अजिता पणशीकर
माझ्या प्रिय मुलांनो,
का कुणास ठाऊक, पण आज तुम्हाला पत्र लिहावंसं मनापासून वाटलं. मला माहित आहे की तुम्ही लगेच हसत चिडवाल, “आई, तुझं वय होत चाललंय! सफाईने E-mail, WhatsApp, Insta, FB, वापरणारी तू…आणि आज अचानक पत्र!” पण हो, आज असं वाटलं खरं. बसल्या-बसल्या मागच्या आठवणी येत गेल्या आणि त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या.
माझ्या आयुष्यात तुम्ही दोघे किती महत्त्वाचे आहात हे जाणवलं. तसं पाहिलं तर सक्रिय ‘पालकत्व‘ करायचे मुख्य दिवस संपले असं वाटतं कारण तुम्ही दोघे ‘सजाण‘ तर केव्हाच झालात आणि स्वतःच्या आयुष्याची सूत्र आपल्या हाती घेण्याइतके समर्थही. मला अजूनही तुमच्या लहानपणचे दिवस अगदी कालचेच असल्यासारखे आठवतात. किती गडबडीचे आणि मस्तीचे…. तुम्हा दोघांचे वेगवेगळे छंद, उपक्रम, खेळ, प्रकल्प, मित्र-मैत्रिणी…..बदलत्या वयाप्रमाणे बदलते शारीरिक आणि मानसिक आव्हाने… किती रागवायचं, किती सोडून द्यायचं; किती शिस्त, किती मैत्री; किती लुडबुड, किती तटस्थपणा….ह्याचा एक आई म्हणून पडणारा सतत प्रश्न…. तुमच्या चुकांमधून तुम्हाला शिकू द्यायचं की मदतीचा हात सतत पुढे करायचा हे ठरवणं नेहेमीच सोपं नव्हतं. माझी भूमिका आता जरा बदलली आहे, पण तरीही माझ्यातला पालक अधून-मधून डोकावू पाहतो, तुमच्या अडचणींकडे-समस्यांकडे लक्ष ठेऊन असतो, त्या वरखाली होणाऱ्या परिस्थितीने हेलावून जातो, आणि पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात किती खोलात शिरायचं, किती सूचना द्यायच्या, किती बंधनं घालायची हे सवाल उभे करतो. असं वाटतं की वयं कितीही वाढली तरीही मनाची ही दोलायमान परिस्थिती काही बदलणार नाही!
तुम्ही लहान होतात तेव्हा ‘असं करा, तसं करू नका‘ असं सांगण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. तुम्ही निरागस होतात, जगाचे सर्वच अनुभव नव्याने घेत होतात. एक मुलगा-एक मुलगी म्हणून वेगळी-वेगळी आमिषं समोर येत होती. ओजस, तुला आठवतं? अकरावीत असतांना मित्रांबरोबर बारमध्ये जायला परवानगी नाही दिली म्हणून किती रागावला होतास. “एरवी मजा करायला ना नसते, मग आज ‘ना’ का?” असं ठणकावून विचारलंस. पण ह्यासाठी तू लहान होतास रे. त्याच वेळी नेमकी तिथे रेड पडली आणि तुझ्या ग्रुपमधल्या काही मुलांना ड्रग्स घेतांना पकडले. हे ऐकून तू खूप बावरून गेला होतास. मनातून आम्ही जायला ‘नको‘ म्हंटलं हे बरं वाटलं होतं. तू सांगितलं नाहीस, पण तुझा चेहेरा बोलत होता! ईशा, तुझ्या बाबतीत सुदैवाने असं काही घडलं नाही, पण नेहेमीच तुला “वेळेत झोप” चा उपदेश देत आलो. अगं, विश्रांती व्यवस्थित लागते गं! किती दमायचीस. पण हट्टाने पुस्तकं रात्रीच वाचायचीस! हे, आणखीन शिस्तीचे बरेच “डोस” (तुमच्या भाषेत :)) तुम्हा दोघांनाही, आम्ही दोघांनीही तुमच्या वाढत्या वयात पाजले. त्याबद्दल ‘सॉरी‘ आहे का? तर “अजिबात नाही” असंच मी आजही म्हणेन. तेव्हा त्या वयासाठी ती विचारपूर्वक आखून दिलेली सीमा होती. स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातला फरक सांगणारी बांधणी होती.
पण जसे तुम्ही वाढत गेलात, तसे योग्य-अयोग्य तुम्हाला कळत गेले. आमच्या शिस्तीच्या पलीकडे जाऊन स्वतः अनुभव घेऊन, आमच्या नियमांना तुम्ही पडताळून पाहिलंत. ते तुमच्या भल्यासाठी होते हा विश्वास बसला. आता एक गुपित सांगते तुम्हाला – आम्ही असू वा नसू, पण आयुष्यभर आमचे आवाज तुमच्या कानात ऐकू येतील. इतक्या वर्षांचं बाळकडू म्हणा, संस्कार म्हणा, कटकट म्हणा, नाहीतर भुंगा म्हणा… हे होणारच! पण बाळांनो, एक लक्षात ठेवा. आम्हीही माणसाचं आहोत. आमचंही काही सर्व बरोबर नाही हे आम्हाला माहित आहे. पण त्या–त्या वेळी, त्या–त्या परिसथितीनुसार, जे योग्य वाटलं तेच विचारांती केलं आम्ही. आमचे तेव्हाचे विचार आजच्या ह्या बदलेल्या वातावरणात योग्य वाटतीलच असं नाही. स्वतःची विवेकबुद्धी सांगेल ते करा. आमच्या मर्यादा ह्या कधीच तुमच्या भरारीच्या आड येऊ देऊ नका. तुमचं यश-अपयश तुमच्या निर्णयाच्या पायावर उभं करा. (थोडक्यात काय, तर पुढे आम्हाला दोष देऊ नका! 😉
तुमची वयं जशी तिशीच्या घरात येऊ लागली तशी आमची वयं ही साठीकडे झुकू लागली. तुमच्या वीस ते तीस वयापर्यंत आपण मैत्रीचं पर्व, धक्का खात का होईना, पार पडलं. कधीतरी वाटतं की आता चक्क आमचे पालक होऊ पाहत आहात! सारखं, “असं उचलू नको आई, पाठीला त्रास होईल तुझ्या”, “बाबा, मला नाही का बोलवायचं, मी आणलं असतं जाऊन”….असलं काही-बाही बोलत असता. आत्ता कळतंय मला तुम्हाला सारख्या सूचना दिल्यावर कसं वाटत असेल लहानपणी ते! 🙂
ओजस, ईशा, आपल्यासारखंच सर्व आई-वडील-मुलांमध्येही होत असेल का? तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण मी कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स शिकले होते. आपल्या ह्या पालक-पाल्याचा प्रवासाबद्दल बोलता–बोलता सहज माझ्या डोळ्यांपुढे ओळखीची ‘नॉर्मल कर्व‘ आली. मजा म्हणून थोडं विश्लेषण केलं. बघा पटतंय का तुम्हाला….
आडव्या ‘क्ष‘ अक्षावर पालकाचे वय आणि उभ्या ‘य‘ अक्षावर पाल्याचं वय मानलं तर घंटेच्या (बेल) आकाराची ‘सामान्य वक्र’ (नॉर्मल डिस्ट्रिब्युशन कर्व) आकृती तयार होईल. पालक आणि मूल मोठे होत असतांना ‘काळजी आणि शिस्त’ वाढत असतात आणि ते बऱ्याचदा त्या लहान मुलांना जाणवतही नाहीत. पण मग मूल पौंगडावस्थेत आणि तारुण्यात पदार्पण करतं तसं पालकाची ही वृत्ति वाढत जाते. ती त्यांच्या १५-२५ वयात (भारतात तरी) अधिक होत जाते (अगदी जाचक वाटेपर्यंत!). नंतर पाल्याच्या वयाचे वाढते आकडे यू-टर्न घेऊन खालच्या दिशेला जातील कारण ही काळजी, शिस्त कमी होत जाते. पण ‘क्ष‘ अक्षाकडे नीट लक्ष दिलंत तर ध्यानात येईल की पालक हा काळजी करणं कधीच सोडत नाही. मग मी बापडी तरी कशी काही वेगळं करणार? :))
नातं ही एक खूप गंमतशीर गोष्ट आहे. मग ते कुठलंही असो. ‘धरलं की चावतं आणि सोडलं की पळतं!‘ पण तुमच्यावरून मला हे लक्षात येतंय की सोडलं तर पळतंच असं नाही, पण आपल्यालाच ते धरायला आवडतं, हवं असतं! ही नाती आपल्या अस्तित्वाचा एक भाग बनून जातात आणि तीच आपली ओळखही होऊन जातात. अशावेळी पालकांना खूप जाणीवपूर्वक आपले नियम, काळजी, कमी करायचे असं ठरवायला लागतं. (अर्थात मलाही ते नेहेमीच जमलं नाही हा अनुभव तुम्हाला आलाच असेल 🙂). पण ते कधीच जमलं नाही तर मात्र ती चित्रातली ‘नॉर्मल कर्व‘ एक ‘ऍबनॉर्मल‘ आकार घेऊन वरच्या वरच राहील.
म्हणून मग मला आपल्या नात्यांचं मैत्रीच्या जवळचं होणारं रूपांतर खूप भावतं. म्हंटलं तर त्यात आपुलकी आहे, म्हंटलं तर स्वातंत्र्य आहे. एकमेकांसोबत वेळ देण्याची ओढ आहे, पण एकमेकांना त्यांचं आयुष्य घडवायची मुभा आहे. त्यात जाचक नियम नाहीत, काटेरी बंधनं नाहीत, घुस्मटवणाऱ्या अपेक्षा नाहीत. अलिप्तपणा नसून ओलावा आहे. ह्याचा अर्थ पालक म्हणूनचं आमचं अस्तित्व संपलं का? तर तसं नाही. तुमच्या पूर्ण आयुष्यातील शिस्त लावण्याचे, नव्हे संस्कार करण्याचे, दिवस म्हणजे फक्त सुरुवातीची वीस-एक वर्ष. त्यानंतरचा सर्व काळ एकत्र चर्चा करण्याची, गप्पा मारण्याची, एकमेकांची मतं जाणण्याची, सुख-दुःखात साथ देण्याचीच, मैत्रीचीच तर असायला हवी ना? आणि आपण सगळे मिळून त्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय. ह्याची खात्री असल्यावर ह्याहून अधिक मला काय हवं?
कळावे. असाच लोभ असावा!
प्रेमपूर्ण आशीर्वाद,
आई