–डॉ. सौ.अनुराधा भागवत.
ऑगस्ट महिना, व श्रावण महिना एकत्र म्हणजे प्रत्येक दिवस महत्त्वाचा, सणाचा हे मुखपृष्ठ बघतांच लक्षात येते, हा अंक त्यामुळेच खास असणार, विशेषांकच होणार आणि तसा हा आहेच.
जुलै महिन्याच्या मंडळाच्या उपक्रमांबरोबरच ऑगस्ट महिन्याचे व गणेशोत्सवाचे काही आगामी कार्यक्रम आम्हांपर्यंत पोचले व आपण हजर राहू शकत नाही म्हणून चुटपुट लागली. तुम्हाला सर्वांना या आगामी कार्यक्रमांच्या शुभेच्छा. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा संपन्न झाल्याने विशेषांकाची उत्सुकता वाढली आहे.
आपले सर्व लेख व पूर्ण अंक वाचनीय आहे, पण एक गोष्ट अंक वाचतांना थोडी खटकली, एवढ्या आनंदी, उत्साहवर्धक महिन्याच्या अंकात त्यांत साजऱ्या होणाऱ्या उत्सवांबद्दल,दिवसांबद्दल एक ही लेख किंवा अनुभव नाही.दिलेल्या विषयांवर लेख लिहिण्यात मात्र यावेळेस विविधता भरपूर आहे.’चिंतना’साठी विषय वेगळे निवडले आहेत.बिघडले-घडले मुख्यतः पाककृतींवर आधारलेले असले तरी खूप वेगवेगळ्या प्रकाराने बिघडले आहेत व आपले हे अनुभव खुसखुशीत नर्म विनोदी शैलीत सांगितले आहेत.
एकूण पूर्ण अंकच रंजक, वाचनीय, व आनंद देणारा आहे.
