सनविवि कविता गोकुळाष्टमी

गोकुळाष्टमी

रेवती कुलकर्णी

गोकुळाष्टमी म्हणजे आपल्या लाडक्या कान्ह्याचा जन्मदिवस!

श्रावणातल्या अष्टमीला मध्यरात्री जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता आणि यमुनेला खूप पूर आलेला होता, तेव्हा आपल्या ह्या लाडक्या कान्ह्याचा जन्म झाला, तोही तुरूंगात!

कंसासारख्या वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी!

जन्मत: त्याला आईवडिलांना सोडून गोकुळात जावे लागले!

पण तिथे त्याच्या विविध लीलांनी त्याने धमाल उडवून दिली आणि गोकुळवासीयांच्या गळ्यातला ताईत बनला!

मध्यरात्री जन्मला ग कन्हैय्या देवकीच्या पोटी,

प्रलयंकारी यमुना जणू निघे कान्ह्याच्या भेटी,

वसुदेवाच्या शिरी पहुडे बालकृष्ण चोखीत मुठी,

स्पर्शता पाऊल चिमणे लागे पाण्याला ओहोटी,

कडाडे विद्युल्लता, मेघांची नभी झाली दाटी,

गोकुळी येतां कान्हा धन्य झाली यशोदेची ओटी!

अश्या ह्या कृष्णाचे बालपण अद्भूत प्रसंगांनी भरलेले आहे.

गोवर्धन पर्वत लीलया उचलून गोकुळवासीयांना इंद्राच्या कोपवर्षावातून सुरक्षित करून देवांचा राजा इंद्राला धडा शिकवला, तो प्रसंग मी वर्णिला आहे.

गोकुळी सूर घुमे मेघश्याम कान्ह्याच्या मुरलीचा,

रास रंगे कृष्णासवे राधा अन् गोपगोपिकांचा!

अचानक दाटती मेघ ,वरूणराजा कोपला,

विद्युल्लतेच्या कडकडात बरसू लागला!

रौद्रभीषण मेघगर्जनेत, कृष्णमेघ बरसती,

गर्भगळीत गोकुळवासी, गाईगुरे हंबरती!

आज्ञेने अहंकारी इंद्राच्या, कोसळती जलधारा,

बावरले गोकुळ बापुडे बघुनी जलप्रपात सारा!

गोकुळ भरले पाण्याने, मेघ दाटले डोळ्यात,

थांबे रास, घालती गोप कान्ह्याला आर्त साद!

अन् मंजुळ आश्वासक सूर मुरलीचे आले,

कान्हा इवल्या करांगुलीवरी गोवर्धन तोले!

मिळता आसरा प्रत्यक्ष त्या परमात्म्याचा,

निर्भय झाले जन, घुमे नाद जयजयकाराचा!

गर्वहरण झाले इंद्राचे, शरण येई राजा देवांचा,

पुजूनी त्या कान्ह्याला, दास होई त्या चरणांचा!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *