सनविवि विनंती विशेष साहित्योंमेषच्या निमित्ताने वाचकांना विनंती

साहित्योंमेषच्या निमित्ताने वाचकांना विनंती

सनविविने साहित्योंमेष ही अभिनव स्पर्धा २०२२ या वर्षभरात राबवली. बेंगळुरुमधल्या आणि अन्य ठिकाणच्या मराठी वाचकांनी या स्पर्धेतल्या लेखनाचा आस्वाद घेतला. आता १२ महीने १२ लेख ही संकल्पना घेऊन आलेली स्पर्धा संपली आहे. लिखाणातलं सातत्य हा या स्पर्धेचा महत्वाचा पैलू होता. हे सातत्य स्पर्धेंनंतर टिकून रहाणं आवश्यक आहे. या स्पर्धेतल्या किंवा अन्यही लेखकांना सनविविच्या वाचकांनी या कामी मदत करावी अशी विनंती करायला हा लिखाणप्रपंच करतो आहे.

स्पर्धेमधले विषय स्पर्धेच्या आयोजक/ परीक्षकांनी दिले होते. ती भूमिका आता वाचकांनी घ्यावी अशी विनंती आहे. प्रस्ताव असा – वाचकांनी सनविविच्या संपादकमंडळाकडे विषय द्यावेत. सनविवित छापून द्यावेत वा संपादकांकडे वैयक्तिक द्यावेत. सामाजिक द्यावेत, काल्पनिक द्यावेत, कोणतेही द्यावेत. मग संपादक मंडळाने दर महिन्यात आलेले विषय लेखकांपर्यंत पोहोचवायचे. लेखकांनी त्यातला आपल्याला हवा तो विषय निवडून पुढच्या महिन्यात आपली साहित्यनिर्मिती सनविविला द्यायची. स्पर्धा नाही. वाचकांना हव्या असलेल्या विषयावर स्वेच्छेने केलेले खुले लिखाण. संपादकमंडळाचे सदस्यही वाचक आहेतच, त्यामुळे तेही विषय देऊ शकतात. यामुळे साहित्यनिर्मिती हे सामूहिक कार्य होईल आणि मजा येईल असे वाटते. 

कळावे, वाचत राहावे ही विनंती.

आपला,

पुरुदत्त रत्नाकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *