राजेन्द्र पडतुरे व्दारा लिखित
महाराष्ट्राचे काही महत्वाचे संतकवी
या लेख मालेतील व्दितीय पुष्प
संत श्री ज्ञानेश्वर महाराज
१२७५ ते १२९६
संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात वारकरी संप्रदाय स्थापन केला. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्री कृष्णाची शिकवण सांगणार्या महान भगवद्गीतेचा संदेश ओवीबध्द निरूपण स्वरूपात आजपासून सुमारे ७०० वर्षांपूर्वी त्या काळी प्रचलित प्राकृत भाषेत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले होते.
गोदावरी नदीच्या तिरी वसलेल्या श्रीक्षेत्र पैठण जवळील आपेगाव येथे स्थायिक श्री विठ्ठलपंत व रूक्मिणीदेवी या धार्मिक वृत्तीच्या सत्शील पती –पत्नीच्या
चारपैकी दुसरे अपत्य म्हणजे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठलपंत अगदी तरूणपणातच वेदशास्त्र पुराणांत पारंगत होते. एैहिक जगापासून अलिप्त असलेले विठ्ठलपंत विरक्त वृत्तीने रहात असत. ते अधिक काळ नामस्मरण, तीर्थक्षेत्रांच्या वार्या करत असत. एकदा असेच वारी करत असताना ते पुण्यापासून मात्र ३० किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र आळंदी येथील मारूती मंदिरात वास्तव्य करून असताना तेथील पंडित सिध्दोपंत महाराज विठ्ठलपंतांच्या देवभोळया स्वभावाने आकृष्ट झाले व त्यांनी विठ्ठलपंतांचेबद्दल आवश्यक माहिती मिळवून विठ्ठलपंत, त्यांची कन्या रूक्मिणीसाठी योग्य वर असल्याचे मनोमन ठरवून टाकले. विठ्ठलपंतांनी प्रथमतः पंडित सिध्दोपंत महाराजांचा प्रस्ताव मान्य केला नाही; परंतु ध्यान लावून विचारांती त्यांचा प्रस्ताव मान्य केला आणि पंडित सिध्दोपंत महाराजांची कन्या रूक्मिणीशी त्यांनी लग्न केले; आणि आपल्या पत्नीसह काही काळ आळंदीतच वास्तव्य केले; परंतु सिध्दोपंतांनी जावयाचे संसारात लक्ष लागत नाही, हे पाहून रूक्मिणीसह जावयाला आपेगाव येथे पाठवून दिले. आपेगाव मुक्कामी विठ्ठलपंतांच्या माता पित्यांनी पुत्र व सून यांचे मनोमन स्वागत केले.कालांतराने त्यांच्या माता–पित्यांनी मृत्युपूर्व आपल्या व्यवसायाची जबाबदारी मुलाला सोपवली. परंतु माता–पित्यांच्या मृत्युपश्चात विठ्ठलपंतांचे लक्ष संसारात नाही, हे पाहून सिध्दोपंत विठ्ठलपंत व रूक्मिणीला आळंदीस आपल्या देखरेखीखाली परत घेऊन गेले. विठ्ठलपंतांचे लक्ष अद्यापही संसारात रमत नव्हते. एके दिवशी सकाळी इन्द्रायणी नदीत स्नान करण्यासाठी म्हणून गेलेले विठ्ठलपंत घरी परतण्याऐवजी स्नान संध्या उरकून वाराणसी मुक्कामी पायी रवाना झाले. तिथे संत रामानन्द स्वामींशी त्यांची गाठ पडली. आपण गृहस्थाश्रमात संसारी असल्याचे स्वामींना न सांगता त्यांनी रामानन्दस्वामींकडून संन्यस्त म्हणून दीक्षा घेतली व त्यांना स्वामींनी रिवाजानुसार सन्यासी म्हणून चैतन्याश्रम हे दुसरे नाव दिले. धर्मशास्त्रांच्या नियमानुसार पत्नीची पूर्व संमती प्राप्त केल्या खेरीज संसारी पुरूषाला संन्यस्त म्हणून दीक्षा घेता येत नसते. परंतु विठ्ठलपंतांनी आपण संसारी असल्याचे सांगितले नसल्याने रामानन्दस्वामींकडून त्यांना संन्यस्त म्हणून दीक्षा देण्याची नियमबाह्य कृती नकळत घडली होती. एकदा रामेश्वरची तीर्थयात्रा करत असताना स्वामी आळंदी येथे आराम करण्यासाठी थांबले. विठ्ठलपंत घर सोडून गेल्यानंतर भजन,पूजनात आपला पूर्ण वेळ रूक्मिणी
घालवत असे. रूक्मिणीबाई त्यांच्या दर्शनासाठी तेथे येऊन पोहोचल्या, जिथे स्वामी आराम करत होते. स्वामींना रितसर वाकून नमस्कार केल्यावर स्वामींनी रूक्मिणीला अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, असा आशीर्वाद दिला. त्यावर रूक्मिणी उपहासाने हासली. स्वामींनी तिला आशीर्वाद दिल्यावर या उपहासात्मक हासण्याचे कारण विचारताच तिने, ज्या स्त्रीला तिच्या नवर्याने सोडून दिले असेल, ती काय अखंड सौभाग्यवती आणि पुत्रवती होणार,असा उलट प्रश्न स्वामींना विचारला. स्वामींनी रूक्मिाणीला तिच्या पतीची काही माहिती विचारताच स्वामी समजले, की ज्याला आपण चैतन्याश्रम या नावाने संन्यस्ताची दिक्षा दिली आहे, तो विठ्ठलपंत रूक्मिणीचा नवरा असून आपल्याशी खोटे बोलला आहे. आळंदीतच आपली तीर्थयात्रा संपवून रामानन्दस्वामी वाराणसीला परत परत गेले, व तिथे पाहोचताच चैतन्याश्रम उर्फ विठ्ठलपंतास आपल्या कृत्याचा जाब विचारला, कारण स्वामी स्वतः सुध्दा या प्रकारात गुन्हेगार होते. चैतन्याश्रम उर्फ विठ्ठलपंतांनी आपला गुन्हा कबूल केल्याकारणे काही कठोर शिक्षा न करता स्वामींनी त्याला आळंदीला परत जाऊन रूक्मिणी बरोबर यथावत संसार चालू करून पश्चात्ताप करण्याची संधी दिली. तथापि आळंदीतील ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले; कारण संन्यासाश्रम त्यागून पुनरपि गृहस्थाश्रमात येण्यास त्यांच्या मते धर्मशास्त्र परवानगी देत नाही. तरीही आपल्या गुरूच्या आदेशानुसार समाजानी वाळीत टाकल्यानंतरही विठ्ठलपंतांनी रूक्मिणी बरोबर संसार करत वेद आणि शास्त्राभ्यास केला. कालांतराने त्यांना अनुक्रमे १२७३ साली निवृत्ती, १२७५ साली ज्ञानेश्वर (ज्ञानोबा), १२७७ साली सोपान आणि १२७९ मध्ये मुक्ताबाई, ही चार आपत्ये झाली. निवृत्ती सात वर्षाचा होईपर्यंत सर्व काही यथासांग पार पडले. हिन्दू धर्मशास्त्रानुसार माणसाचे जीवन चार आश्रमांत विभागलेले असून ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थाश्रम व सरते शेवटी संन्यासाश्रम असे आश्रम जीवनात पार पाडावयाचे असतात. सातव्या वर्षी मुलाची मुंज करून त्याला ब्राम्हण्याचा धर्म म्हणजे ब्रम्हचर्याश्रमाचे पालन करावयाचे असते. विठ्ठलपंतांनी आळंदीच्या ब्राम्हण समाजातील मान्यवरांना मुलांवर योग्य संस्कार करून त्यांचे व्रतबंधन करण्याची विनंती केली; परंतु संन्याशाच्या मुलांवर संस्कार करत नसतात; कारण ते संन्यस्थावस्थेतून गृहस्थाश्रमात नियमबाह्य कुसंस्कारित पध्दतीने मात्र वासनापूर्तीच्या पापातून उत्पन्न झालेली अपवित्र संतान असते, असा युक्तिवाद आळंदीतील मान्यवर
ब्राम्हणांनी केला व विठ्ठलपंतांची विनंती अमान्य केली. अत्यंत उव्दिग्नावस्थेत विठ्ठलपंत रूक्मिणी व चारही संतांनांसह बारा ज्योतिर्लिंगापैकी नाशिक जवळ त्रयंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले. तेराव्या शतकात हा प्रदेश म्हणजे भयावह जंगल होते, जिथे हिंस्त्रश्वापदे मुक्तसंचार करत असत. एके रात्री देवळाची प्रदक्षिणा करत असता एका क्रूर वाघाने त्यांच्यावर आक्रमण केले. सर्वजण जीव वाचवण्यासाठी चारही दिशांना पळत सुटले, व अशा अवस्थेत सारे कुटुंब एकमेकांपासून विखुरले गेले. अंजनी पर्वताच्या एका गुहेमध्ये निवृत्ती येऊन पोहोचला, जिथे नवनाथांपैकी एक गहनीनाथ काही काळापासून वास्तव्य करून होते. निवृत्तीच्या ज्ञानामुळे प्रभावित गहनीनाथांनी त्याला नाथसंप्रदायात सामील करून घेऊन त्याला नाथसंप्रदायाची दीक्षा प्रदान केली. रामकृष्ण हरी हा गुरूमंत्र देऊन निवृत्तीचा निवृत्तीनाथ गहनीनाथांनी करून त्यांना कृष्णभक्तीचा प्रसार व प्रचार करण्यास सांगितले. निवृत्ती जातीव्यवस्थेतून बहिष्कृत असल्याला न जुमानता त्यांना नाथ संप्रदायात सामील करून घेण्यात आले; कारण वेद जातीव्यवस्था मान्य करत नाहीत. विठ्ठलपंतांच्या चारही संततींची बुध्दी अत्यंत तल्लख होती; तरीही ब्राम्हण समाजातून बहिष्कृत असल्याने वडीलांकडून वेद आणि शास्त्रांचे मुबलक ज्ञान प्राप्त केले असूनही समाजाच्या हेकेखोर ठेकेदारांच्या धोरणांमुळे त्यांना कोठेही ब्राम्हण समाजाच्या बैठकींत, शाळांमध्ये प्रवेश दिला जात नसे. विठ्ठलपंतांनी आपेगावी ब्राम्हणसभेला त्यांना प्रायश्चित्त करायची व मुलांना बहिष्कारमुक्त करायची विनंती केली असता आपेगावच्या ब्राम्हण समाजातील मान्यवरांनी धर्मशास्त्रााच्याआधारे त्यांना कठोर व निष्ठूरपणे मृत्युदंडाशिवाय विठ्ठलपंतांना दुसरा मार्ग नसल्याचा निर्णय दिला. अत्यंत जड अंतःकरणाने विठ्ठलपंत व रूक्मिणीबाई असहाय्य अवस्थेत मुलांना आपेगावी सोडून प्रयाग येथे गंगेत जीव देऊन मुलांना निराधार करून जगाचा निरोप घेऊन गेले. चारही अनाथ मुले भिक्षा मागून आपली पोटे भरून राहू लागली. काही काळ लोटल्यावर मुलांनी सर्व प्रकारे शुध्दीकरण, पापक्षालन प्रक्रिया करून पैठण मधल्या ब्राम्हणसभेत याचना केली; परंतु तिथेही उच्चभ्रू ब्राम्हण मंडळींना या अनाथ मुलांची दया आली नाही. ज्ञानेाबा १२ वर्षे वयाचे असताना सन १२८७ मध्ये मुलांच्या एकूण वर्तणूकी वरून पैठणमध्ये त्या व्देष्टया उच्चभ्रू ब्राम्हणमंडळींना कोठेतरी दयेचा पाझर फुटला आणि अनाथ मुलांवर दया दाखवून त्यांना लग्ने करून मुलं होऊ न
देण्याची अट ठेवून ब्राम्हण समाजात पुनःप्रवेश देण्याचा ठराव पारित केला. त्या वेळी भ्राता निवृत्तीनाथाने आपले धाकटे बंधू ज्ञानोबाला नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन भगवद्गीतेवर भाष्य करायची आज्ञा दिली. अशा प्रकारे मानवजातीच्या इतिहासातील ती एकमेव घटना होती, की अवघ्या चौदा वर्षे वयाच्या गुरूने आपल्या बारा वर्षीय शिष्याला मानवजातीला आदर्शभूत आशादायी स्त्रोत ठरेल, असे काही लिहिण्यास सांगितले. आता ती मुले प्रवरा नदीच्या काठी नगर जिल्हयातील नेवासे गावी येऊन राहू लागली. नेवासे मुक्कामी आल्यावर ज्ञानोबाने भगवद्गीतेवर भाष्य लिहिण्यास प्रारंभ केला. इथे ज्ञानोबाने भक्ती सम्प्रदायाच्या व नाथ संप्रदायाच्या अनुयायांसाठी प्रवचने करायला सुरूवात केली. सच्चिदानंदबाबा नामक एक ब्राम्हण ज्ञानोबा जे सांगतील, ते लिहून घेत असे. या सच्चिदानंदबाबां बद्दल एक आख्यायिका आहे, की निवृत्तीनाथांबरोबर ज्ञानोबाचे ज्या दिवशी नेवासे शहरात आगमन झाले होते, त्याच दिवशी सच्चिदानंदबाबांना देवाज्ञा झाली होती, आणि त्यांच्या पार्थिवदेहाला ज्या वैकुंठभूमीवर अग्नी द्यावयाचा होता,तिथे सौदामिनी, त्यांची पत्नी;पतीबरोबर सती जाण्यासाठी तयार झाली होती. कोणीतरी सौदामिनीला सुचवले होते, की सती जाण्यापूर्वी नेवासे येथे आलेल्या कोणा एका संत पुरूषाचा तिने आशिर्वाद घ्यावा. ज्ञानोबा एका झाडाखाली ध्यानमग्न असताना सौदामिनी त्यांच्यासमोर नतमस्तक झाली असता ज्ञानेबाने तिला अखंड सौभाग्यवतीभव असा आशिर्वाद दिला. त्यांचे ध्यान संपताच ज्ञानोबांनी परिस्थितीचे आकलन करून घेऊन गुरूच्या आज्ञेनी आपल्यातील योगशक्तीच्या बळावर ईश्वराचे स्मरण करून सच्चिदानंदबाबाला पुनःजीवन दिले. अशा प्रकारे पुनर्जीवन प्राप्त करून सच्चिदानंदबाबा कृतज्ञताभाव ठेवून ज्ञानदेवांचे आजीवन निष्ठावान भक्त झाले. संत नामदेव, ज्याने लहानपणी पांडूरंगाला नैवेद्याच्या ताटातून घास भरवून जेवायला घातले होते, एकचित्त होऊन श्रवण करणारे ज्ञानोबाचे परम भक्त झाले होते. ज्ञानोबा व नामदेव पंढरपूरातच भेटले होते व त्यांची चांगली मैत्री झाली होती. ज्ञानोबांनी ही गोष्ट जाणून घेतली होती की नाथ संप्रदाय ज्या योग मार्गाला अत्यंतिक महत्व देत असे, तो सामान्य माणसासाठी इतका सरळ व सोपा नव्हता. जात–पात, धर्म, लिंगभेदादि सर्व बंधनांपासून मुक्त असा भक्तीमार्ग हा योगमार्गाच्या तुलनेत सुकर होता. जातीने शुद्र व कर्माने शिंपी असलेल्या त्यांच्या परमप्रिय मित्र नामदेवाच्या प्रभावाने ज्ञानदेवाला भक्तीमार्ग योग्य वाटला.
आयुष्याच्या बाराव्या वर्षी सन १२८७ मध्ये ज्ञानोबाने भावार्थदीपिका नावाने गीताभाष्य लिहिण्यास आरंभ केला होता, आणि १२९० साली अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी हे कार्य संपूर्ण केले. भावार्थदीपिका लिहून पूर्ण झाल्यावर नामदेवाच्या त्यांच्यावर वाढणार्या प्रभावा कारणाने ज्ञानोबाने भक्तीमार्गचा अवलंबच केला, असे नव्हे, तर भक्तीमार्ग त्यांनी पुढाकार घेऊन पुढे चालवला. वारकरी सम्प्रदाय पुढे भक्तीमार्गावर चालत राहिला. या वारकरी सम्प्रदायानुसार आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करून पांडूरंगाचे दर्शन घेण्याची प्रथा आजतागायत चालू आहे. पांडूरंगाला कृष्णाचा अवतार मानला जातो. पांडूरंगाच्या भक्तांना वैष्णव मानतात. पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मस्तकी शिवलिंगाचं प्रतिक आहे; त्यामुळे वैष्णव आणि शिवभक्त एकपंथीय असल्याचा भाव त्यांच्यात रूजला आहे. ही विठ्ठलमूर्ती मूळात कर्नाटकातून पुढे पंढरपुरास आणली गेली, असा उल्लेख आहे. या सम्प्रदायाच्या भक्तांसाठी ज्ञानोबांनी भक्तीवर आधारीत अमृतानुभवाची पद्य रचना केली. अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरीला सावतामाळी सारख्या वारकरी सम्प्रदायी आपला आदर्श मानतात. या पुढे वारकरी संप्रदाय उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतात पसरला. १२९६ साली आळंदीला परत आल्यावर ज्ञानेाबाने देहत्याग करण्याची इच्छा व्यक्त केली. नोव्हेम्बरातील आमावस्येच्या पंधरवड्यातील तेराव्या दिवशी ज्ञानोबांनी आळंदी मुक्कामी समाधी घेतली. आपल्या भावंडांना व नामदेवासारख्या मित्रांना अखेरचे अलिंगन देऊन ज्ञानदेव समाधिस्थ होण्यासाठी खोल भूयारात समाधीस्थळी उतरताच भूयाराच्या मुखावर एक विशाल दगड लावून भूयारमार्ग बंद केला गेला. अशा प्रकारे हा ज्ञानियांचा राजा अवघ्या एकविसाव्या वर्षी देहत्याग करून वैकुंठवासी झाला. आळंदीवासियांनी या ज्ञानियाच्या राजाला भजन, किर्तनाच्या घोषात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या पाठोपाठ काही अंतराने निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाईंनीही या जगाचा निरोप घेतला. निवृत्तीनाथ मुक्ताबाईसह तापी नदीच्या काठी तीर्थयात्रा करत असताना आराम करण्या साठी थांबले असताना एका वादळात सापडले. वादळ, पाऊस आणि विजांच्या कडकडाटात मुक्ताई अदृश्य झाल्या. नंतर त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांनी देह ठेवला. सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड येथे देह
ठेवला. जगाला ज्ञानप्रकाश दाखवून या महान परिवारजनांचा अंत झाला, पण आजही त्यांच्या ज्ञानप्रकाशाने जग उजळून निघते. चारही मुले आध्यात्मिकदृष्टया महान प्रभावशाली व्यक्तिमत्वे होती. किशोरावस्थेत असतानाच मुक्ताबाई चांगदेव नामक एका अत्यंत प्रभावशाली योगी पुरूषाची आध्यात्मिक गुरू बनली होती. या आध्यात्मिकदृष्टया महान प्रभावशाली भावंडांनी हे जग सोडल्यानंतर या राज्यातील सुख, समाधान, शांती, बंधूभाव, आनंदाचे,आध्यात्मिक शांतीचे सुवर्ण पर्व संपुष्टात येऊन भारतवर्षावर मुघलसाम्राज्याचे सावट पसरले. अशा अस्थिर भयावह आणि दहशतीच्या वातावरणात तीर्थक्षेत्रांच्या वार्या करणे अशक्य झाल्याने लोक ज्ञानेश्वरीचा ठेवा जतन करून घरातच बसून त्या ग्रंथांचे पठण करू लागले. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांचा लोकांनी पुढे आपल्या सोयीनुसार बदलत्या स्वरूपात ठेवा जतन करून या महान ग्रंथांचे पठण, स्मरण चालू केले. संशोधक ग्वाही देतात, की मूळ स्वरूपात शब्द, शब्दार्थ, भाव, आणि मूळ लेखातील ओवी संख्यांतही जरी फरक आला, तरी ज्ञानदेवांच्या मूळ मतितार्थास कायम ठेवून मूळ ज्ञानेश्वरीच्या बदललेल्या (सुधारित)आवृत्त्या निघाल्या. पुढे १५८४ साली (म्हणजे जवळ जवळ तीनशे वर्षांनंतर) संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध वेगवेगळया आवृत्त्यांचे संकलन करून मूळ लेखाशी अधिकाधिक साम्य राखून ज्ञानेश्वरी विश्वसनीय नवीन रूपात आणली.
मी प्रमुख संशोधन प्रकल्पांतर्गत समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक जर्मन भाषेत भाषांतरित करत आहे. या साठी मी जी प्रस्तावना लिहिली आहे, त्या मध्ये महाराष्ट्राचे महत्वाचे संतकवीं सम्बन्धी चर्चा आहे. त्या वरूनच मला ही लेखमाला लिहिण्याची कल्पना सुचली. संत