुळे त्यांचा आता लाकडी खेळणी बनवण्याकरता उपयोग केला जातो आहे.
पळसाच्या पानांचा द्रोण, पत्रावळी करण्यासाठी उपयोग करतात या पानांवर बारीक मऊ लव असते आणि पान लवचिक असते त्यामुळे कसेही वळवू शकतो .
बायोडिग्रेडेबल केळीचे पान जेवण्यासाठी आपण पिढ्यानुपिढ्या वापरतो आहोत.
हिरव्या चाफ्याची फुले हिरवी असतात आणि पानांमध्ये बेमालून लपतात, वास मात्र डोकं उठवतो , दरवळतो आणि पानांमधून फुलं आपण शोधून काढतो.
एका कंजूस माणसाने खीर केली होती, खीर खाणार इतक्यात दारावर एका याचकाची थाप पडते तो त्याच्याकडे खायला मागतो मग कंजूस माणूस त्याला पान तोडून आणायला सांगतो तो केळीचे पान आणतो कंजूस माणूस त्याला खूप रागवतो की एवढं मोठं पान आणलं आहेस तू की मलाच खीर उरणार नाही, त्याला दुसरे त्याहून छोटे पान आणायला पाठवतो तो दुसरे पान आणतो मग तो मोठा आकार बघून त्याला परत पाठवतो असं करत करत याचक शेवटी बोराचे पान घेऊन आल्यावर तो त्यावर त्याला खीर वाढतो म्हणजे केवढीशी खीर नाही का ?
पण ही गोष्ट वाचताना पानांचा साईज ,आकार अशी सगळ्याची आपल्याला माहिती कळत जाते. अशी बोराच्या पानांची आणि खिरीची गोष्ट.
विषुववृत्तावर येणारी रेन फॉरेस्ट मधली झाडे निराळीच .योग्य वातावरणाने झाडे इतकी गच्च वाढतात की सगळ्यांना सूर्यप्रकाशच मिळेनासा होतो .मग काही वृक्ष खूपच उंच वाढतात आणि उंच आकाशात पानांची गच्च जमीन तयार होते. ती पानांची कॅनोपी इतकी घनदाट असते की त्यावर काहीतरी अंथरून माणसं आरामात चालू, फिरू, बसू ,उठू शकतात राहू शकतात . केवढी गंमत आहे ना?
आपल्यासारखेच पशुपक्षीही पानांचा सुयोग्य उपयोग करून घेतात. शिंपी पक्षी पानं जोडून त्यावर चक्क टाके घालून आपला खोपा तयार करतो तर सर्वात विषारी असणारा इंडियन किंग कोब्रा हा नाग बांबूच्या वाळलेल्या पानांचा ढीग आपल्या शरीराने करून त्याच्या आत पिल्ले प्रसवतो आणि पिल्लं मोठी होईपर्यंत या पर्णकुटीचं रक्षण करतो .
कुत्री मांजरं आणि प्राणी पोटदुखीवर उपाय म्हणून गवत खातात आणि त्या गवताला फेसासकट ओकतात आणि पोटदुखीला रामराम करतात. जंगलाच्या गोरिलांचा तर एक आगळावेगळा प्रयोग !पोटातले जंत काढण्याचा. विशिष्ट प्रकारची पाने ते जिभेने घड्या करून खातात .ही पाने पचन न होता तशीच्या तशी विष्ठेद्वारे फोल्डेड स्वरूपातच बाहेर पडतात, त्या पानांच्या प्रत्येक घडीत असंख्य जंत सामावलेले असतात. आपोआपच इतके सारे जंत
पोटाबाहेर ! हे सगळं या प्राण्यांना उपजतच कसं कळलं असेल?
सगळ्यात गमतीचा प्रकार म्हणजे जगण्यासाठी शेवाळ आणि बुरशी एकत्र होऊन काम करतात एक नवीनच लायकेन नावाचं छोटं झाड तयार होतं .त्यातला शेवाळाचा हिरवा भाग सूर्यप्रकाशापासून अन्न निर्माण करतो आणि सूर्यप्रकाश मिळालाच नाही तर त्यातला फंगस हा भाग त्याच्या जवळपासच्या कुजणाऱ्या वनस्पती /प्राण्यांपासून आपलं अन्न मिळवतो .म्हणजे कुठल्याही परिस्थितीत लायकेन जिवंत राहते.किती चांगली युती आहे नाही का ? हे सिंबायोसिस अगदी अतूट शेवटपर्यंत टिकणार .
तुतीचे पान रेशमाच्या अळ्यांचं महत्त्वाचं अन्न आहे हे कर्नाटकातल्या आपल्याला अगदी पक्क माहिती आहे.
पानझड /पानगळ सुरू होते आणिआपल्याबरोबर विषारी , झाडाला नको असलेली द्रव्य घेऊन झाडापासून पाने स्वतःला वेगळं करतात गळून पडतात .मुख्य झाडाला निरोगी वाढू देतात. आपलं जीवन देऊन झाडाला खत पाणी पुरवतात .खरंतर पाने ही झाडांची बँक आहे पण आपलं काम संपताच,जगाचा निरोप पाने घेतात आणि त्यांची जागा परत नवीन कोवळी पाने घेतात .जीवनातलं केवढं मोठं सत्य आपल्याला जाणवून देतात.
ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, पत्रे पुष्पे ,फळे ,मुळे नाना वर्ण नाना रसाळे!
किती वर्णन करावे तेवढे कमीच. पानवेल्हाळेपणा थांबवते, ऋतुचक्रातून फिरणारी ही हरितपर्णी अशीच निरंतर टिकून राहो अशी आशा करते. पानोपानी गुज तुम्हीही करावं अशी अपेक्षा धरते .
विद्या पळसुले.

ओळखा ही फुले (उत्तर पुढच्या अंकात )
