—सौ. विद्या चिडले.
हिरवीकंच किंवा किंचित लालसर छटा असलेली, थोडी गोलाकार व जाडी मांसल पाने, लाल किंवा हिरवे देठ, थोडी जांभळट छटा असलेली फुले व लाल-जांभळी फळे असलेली अशी दोन जातीची मायाळूची वेल आपल्या घरी कुंडीत लावायला अतिशय सोपी आहे. ह्या वेलीचे बी किंवा जाडसर देठ कापून ती कलम कुंडीत लावातात. ही वेल जमिनीत जशी भरपूर वाढते तशी कुंडीतही छान वाढते. भुसभुशीत मातीतून पाण्याचा निचरा होईल ह्याची खबरदारी घ्यावी लागते. माॅसस्टिकच्या सहाय्याने किंवा भिंतीच्या आधाराने मायाळूची वेल चढवता येते.
उष्ण व दमट हवामान ह्या वनस्पतीला पूरक ठरते. म्हणजे उष्णकटिबंधीय भागात ही वनस्पती छान वाढते. कोरड्या व थंड वातावरणात ह्या वेलीची हवी तशी वाढ होत नाही. विड्याच्या पानांप्रमाणे मायाळूची पानेही एका बाजूला एक नंतर दुसर्या बाजूला दुसरे अशी लागतात.
मायाळू ही खाद्यवेल भारतभर सर्वत्र आढळते. एकदा लावली की खूप दिवस टिकते. भारतात वेगवेगळ्या भागात मायाळूला वेगवेगळी म्हणजे.. पोई, पुई, पोतकी, उपोदिका अशी नावे आहेत. इंग्रजीत मायाळूला Malabar Spinach म्हणतात. भारताव्यतिरिक्त श्रीलंका, चीन, व्हिएतनाम, फिलिपिन्स इत्यादी देशातही मायाळूची भाजी खातात.
मध्यम आकाराची गोल जाडसर आणि हिरवीगार किंवा थोडी जांभळट लाल रंगाची मांसल पाने, रसाळ, थोडी तुरट तर थोडी गोडसर असतात. ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात ह्या वेलीच्या पेरावर तु-यासारखी पांढरी वा किंचित जांभळट छटा असलेली पांढरी फुले येतात. तसेच फळे लाल जांभळ्या रंगाची, वाटाण्या एवढ्या आकाराची असतात. मायाळूचे देठ जाडे असले तरी कोवळे असते .
ही वेल फार गुणी आहे बरं का. मायाळूच्या पानात लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स, अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. तसेच रक्तात विरघळणारे तंतू प्रचूर मात्रेत उपलब्ध आहेत. ह्या वनस्पतीच्या दोन्ही जाती म्हणजे हिरवी व लाल, औषधीगुणांनी परिपूर्ण आहेत.
आयुर्वेदात मायाळूचे औषधी उपयोग सांगितले आहेत.
अतिसारात मायाळूचे मूळ शिजवून खातात.
अंगावर पित्त उठल्यास मायाळूच्या पानांचा रस चोळतात. त्या रसाने खाज व आगही कमी होते.
पोट साफ होण्यास सारक म्हणून ही भाजी खातात.
गर्भवतीस व लहान मुलांनाही खाण्यास ही भाजी योग्य आहे.
मायाळूची मूळं वाटून त्या लगद्याचा लेप शरीरावर कुठे सूज आली असेल तर त्यावर लावतात.
सांधेदुखीवर एक चांगला उपाय आहे. काही दिवस नियमित सेवन करावे.
शरीरातील उष्णता वाढली असेल तर मायाळूच्या पानाची भाजी खातात.
जुलाब होत असतील तर पानांचा रस घेतल्यास आराम पडतो.
भाजणे, पोळणे यावर मायाळूच्या पानाचा रस व लोणी मिसळून लावतात.
तूप किंवा डाळिंबाचा रस व मायाळूच्या पानाचा रस ह्याचे मिश्रण अतिसारावर फायदेशीर ठरते.
मूतखडा झाला असेल तर मायाळूच्या पानांच्या रसाच्या सेवनाने, मूतखडा विरून बाहेर पडतो.
मायाळूची भाजी खाल्ल्यास मुत्रदाह कमी होतो.
ह्या भाजीच्या सेवनाने मलावरोधाचा इलाज होतो.
डोकेदुखीवर मायाळूच्या खोडातील चिकट द्रव लावतात. फायदा होतो.
किटक चावला असेल तर मायाळूच्या पानाच्या रसाने वेदना कमी होण्यास मदत होते.
मूळव्याधीवर उपयोगी आहे. पाने दह्यात किंवा डाळिंबाच्या रसात शिजवून कोथिंबीर व सुंठ मिसळून खातात.
पाने (देठासकट) चिरुन त्यात डाळीचे पीठ पेरून घट्ट भाजी करतात किंवा वरणात शिजवून डाळभाजी करतात, बटाटा घालून पालकाची भाजी करतो तशी उकडलेले बटाटे ह्या भाजीत घालून केलेली भाजी चांगली होते. तसेच पानाचे भजे व सूप करतात. भजे करताना एक एक पान डाळीच्या पिठातून बुडवून काढून तळतात.
मायाळूची पूर्ण वेल म्हणजे पाने, देठ, मुळं सगळे औषधीगुणयुक्त आहे आणि खाण्यास योग्य आहे. छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींवर ह्या वेलीचा उपयोग होतो. म्हणूनच मायाळूची वेल आपल्या बागेत नक्कीच लावावी.