आमची गृहसंस्था प्रशस्त आहे. ३०० बिर्हाड. ५ मजली ५ इमारती. लंबगोलाकार आखीव पदपथ. पदपथांच्या दुतर्फा विविध झाडं, वेली. बाकडी तर ठिकठिकाणी.
रात्रीचे जेवण आटोपून मी आणि रूपा अधूनमधून शतपावली करत असू, खासकरून न कर्त्याच्या वारी. माझे काही कार्यालयीन सहकारीही आमच्या गृहसंस्थेत रहात. व्हाट्सअँपवर आधी ठरवून त्यांच्यासोबत एकत्र फेर्या मारणे हा उपक्रमही होत असे. मी ढब्बू नसलो तरी आठवतय तेव्हापासून पुरेसा ऐवज होतो. करोनाच्या घरकोंबड्या काळात मात्र मी आणि रूपा दोघेही तुंदिलतनु झालो होतो हे मान्य केलेच पाहिजे. आज फेर्या मारायला गेलो तर वाटेत संकेत सोबतीला आला. त्याची चणच काडीपेहेलवानाची. त्याने नुकतीच कंपनी बदलल्यामुळे आता तो माजी सहकारी उर्फ मित्र झाला होता. संकेत ३-४ महिने परदेशवारी करून आला होता. रूपाची आकृति पाहून तो दचकला असे मला जाणवले.
माझ्याकडे लक्ष वेधून घेत मी म्हणालो, “मी योगासन शिबीर लावणार आहे. येत्या १ तारखेपासून गृहसंस्थेतच सुरू होतय.”
“योगासन शिबी… एक, एक मिनिट हं; हा कॉल मला घ्यायलाच हवा. आपण नंतर बोलू.” खिसे चाचपत तो बाकड्याकडे गेला.
नंतरचा आठवडा तो फेर्या मारायच्या वेळेला दिसला नाही. तो परत ३-४ महिने परदेशी गेल्याचे कळले. तो परत एकदा परतल्यानंतरची भेट झाली तो एक शनिवार होता.
“आज रूपावहिनी नाहीत?”
“ती फार नियमीत आहे. त्यामुळे ती मैत्रिणींबरोबर फेर्या मारते. मी रोज येत नाही. येतो तेव्हा तुमच्यासारखे सख्खे भेटेपर्यंत मी एकटा.” या ४ महिन्यांमध्ये माझं पोट बर्यापैकी आत गेलेलं होतं.
“रूपेश, अरे आत्ता लक्ष गेलं. वाः! शिबिराचा उपयोग छानच झालाय!”
“धन्यवाद. अरे पण मी शिबीर लावलंच नाही. कार्यालयीन कामकाजात दिनचर्या विस्कळीत होते. त्यामुळे अन्य उपक्रमांच्या ठराविक वेळा पाळणं जमत नाही.”
“हो रे. पण मग हा फरक कसा?”
“घरच्या घरीच प्रयत्न करतोय. खाण्यावर नियंत्रण, थोडा व्यायाम वगैरे. आश्चर्य म्हणजे माझ्याऐवजी रूपाने…”
“एक… एक मिनिट हं; साहेबांचा कॉल आलाय. आपण नंतर बोलू.”
लगेच रविवारी आम्ही परत भेटलो. फिरता फिरता तो समोर काही अंतरावर एकटक पाहतो आहे हे माझ्या लक्षात आलं.
“संकेत, तुझा दूरचा नंबर वाढला आहे, अशी तुला शंका होती. तपासला का?”
“हो. लक्षात ठेवून विचारलस बरं! वाढला आहे. लांबच्या वस्तूंची फक्त आकृती कळते.”
“तरीच समोरच्या घोळक्यातल्या सुबक आकृतीकडे टक लावून बघत होतास…” मी खोडी काढली आणि तो थोडासा ओशाळला. काही उत्तरणार एवढ्यात त्याचा भ्रमणध्वनी थरथरला.
“एक… एक मिनिट हं; एवढा फोन घेतो.”
शनिवार-रविवारी मला ठराविक वेळेला फेर्या मारणे जमत असे. त्यामुळे पुढच्या शनिवारी आमची परत गाठ पडली. परत एकदा तो त्या पाठमोर्या आकृतीकडे चोरून पाहतोय हे मला कळले आणि ते त्याला कळले.
“रूपेशराव, तळे राखी तो पाणी चाखी हेच खरं.”
“म्हणजे काय बुवा?”
“म्हणजे असं बुवा, तुम्ही काय नियोजन मंडळात असल्यामुळे नव्या सुबक आकृत्या ओळखत असाल. आमची काही ओळख नाही.”
“अरे?! उगाच बादरायण संबंध जोडू नको. ३०० बिर्हाडामधून नियमितपणे काही बिर्हाडं बदलत असतात. सगळ्यांना मी ओळखतो थोडाच? माझ्याकडे मुवइन मुवआऊटचं कामही नाहीये. पण ती आकृति मी ओळखतो हे मात्र खरं.”
“असू दे रे…”
आता तो त्या सुबक आकृतीच्या मागावर होता म्हणून रविवारीही भेटणार याची मला खात्री होती. रविवारीही विषय निघाला.
“आता एकदा सर्वसाधारण सभा बोलवा, म्हणजे सगळ्यांची ओळख करून घेतो… सुबक आकृत्यांसकट.” आजही दूर बघत तो म्हणाला.
“संकेत, रूपवती आहे ती.”
“वाः रूपेश वाः, भले शाब्बास. आधी म्हणे सुबक आकृती, आता म्हणे रूपवती! प्रगति आहे बुवा. आम्हाला इतक्या दुरून नीट दिसतही नाही आणि असं थेट कौतुकही करता येत नाही.”
“अरे, तसं नाही. रूपवती म्हण…”
“एक… एक मिनिट हं… …”
दरम्यान बुधवारी जादाची सुट्टी आल्याने मी जळमटे काढत होतो…घरातली! अचानक शीतलवहिनी इडल्या घेऊन अवतरल्या.
“कोण?… अग्गोबाई किती महिन्यांनी आगमन झालं आज. ये ये.”
“इडल्या आणल्यात. मी आत येत नाही. घरचे नाश्त्याला माझ्यासाठी खोळंबलेत.” वहिनी म्हणाल्या खरे, पण त्या रूपाच्या आजूबाजूने घराच्या आत बघायचा प्रयत्न करत होत्या.
“काय गं? काही शोधते आहेस का?”
“म्हंटलं, भाऊजी नाहीत का घरात?”
“वहिनी, आहे की मी. आत या आधी…”
“आहात होय. काय हो, कोण नवीन बाई रहायला आलीये सोसायटीमध्ये?”
“नवी बाई? मला नाही बुवा माहिती. तुम्हाला कोणी काही सांगितलं का?”
“अच्छा, असं सरळ सांगणार नाही तुम्ही. का कोल्हयाला द्राक्षं आंबट झाली आता? अगं रूपा, भाऊजी ना एका बाईवर लट्टू आहेत. तिच्यावर सुबक, रूपवती वगैरे विशेषणं उधळताहेत म्हणे.”
रूपाने गालात हसत वहिनींना घरात आणले.
“वहिनी, समजा मी कोणा आकृतीला सुबक वगैरे म्हणालो. तर तुम्हाला का मिरच्या झोंबताहेत?”
“झोंबणारच ना. हे म्हणाले की, जा. बघ. नव्या आलेल्या बाया कशा तंदुरुस्त राहतात, चवळीच्या शेंगेसारख्या. नाहीतर तू आणि तुझ्या मैत्रिणी. चाळीशीच्या ढोबळ्या मिरच्या.”
“अस्सं आहे तर. रूपा, यात तुलाही लपेटलं आहे बघ.” मी.
आता संभाषणाचा ताबा रूपाने घेतला,
“गपा हो तुम्ही. शीतल, तसं काही नाहीये गं. नंतर गोंधळ नको म्हणून यांनी मला आधीच कल्पना देऊन ठेवली आहे. अगं, मी वनिता मंडळातल्या मैत्रिणींबरोबर फेर्या मारते. हे वेगळे फेर्या मारतात. कधीकधी संकेत भाऊजीही त्यांच्याबरोबार असतात. आहारावर नियंत्रण आणि योगसाधनेमुळे माझ्यात किती फरक झालाय तू बघतेच आहेस. भाऊजींना दूरची माणसं ओळखता येत नसल्यामुळे त्यांना बदललेली मी ओळखू आले नाही.”
“बयो! म्हणजे रूपेशभाऊजी नाही… आमचे संकेतरावच लट्टू झालेत, तेही तुझ्यावर… काय हो भाऊजी तुम्हाला बरं चालतं ह्यांनी रूपावर लाईन मारलेलं?”
“… वहिनी, तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठताय. ती सुबक आकृती रूपा आहे हे त्याला अजूनही माहिती नाही…आणि सुंदर बायकोचा नवरा असणं ही न चालण्याची नाही, अभिमानाची गोष्ट आहे. नाही का?”
“… …” “… पण… पण मग तुम्ही ह्यांना सांगितलं का नाही?”
“खरंच सांगतो, मी प्रयत्न केला. पण त्याच्या भ्रमणध्वनिने बिब्बा घातला की संवाद कायम अर्धवटच राहतो.”
“… घरी जाऊन चांगली खरडपट्टी काढते.”
“वहिनी..वहिनी! उगीच कावताय माझ्या मित्रावर. तो काहीही अनैसर्गिक वागलेला नाही. मी या शनिवारीच सगळं मिटवून टाकतो.”
“अस्सं का? पण नक्की हं. शनिवारी ह्यांचा मोबाईल मात्र नक्की काढून घेणार मी.”s
“बर. बर. आणखी एक. रूपाने लावलेलं शिबीर तुम्हीही लावा आणि शतपावलीही सुरू करा. तुम्ही चुणचुणीत दिसायला लागलात की काय बिशाद आहे कोणाची इतर कोणाकडे बघायची!”
खरं तर मी खोडी काढली होती. पण बायकांचं वागणं समजतच नाही.
“इश्श! तुम्हीपण ना भाऊजी.” म्हणत वहिनी अश्या काही गोड लाजल्या की मी त्या लाजण्यावर लट्टू झालो. म्हणजे… तसं रूपाला वाटेल असं वाटून मी दोघींकडे आळीपाळीने बघितलं.
पुढच्या शनिवारी अपेक्षेप्रमाणे, दुर्मुखल्या चेहेर्याने, संकेतराव आले. समोर दूर सुबक आकृती होतीच. आमची चोरटी नजरानजर झाल्यावर मी विषयाला हात घातला.
“संकेत, आज दोन गुपितं सांगतो. एक, मी शुल्क भरूनही योगशिबीर करणार नाही म्हंटल्यावर माझ्याऐवजी रूपाने त्यात भाग घेतला. गुपित क्रमांक दोन, रूपाचं औपचारिक नाव रूपवती आहे.”
“म्हणजे ती … त्या… रूपावहिनी…”
“हो, हो. ती तीच.”
“नाही. नाही रे…”
“हो. हो रे…”
