— पंकज पंडित —
“हसा आणि लठ्ठ व्हा “असा वाक्यप्रचार पूर्वी रूढ होण्याचे कारण म्हणजे त्याकाळी लठ्ठपणा, डायटिंग हे केवळ हसण्याचा विषय होते. बहुसंख्य लोक किडीकिडीत असायचे आणि जाड होणं हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जात होते याउलट आता मात्र लठ्ठपणा हा सर्व जगभरातच सावर्त्रिक रोग झाला आहे लठ्ठपणाच्या रोगाचे लोण आता भारतातील सुखवस्तू, पांढरपेशा लोकांमध्ये आले आहेत ! आणि वाढलेले वजन कमी करणे, हा एक मोठा “उद्योगधंदा” झाला आहे! आत्ता नवीन वर्षाच्या सुरवातीला, वजन कमी करण्याचे संकल्प अनेक जण करतात. काही दिवसातच हे संकल्प हवेत विरतात. वाढलेले वजन मात्र स्थिर असते. अशा “वजन कमी करण्याच्या” प्रयोगांवर, चि. वि. जोशींपासून ते पु.ल. देशपांडे, या सारख्या लेखकांनी, हास्याची खसखस पिकवली आहे. माझा उद्देश, या “भारदस्त” विषयातील काही शास्त्रीय तथ्य सांगणं हे आहे.
१. एकदम १०-१५ किलो वजन कमी करणे,शक्य आहे का ? साधारणपणे वयाच्या १८ व्या वर्षी, शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर , खरे तर वजन स्थिरावले पाहिजे. तिशीत हळू हळू वजन, म्हणजे चरबी वाढायला सुरवात होते. (व्यायाम करून शरीर कमावले असले तर अपवाद वगळता) कंबर, पोटाचा घेर वाढायला लागतो आणि बघता बघता, परिस्तिथी “हाताबाहेर” जाते ! मध्यम वयात येण्यापर्यंत, सुखवस्तू पांढरपेशा व्यक्तीचे वजन, १० ते १५ किलोने वाढलेले दिसते. म्हणून वजन कमी करणे सुद्धा सावकाशिने केले पाहिजे; महिन्याला १ ते २ किलो. या गतीने, वजन कमी होऊ शकते. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी केल्यास, त्याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
२. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे हा व्यर्थ खटाटोप आहे, हे खरे आहे का ? व्यायाम करण्याने वजन कमी होत नाही हे खरेच आहे. वजन कमी करण्यासाठी, प्रामुख्याने, कमी उष्मांकाचा आणि सर्व पोषण मूल्ये असणारा , योग्य नियंत्रित आहारच आवश्यक असतो. वजन उचलण्याचे व्यायाम केल्यास हात, पाय आणि पाठीचे स्नायू बळकट होऊन , चयापचय क्रियेचा वेग वाढतो ; त्यामुळे हळूहळू वजन कमी होऊ शकते; मात्र वजन कमी करण्यासाठी, व्यायाम आवश्यक बाब नाही. चित्तवृत्ती उल्लहसित होणे , हा व्यायामाचा मोठा अनुषंगिक फायदा आहे. व्यायामाची जोड,आहार नियंत्रणाला देणे योग्य आहे, मात्र वजन कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक नाही असा निष्कर्ष तज्ज्ञ मंडळींनी काढला आहे. ( टीप १ )
३. फक्त दोन वेळेसच खाणे, उपासमार करणे, केवळ कच्या कोशिंबरी खाणे, हिरव्या भाज्यांचे रस काढून पिणे, कडू कार्ले खाणे , इ इ. याने वजन कमी होऊ शकते का ? उपासमार केल्याने वजन हमखास कमी होते हे खरे आहे. पण मग आजारपणातून उठल्यावर सुद्धा वजन कमी होते नाही का ? तर असे वजन कमी करणे, आरोग्याला घातक आहे. सतत भूक मारणे, काहीतरी खाऊन वेळ मारून नेणें असे अघोरी उपाय, फार दिवस चालू ठेवणे अशक्य असते. याचे मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन, आजार उदभवू शकतात. जेव्हा असे टोकाचे उपाय थांबतात, तेव्हा वजन काटा परत मूळ पदावर येतो !
४. काही विशिष्ट व्यायाम करून किंवा घट्ट पट्ट्या , कंबर पट्टे (पोटाला , मांड्याला) लावून , शरीरातील केवळ पोटाचा घेर, किंवा नितम्ब अशा जागीचेच वजन कमी करणे शक्य आहे का ? आपले शरीर हे अशा काही विशिष्ट जागांतीलच वजन कमी करू शकत नाही. वजन कमी होण्याची प्रक्रिया चालू झाली की असे दिसते की चेहेरा आधी उतरतो. याउलट पोट, कंबर, नितंब येथील चरबी सर्वात शेवटी जाते. सुकलेला, उतरलेला चेहेरा बघून, वजन कमी झाल्यासारखे वाटते पण ते खरे नसते.
५. वजन कमी करण्याची केंद्रे , (ज्या मध्ये सौना बाथ , स्टीम बाथ इ साधने असतात ) यात तापमान वाढवून, घाम गाळल्याने, वजन कमी होते का ? शरीरात २/३ इतके वजनाचे पाणी आहे. सौना /स्टीम बाथमध्ये या पाण्याच्या व्ययाने, लवकर वजन घटल्याचे दिसते पण अशी वजनघट, ही तात्पुरती असते. वजन कमी करण्याचे मुख्य अवयव, आपली फुफ्फुसे असतात. श्वास-उच्श्वास तीव्र वेगाने होतो, तेव्हा शरीरातील चरबीचे ज्वलन होते आणि फुफ्फुसाद्वारे उच्श्वासाने आणि घाम येऊन, वजन कमी होते वजन घटवताना, स्नायूंचा ऱ्हास टाळायचा असतो. “वजन कमी करणे” या ऐवजी “चरबी कमी करणे” हे उद्दिष्ट असायला पाहिजे” असं प्रतिपादन डॉ निखिल धुरंधर करतात. निखिल हा माझा “पा. टि. वि.” (पार्ले टिळक विद्यालय ) मधील वर्गमित्र आणि लठ्ठपणा या विषयातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचा तज्ञ्. “वजन वाढणं ही एक मोठी गुंतागुंतीची समस्या आहे. त्यावर सोपे उपाय शक्य नाहीत. रोजच्या आहारातील प्रथिनांची कमतरता आणि कमकुवत स्नायू, हे भारतीयांचे वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे” असं डॉ निखिल धुरंधर म्हणतात (* तळटीप १ पहा )
६. केवळ योगासने, प्राणायाम करून वजन कमी करता येते काय ? योगासाने केल्याने, वजन स्थिर राहू शकेल, घटणार मात्र नाही. प्राणायाम, योगासनाने मानसिक शांतीचा जरूर अनुभव येतो. हठयोगामुळे शरीरात लवचिकता येते. परंतु स्नायू शक्तिमान , बळकट होण्यासाठी ,विशेषतः वजन उचलण्याचे व्यायाम आवश्यक आहेत. तसेच रुधिराभिसरण चांगले होण्यासाठी, ५- १० किलोमीटर चालणे, सायकल चालविणे, पोहोणे, दोरीच्या उड्या, जिने चढणे असे व्यायाम,(झेपेल तेव्हडा) करणे आवश्यक आहे.केवळ कपालभातीसारखे प्राणायाम करून वजन कमी करणे शक्य नाही . कपालभाती करण्यासाठी, सुदृढ फुफ्फुसे असणे, अत्यावश्यक आहे. त्यासाठी इतर व्यायाम प्रकार (ऐरोबिक व्यायाम ,वजन उचलण्याचे प्रकार) करणे जरुरी आहेत.
७. प्रथिनयुक्त पावडरी , भूक मारण्यासाठीची (हर्बल) औषधे, जीवनसत्त्वांच्या गोळ्या , वजन कमी करण्यासाठी युक्त आहेत का? शरीराला ४२ अन्नघटकांची, त्यामध्ये दहा प्रथिने, पंधरा जीवन सत्वे, सोळा खनिजे आणि चरबीयुक्त तेल, यांची गरज आहे (* तळटीप १ पहा)याबरोबरच अन्नातील घटक शोषून घेण्यासाठी, चोथ्याची(fibre) जरुरी आहे. प्रथिन युक्त पावडरी, गोळ्यामध्ये चोथा नसल्याने,शरीर हे पदार्थ उत्सर्जित करते.याचा शरीराला काहीच फायदा होत नाही.८ वजन कमी करायला जिम मेम्बरशिप आवश्यक आहे का ? नेहेमी जिम मेम्बरशिप मध्ये , वजन कमी करण्याची, पैसे परत देण्याची हमी देतात. पण यामध्ये खरी हमी, फक्त पैसे फुकट जाण्याची असते ! घराच्या घरी नेमाने, सूर्यनमस्कार, जोर , बैठक आणि घराबाहेर सायकलिंग,५- १० किलोमीटर चालणे, पोहोणे किंवा काही खेळ खेळणे यासारख्या व्यायाम प्रकारची निवड करा . हे जिमप्रमाणे कंटाळवाणे होत नाहीत. एकट्याने जमत नसेल तर मग व्यायाम भिडूची(exercise buddy) निवड करा. व्यायाम करण्यासाठी , रोज स्वतःचा, किमान एक तास वेळ, सवड काढून, राखून ठेवा.
९. योग्य आहाराच्या सल्ल्यासाठी कोणत्या डॉक्टरकडे जावे ? “डॉक्टर मी का खाऊ” या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रस्तावनेतच डॉ मालती कारवारकर म्हणतात की असा प्रश्न MBBS डॉक्टरना, न विचारता डॉक्टरेट (Ph.D) घेतलेल्या आहार तज्ज्ञ (dietitian)याना विचारणे योग्य आहे.
१० वाढलेले वजन,कमी करण्याचा खटाटोप करण्यापेक्षा, वजन वाढूच न देणे, हे शहाणपणाचे नाही का ?
या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही ! हसा आणि लठ्ठ रहा !——————————————————————-
* Note 1 Ref “Fat Loss Diet” -book by Dr.Nikhil Dhurandhar, “Doctor what I should eat” -Book by Dr.Malati Karwarkar