विशाखा पेंडसे-पंढरपुरे
४ डिसेंबर २०१३.
घण घण घण…शाळा सुटली. मुलांनी धावत धावत येऊन व्हॅनमध्ये जागा पटकावल्या. त्यांचा किलबिलाट सुरू झाला.
या मुलांची व्हॅन गाड्यांच्या गर्दीतून न जाता चक्क जंगलातून जाते बरं का.. आसाम राज्यातल्या शिवसागर जिल्ह्यातली, नाझिरा गावची ही शाळा आहे. या शाळेत येणारी मुलं आजूबाजूच्या लहान लहान गावांमधली असतात.
त्या दिवशी सगळी मुलं येऊन बसल्याची खात्री झाल्यावर ड्रायव्हरकाका नेहमीप्रमाणे व्हॅन घेऊन निघाले. व्हॅन जंगलातल्या रस्त्यावरून धावू लागली. आसाम-नागालॅंड सीमेजवळच्या जंगलातून जाणारा हा रस्ता होता. अचानक ड्रायव्हरकाकांना दिसलं की एक माणूस रस्त्यातच उभा आहे, रस्ता अडवून. त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवला, तरी तो तिथून हलत नव्हता, उलट गाडी थांबवण्यासाठी हात हलवत होता. व्हॅन त्याच्या अगदी जवळ पोचली. तरीही तो रस्त्यावरून बाजूला झाला नाही. शेवटी ड्रायव्हरकाकांना नाईलाजाने व्हॅन थांबवावी लागली. तेव्हा त्यांना त्याच्या हातातलं पिस्तुल दिसलं. पण त्यांनी काही करण्याच्या आत तो माणूस दार उघडून गाडीत शिरला. त्याने पिस्तुल ड्रायव्हरकाकांच्या डोक्यावर रोखलं आणि म्हणाला, “चल लवकर, मला नागालॅंडला घेऊन चल चुपचाप.” सगळी मुलं घाबरून गेली. ड्रायव्हरकाकाही हबकले होते. तो माणूस मुलांकडे बघून ओरडला, “आपापल्या जागेवरून हलायचं नाही अजिबात कुणी!” मग ड्रायव्हरकाकांकडे बघत म्हणाला, “चल लवकर.” ड्रायव्हरकाकांनी नाईलाजाने गाडी चालवायला सुरुवात केली.
ह्या माणसाचं नाव होतं बिमन बोरा. तो गुंडच होता. जवळच्या एका गावात त्याचं काही लोकांशी भांडण झालं. भांडता भांडता अचानक त्याने हातात पिस्तुल घेतल्यामुळे एका गावकर्याने पोलिसांना फोन केला. पण पोलिसांची गाडी पाहताच बिमन बोरा तिथून पळाला आणि जंगलातल्या वाटेने रस्त्यावर येऊन थांबला. त्याला नागालॅंडला जाऊन पोलिसांपासून तात्पुरती का होईना, पण सुटका मिळवायची होती. त्या रस्त्यावरून जाणारी वाहनं तशी कमीच, त्यामुळे बराच वेळ त्याला कुठली गाडी मिळाली नाही. जेव्हा ही शाळेची व्हॅन त्याला दिसली, तेव्हा त्याने अशा प्रकारे ती थांबवली आणि आता त्या गाडीचा उपयोग करून तो पळून जाणार होता. पण पोलिसही त्याच्या मागावर होतेच. तो जंगलात पळून गेल्यावर पोलिसांनी या रस्त्यावर पहारा बसवला होता.
लांबून रस्त्यावर उभे असलेले पोलीस दिसले. बिमन बोराने ड्रायव्हरला गाडी वेगात चालवायला सांगितली. वेगात येणारी व्हॅन बघताच पोलिसांना संशय आला आणि ते रस्ता अडवून उभे राहिले. गाडी जवळ आली तरी पोलीस बाजूला होत नाहीत हे बघून बिमन बोराने सरळ खिडकीतून हात बाहेर काढून पोलिसांवर गोळीबार केला. सुदैवाने पोलिसांना गोळ्या लागल्या नाहीत. मात्र या हल्ल्यामुळे ते रस्ता सोडून बाजूला झाले आणि व्हॅन पुढे निघून गेली. आता तर मुलं घाबरून रडायलाच लागली. भलताच प्रसंग ओढवला होता त्या सर्वांवर!
थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी बिमन बोराने गाडी थांबवायला सांगितली आणि सर्व मुलांना खाली उतरवलं. तो ड्रायव्हरला म्हणाला, “मी या मुलांना माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. चला रे भराभर!” ड्रायव्हरकाकांना धक्का बसला. ते गयावया करत बिमन बोराला विनवू लागले. पण तो ऐकत नव्हता. तो जंगलातल्या वाटेने नागालॅंडला पळून जाणार होता. त्याला खात्री वाटत होती की मुलं सोबत असतील तर पोलीस आपल्याजवळ येणार नाहीत. त्यांनी आपल्याला पकडायचा प्रयत्न केला, की मुलांवर पिस्तुल रोखायचं असा त्याचा बेत होता.
आता काय करायचं?
त्या सगळ्या मुलांमध्ये थोडी मोठी, म्हणजे बारा वर्षांची एक मुलगी होती, गुंजन नावाची. तिने धीर केला आणि ती बिमन बोराला म्हणाली, “मला एकटीलाच घेऊन चला. बाकीच्या मुलांना सोडून द्या.” हे ऐकताच बिमन बोरा त्रासिक चेहर्याने तिच्याकडे पाहू लागला. ती पुढे म्हणाली, “ही सगळी मुलं लहान लहान आहेत. त्यांना त्रास होईल. प्लीज त्यांना सोडा. मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे.” थोडा विचार करून बिमन बोराने तिचं म्हणणं मान्य केलं. त्याचंही काम सोपंच झालं होतं.
बिमन बोरा गुंजनला घेऊन जंगलात शिरला. ड्रायव्हरकाका हताश होऊन तिकडे बघत होते. त्यांना काहीच करता येत नव्हतं. घाबरलेल्या मुलांना गाडीत बसवून ते तिथेच थांबले. थोड्या वेळाने तिथे पोलीस येऊन पोचले. ते त्यांचा पाठलागच करत होते. जे झालं ते ड्रायव्हरकाकांनी पोलिसांना सांगितलं. पोलीसही जंगलात शिरले. एक पोलीस व्हॅनमधून ड्रायव्हरकाकांच्या सोबत मुलांना घरी पोचवण्यासाठी आला. एव्हाना दुपार उलटून गेली होती.
इकडे गुंजन बिमन बोराबरोबर चालत होती. किती वेळ गेला तेही तिला समजत नव्हतं. चालून चालून दमली होती बिचारी. भूकही लागली होती. पण काय करणार! एकीकडे तिला घराची, आईबाबांची आठवण येत होती, दुसरीकडे आपण योग्य तेच करतोय अशी खात्रीही वाटत होती. बाकीची छोटी मुलं कशी चालली असती या दगडधोंड्यांमधून? त्यांनी कशी सहन केली असती भूक?
पोलिसांनी जंगलात शिरून बिमन आणि गुंजनचा शोध सुरू केला होता. एकदा तर ते बिमन आणि गुंजनच्या जवळपास कुठेतरी पोचलेही होते. पण बिमनला त्यांची चाहूल लागली. त्याने पिस्तुलाच्या धाकावर गुंजनला गप्प बसवलं. पोलिसांना ते दोघे दिसले नाहीत. पोलीस तिथून निघून गेल्यावर त्याने गुंजनला घेऊन परत पुढे चालायला सुरुवात केली.
हळूहळू अंधार पडला. समोरचं दिसेना. दाट जंगल. बिमन बोराकडच्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात ते चालत होते. त्याचीही बॅटरी संपत आली. आजूबाजूला मिट्ट काळोख. शेवटी एका ठिकाणी ते थांबले. तो तिला म्हणाला, “इथेच थांब, मी थोड्या वेळात येतो.” एवढं बोलून तो जंगलात नाहीसा झाला.
गुंजनने ही संधी साधून मागे वळून चालायला सुरुवात केली. येत असताना आपण कुठल्या दिशेला कसेकसे वळलो होतो, किती चाललो होतो हे साधारणपणे गुंजनने लक्षात ठेवलं होतं. त्यानुसार ती धडपडत, ठेचकाळत अंदाजाने चालू लागली.
त्या गर्द जंगलात, मिट्ट काळोखात, भुकेलेली, दमलेली ही मुलगी जिद्दीने चालत होती. तिला भीती वाटली नसेल का? नक्कीच वाटली असणार. पण त्या भीतीवर तिने मात केली हे खरं.
एकदाची रात्र संपून सकाळ झाली. तिला लांबून एका गावातली घरं दिसायला लागली. आसाम-नागालॅंडच्या सीमेवरच्या बिहुभोर या गावात ती अखेर पोचली होती. गावातल्या माणसांनी तिला पाहिलं, तिची चौकशी केली. तिला खायला-प्यायला दिलं आणि पोलिसांना फोन केला. तिची हकीगत ऐकून, तिचं धैर्य पाहून गावकर्यांना तिचं खूप कौतुक वाटत होतं. काही वेळाने पोलीस आणि त्यांच्याबरोबर गुंजनचे बाबाही येऊन पोचले. तिला सुखरूप बघून बाबांचा जीव भांड्यात पडला!
गुंजन पोलिसांच्या गाडीतून बाबांबरोबर घरी गेली. तिची सगळी हकीगत ऐकताना भीतीने सगळ्यांच्या अंगावर काटा येत होता आणि त्याच वेळी त्यांना गुंजनचं खूप कौतुक वाटत होतं. कौतुकास्पदच होती गुंजनची कामगिरी! ती पिस्तुल घेतलेल्या गुंडाबरोबर निर्भयपणे गेली होती, तेही बाकीच्या लहान मुलांची सुटका व्हावी म्हणून.
बिमन बोराला नंतर पोलिसांनी पकडलं. गुंजनला अनेक बक्षिसं आणि पुरस्कार मिळाले. आसाम सरकारकडून पहिला ’आसाम राज्य शौर्य पुरस्कार’ तिला मिळाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तिला २०१५ चा ’राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ही मिळाला.
इतरांचा जीव वाचावा, यासाठी स्वतः धोका पत्करणार्या गुंजनसारखं धैर्य आपल्यातही आणण्याचा आपण प्रयत्न करूया!
