— पंकज पंडित —
जुलै महिन्याची, एक शुक्रवारची संध्याकाळ: अलीटालीया कंपनीचे विमान बोस्टनच्या विमानतळाभोवती घिरट्या घालू लागले . “अटलांटिक सागरावरील बारा तासांचे नॉनस्टॉप उड्डाण आता लवकरच बोस्टनला उतरणार आहे” अशी हवाईसुंदरीकडून उद्घोषणा ऐकून माझे हृदय आनंदाने उचंबळून आले . प्रवाशांची सामानाची आवरा आवर , इमिग्रेशन , कस्टमचे फॉर्म भरणे, अशी लगबग सुरु झाली .
संध्याकाळच्या कलत्या सूर्यप्रकाशात, विमानाच्या खिडकीतून मला निळ्याशार अटलांटिक महासागरात, अनेक रंगीबेरंगी शिडाच्या नावांची भाऊ गर्दी दिसली . बोस्टन “डाउन टाऊन”चे ओझरते दर्शन झाले; चकाकत्या आरशाच्या गगन चुंबी इमारती, रस्ते आणि उड्डाण पुलांचे जाळे , त्यावर वेगाने धावणाऱ्या , लाल चुटुक दिवे लावलेल्या मोटार गाड्यांची रांगाचं रांग……
१९८० चे दशक फॉरेनला(!),म्हणजे भारताबाहेर प्रवासाला जाण्याची माझी पहिलीच वेळ ! आणि त्याची अमेरिकेपासून सुरवात झाली याचे मला अप्रूप वाटत होते. माझ्या कंपनीने , मला दोन आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी बोस्टनला पाठविण्याचे ठरविले. त्यानंतर तीन महिने, पासपोर्ट काढण्यापासून ते “अवघड” अमेरिकन व्हिसा मिळविणे, परदेशी चलन घेणे , कोणत्या विमान कंपनीने जायचे किफायतशीर आहे हे ठरविणे , विमान प्रवासाचे आरक्षण करणे, इत्यादि ,यासारख्या धकाधकीच्या गोष्टी करण्यात गेला होता त्यात अनेक अडचणी आल्या.“
वसंत बापटांची अमेरिकाच्या प्रवासवर्णनपर “प्रवासाच्या कविता” नावाची सुंदर दीर्घ कविता आहे , उध्रूत करतोय
त्या घाशीरामाच्या तावडीतून सुटल्यावर , मी सुटकेचा निश्वास टाकला ! माझे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपवून, मी सुट्टी घेतली; माझ्या व्हि .जे. टी. आय. (VJTI ) अभियांत्रिकी विद्यालयातील, सहअध्यायीं मित्रांशी संपर्क केला; जे तेव्हा बोस्टन शहरातील, पटणी कॉम्पुटर्स, या माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील भारतीय कंपनीत कामाला होते.
आपण अमेरिका खंडाला एक प्रदक्षिणा घालूया का ? माझ्या सुपीक डोक्यातून एक भन्नाट कल्पना चमकली ! गाडी भाड्याने घेतली तर खूप खर्च होतो; मी अगदी तुटपुंज्या अमेरिकन डॉलर , केवळ $ ५००, एवढेच परकीय चलन , घेऊन होतो. मी कुठेसे वाचले होते, अमेरिकेत ड्राईव्ह-अवे (driveaway) गाडी फुकट मिळत असत; म्हणजे गाडी, दुसऱ्या कोणाच्या करिता,एका शहरातून दुसऱ्या शहरात, चालवत नेली तर. कारण ज्याच्या मालकीची ती गाडी असते , त्याला ती चालवून नेणे जिकिरीचे वाटत असते आणि ट्रकनी नेणे महाग वाटते. मग असा गाडी मालक, आपली गाडी “ड्राईव्ह-अवे” कंपनीकडे सोपवितो आणि कोणी ती चालवीत आणतो का ? याची वाट बघतो . “येलो पेजेस” या टेलेफोन डिरेक्टरीमधून , अशा “ड्राईव्ह-अवे” कंपन्यांची माहिती मिळाली.
अटलांटिक महासागर ते पॅसिफिक महासागर प्रवास, मोटार गाडीने? दूरध्वनीवरून, ड्राईव्ह-अवे कंपनीशी संपर्क केला.“अहो , आम्हाला बोस्टन ते लॉस अँजेल्स, जाण्यासाठी गाडी मिळेल काय ?”
“हो ! या! तुम्हाला गाड्या दाखवतो !” त्यांनी आम्हाला अनेक गाड्या दाखवल्या, त्यातील आम्ही एक गाडी निवडली; ओल्ड्स मोबाईल (Oldsmobile) डेल्टा ९८, ३८०० cc, स्वयंचलित चालणारी ; ज्यात क्रूझ कंट्रोल , पॉवर विंडोवस, अशा तेव्हा अप्राप्य असणाऱ्या सुविधा होत्या. अगदी आलिशान , नवी कोरी, करकरीत गाडी आम्हाला फुकटात मिळाली. ती गाडी न्यायची होती , बोस्टन मधून फिनिक्स, या अरिझोना वाळवंटातील शहरात. त्यानंतर “ड्राईव्ह अवे” कंपनीकडून आम्हाला दुसरी गाडी मिळणार होती , फिनिक्सहून लॉस अँजेल्सला जाण्यासाठी. आमच्या प्रवासाचा विमा ड्राईव्ह अवे कंपनीने उतरविला होता. अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशन तर्फे (AAA) ट्रीपटीक(triptik) नावाचे नकाशे तयार करून मिळत असत. त्यात प्रत्येक पानावर, शंभर मैल रस्त्यांचे इत्यंभूत, चित्रमय वर्णनं असे. मग आम्ही जाण्याचा रस्ता तय केला, ज्यामध्ये उत्तर अमेरिकेतील सगळी प्रेक्षणीय स्थळे होती.
| टप्पा | अंतर | प्रेक्षणीय स्थळांची माहिती | छायाचित्रे | छायाचित्रे |
| बोस्टन ते नायगारा धबधबा | ८०० किमी | अमेरिकेतील मोठा धबधबा, जेथे कायम पाणी वाहत असते | ||
| नायगारा ते शिकागो | ८५० किमी | अमेरिकेतील न्यूयॉर्कशी तुलना करणारे मोठं शहर | ||
| शिकागो नंतर माऊंट रशमोर | १५०किमी | डोंगराच्या कपारीवर चार अमेरिकन राष्ट्रअध्यक्षांचे प्रचंड मोठे शिल्प केले आहे | ||
| माऊंट रशमोर ते येल्लो स्टोन | ८५० किमी | येल्लो स्टोन सुप्रसिद्ध अभयारण्य येथे सुप्त ज्वालामुखी असल्याने , अनेक नैसर्गिक चमत्कार बघायला मिळतात | ||
| येल्लो स्टोन ते ग्रँड कॅनीयान | १४४० किमी | ग्रँड कॅनीयान सह्याद्रीच्या कपारींची आठवण देणारी डोंगरांची रांग… | ||
| ग्रँड कॅनीयान ते फिनिक्स | ३५०किमी | अरिझोना या वाळवंटातील राज्यातल सर्वात मोठे शहर | ||
| गाडी बदलून फिनिक्स ते लास वेगास | ४८०किमी | अरिझोनाच्या वाळवंटातील मृगजळ-माया(वी) नगरी | ||
| लास वेगास ते डिस्नी लॅन्ड, लॉस अँजेल्स | ३७०किमी | डिस्नी लॅन्ड, युनिव्हर्सल स्टुडिओ |
भारतीय वाहन परवाना अमेरिकेत चालतो मात्र तेथे LHD(left hand drive) असते; आपल्या येथे रस्त्याच्या डावीकडून वाहने जातात. याउलट तेथे रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवायची असतात. कॅम्पिंग ग्राऊंड्सवर आम्ही मुक्काम करत होतो. सकाळी स्नानगृहात स्नान वगैरे आन्हिके आणि न्याहारी करून, पुढे कूच करत असू. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कॅम्पिंग ग्राऊंड्सवरील स्नानगृहात, गरम पाणी उपलब्ध होत असे!
अमेरिकेत सारेच परदेशी. त्यामुळे तेथील लोक , कोणालाच परके समजत नाहीत ; जर तुम्ही त्यांच्याशी, डोळ्यात डोळे मिळवून , त्यांच्यासारखे हेल काढून, इंग्रजी बोललात तर!
अमेरिकेत निसर्ग सौर्दर्य अप्रतिम आणि मुबलक आहे. हिरवीगार दाट जंगले, बारा महिने कायम वाहत राहणारे प्रचंड मोठे पाच तलाव, नायगारासारखे उत्पात करणारे धबधबे, वन्य प्राणी, प्रचंड मोठी अभयारण्ये, sequoia-महावृक्ष वगैरे
या ड्राईव्ह-अवे गाडीतून, आम्ही दहा दिवसात ७००० कि.मी. इतका स्वप्नवत, सुकर प्रवास केला. (काश्मीर ते कन्याकुमारीच्या दोन पट )यामध्ये आम्ही तीन टाइम झोन ओलांडले. प्रत्येक वेळी, आमचे घड्याळ एक-एक तासाने मागे केले. आम्हा चार जणात मिळून, (पेट्रोल, टोल, खाणे, ई) या सर्व सहलीचा, माणसी खर्च आला, फक्त $९० डॉलर्स ! परतीसाठी,मी लॉस अँजेल्सहुन बोस्टन, ग्रेहाउंड बसचे तिकीट($ ११०) काढले; ह्यूस्टन, अटलांटा, वॉशिंग्टन (डी सी) , न्यूयॉर्क वगैरे शहरे बघितली. तेव्हा एका डॉलरची रुपयात किंमत होती १३ रुपये. आज ती ७५ पर्यंत पोहोचली आहे ! सर्व अमेरिकेत या राष्ट्रीय महामार्गांचे, सार्वजनिक सुविधा, यांचे मोठे जाळे आहे. म्हणूनच इतका मोठा प्रवास आम्ही सहज करू शकलो. वसंत बापटांनी किती समर्पक वर्णन केले आहे या रस्त्यांचे !
या प्रवासाच्या शिदोरीवर, “ तेथे गेलोय अन ते केलंय” अशी दर्पोक्ती(कोलंबसचे गर्वगीत !) मी अमेरिकेत रहिवासी असलेल्या “अनिवासी भारतीयांसमोर” मारू शकतो! हे ही नसे थोडके ! प्रवास करण्याचा मुख्य उद्देश, आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात, अशा फुशारक्या मारणे, एवढाच असतो, नाही का?————
