सनविवि माहितीपूर्ण लेख पाल्य आणि पालक

पाल्य आणि पालक

अंजली संगवई

 एकदा थेटर मध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी बाजूला बसलेल्या कॉलेज मधील मुलींच्या एका  ग्रुपचा संवाद कानी पडला. त्यावरुन लक्षात आले की त्यापैकी एकीने सिनेमाला जात आहे हे घरी सांगीतलेच नव्हते. ते ती सहज सांगत होती, त्याचे तिला काहीच वाटत नव्हते. एक पालक म्हणून मला ते खटकलच. पूर्णपणे तिचीच चूक आहे असे मी म्हणणार नाही. 

पाल्य आणि पालक या नात्यात पारदर्शकता हवीच असे तेव्हा वाटून गेले, आणि कर्मधर्म संयोगाने या महिन्याचा लेखाचा विषय पण तोच आहे.

पाल्य आणि पालक हा विषय जेव्हा पण लिहायला, चर्चेला येतो तेव्हा कितीही नाही म्हटले तरी प्रत्येक पिढी आपल्या मागील पिढीशी तुलना करतेच करते. हे असे पुढेही पिढ्यान् पिढ्या सुरूच राहील. 

  खूपदा आपले पालक आपल्याशी कसे वागले हा संदर्भ थोडा का होईना तो आपल्या पालकत्वात राहतोच. कालांतराने, अनुभवाने त्यात बदल पण घडतो. आपल्या पालकांच्या काही गोष्टी आवडल्या त्याचे अनुकरण आणि नाही आवडल्या त्या आपल्या पालकत्वात आवर्जून टाळणे हा पालकत्वाचा भाग आहे. 

  आमचे आईवडील म्हणायचे की त्यांना त्यांच्या आई किंवा वडिलांच्या डोळ्यांचा धाक असायचा, आमची पिढी सांगेल आम्हाला छडीचा तसेच रागविण्याचा धाक असायचा, पण ही पिढी धाक या शब्दा पासून दूरच असते.असे प्रत्येक पिढी आपले अनुभव वेगवेगळे सांगेल. 

  हल्ली मारणे रागावणे म्हणजे महा भयंकर असे समजले जाते, मुलांच्या मनावर काय परिणाम होईल, ते डिप्रेशन मध्ये जातील वैगरे वैगरे……….तसे काही अंशी हे बरोबर पण आहे. मग पुर्वी नाही का मुल डिप्रेशन मध्ये जायची, तेंव्हाही मारले की वाईट वातायचेच रागही यायचा पण डिप्रेशन तेव्हा खूपसे प्रचलीत नव्हते. त्याचे मुख्य कारण म्हणजे घरात अवती भवती आजी-आजोबा, भरपूर भावंड थोडक्यात काय तर एकत्र कुटुंब पद्धती होती. पालकांनी रागवले तरी आजी आजोबा नी जवळ घ्यायचे, मग भावंडाबरोबर खेळात परत रमायचे. तेव्हां लहान मुलांसाठी डिप्रेशन चा जन्म झाला नव्हता. आता घरात मोजून तीन चार डोकी असतात. म्हणून मार तर दूर पण जोराचा ओरडा देखील मिळत नाही.

पिढी दर पिढी पालकत्वाची व्याख्या स्वरूप बदलत गेले.

पूर्वी आई वडिलांपेक्षा आजी आजोबा पालकांची भूमिका बजावत असे. एकतर लहान वयात पालकत्व, एकत्र कुटुंब पद्धती, , घरात खूप माणसांचा राबता त्यामुळे मुले आई वडिलांपेक्षा आजी यांच्या सहवासात जास्त असायची.

प्रत्येक पालक आधी पाल्य अवस्थेतून गेलेलाच असतो.

प्रत्येकाच्या पालकत्वात आपल्या पालकांच्या प्रभाव थोडया फार प्रमाणात असतोच. बदलत्या काळाप्रमाणे पालक पाल्य नात्यात पण बदल होतात. पालकांनी आपल्या पाल्याशी कसे वागावे याचे आता वर्ग घेतले जातात. एका अर्थाने चांगले आहे.

ज्या वातावरणातून तूम्ही येता त्या गोष्टींचा प्रभाव तुमच्या वागण्या बोलण्यात विचारसारणीत येतोच. पण जून्या सगळ्याच गोष्टी आता लागू होतात असे नाही. हे आपण समजून घेऊन बदल करावा लागतो म्हणजेच काय तर पालकत्वात पण बदल होतोच.

“तू ते नको करू किंवा तू आता जायचे नाही”

असे म्हंटले की हटकोर पणे त्यांना ते करायचे असते.

नाही म्हणण्या पेक्षा त्याचे चांगले वाईट परिणामा बद्दल चर्चा केली, मित्र/मैत्रीण म्हणून समजावले की त्याचे नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील. मला वाटत आपल्या पाल्याला समजून घेताना प्रत्येक पालक त्याच्या वयानुसार अनुभवानुसार त्यांच्या नितीतत्वात नक्कीच बदल करीत असतात.

“पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की  शिस्तबद्ध?”

माझे या प्रश्नाचे प्रश्नाचे उत्तर असेल..   मैत्रीपूर्ण!

पण १५/१७ वर्षा पूर्वी मला विचारले असते तर उत्तर कदाचीत शिस्तबद्ध असे असते. माझ्या मते पालकत्व देखील वयानुसार बदलत असते. हे माझे मत आणि अनुभवाचे बोल आहेत.

तसे बघता मैत्रीपूर्ण असेल तर पारदर्शकता राहते. शिस्तीत ती कुठेतरी कमी होण्याची शक्यता असते. 

पाल्य कधी चुकला तर तो ते पालकांना सांगेल, जे शिस्तीत वाढतांना घाबरून एखाद्यावेळी लपविण्याची शक्यता असते. शिस्त नाही म्हणजे पाल्याला वळण लागणार नाही असे नाही. मैत्रीपूर्ण संबंधात ते अजून योग्य प्रकारे होऊ शकते असे मला वाटते आणि अनुभव देखील. भीती युक्त आदर आणि आदरयुक्त वाटणारा आदर यात नक्कीच फरक आहे.

पालकत्व तसे म्हंटले तर एक परीक्षाच आहे. प्रत्येक पालक ती कसोशीने प्रयत्न करून देतं असतात. यश अपयश यातही आहे.

हल्ली सगळे आपापल्या व्यापात इतके व्यस्त असतात म्हणून

काळ पूर्वी पेक्षा दुप्पट वेगाने धावतो आहे असे वाटते. काळ मात्र कालही त्याच वेगात होता आजही त्याच वेगाने जात आहे. सगळयांना सगळ इन्स्टंट हव असत. मग ते यश असो किंवा प्रसिध्दी असो. यामुळे आपल्या मुलांवर आपण हे अवाजवी ओझे लादत नाही ना? याचा विचार व्हावा. 

“काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे” हे आपण सांगण्यापेक्षा त्यांना त्याची खात्री वाटते तो पालकत्वाचा विजय.

प्रथम पाल्यवस्था, मग पालकत्व, परत पाल्यवस्था हे एक  चक्र  आहे. प्रत्येक व्यक्ती या अवस्थेतून जात असते.

पाल्य कालांतराने जेव्हां आपल्या पालकांचा पालक होतो आणि आपले संस्काराचे प्रतिबिंब आपण त्याच्या पालकत्वात बघतो ना, ते खर सूख. मी म्हणेन हे खऱ्या अर्थाने पालकत्वाचे यश! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *