–मुग्धा आपटे- कोपरकर–
तसं सगळं छान चालू होतं त्यांचं… त्यांचं म्हणजे विभा आणि तिच्या कुटुंबाचं. नवऱ्याच्या बिझिनेसचा वाढता पसारा, तिची कॉलेजमधली प्राध्यापकी. लग्नाला चौदा वर्षे झाली होती. मोठा पाचवीमध्ये आणि धाकटा तिसरीत, असे दोन मुलगे. त्यांच्या शाळा, अभ्यास, प्रोजेक्ट्स, परीक्षा, छंदवर्ग यात आला दिवस कसा गेला हे तिला कळतही नव्हतं. पण मनात कायम एक रुखरुख होती मुलांना बहीण असायला हवी होती अशी. केवळ रक्षाबंधन आणि भाऊबीजेलाच नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतही जसे कि टीव्ही वर काय बघायचे हे ठरवताना , शॉपिंग ला जाताना मुलीची उणीव त्यांना कायम भासत असे.
कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा पलीकडे जाऊन आपण समाजाचे काही देणे लागतो याचंही भान होतं त्यांना. म्हणूनच मग घरकामाच्या बाईला आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक सहाय्य्य किंवा एखाद्या स्वयंसेवी संघटनेसाठी वार्षिक दानधर्म असा जमेल तसा सामाजिक कार्यातला सहभागही सुरूच होता. याच दरम्यान सेवासदन बालिकाश्रमाच्या वर्धापन दिनाच्या सोहळयात त्यांच्या मनाने खूणगाठ बांधली आपला वैयक्तिक प्रश्न या सामाजिक प्रश्नाशी जोडायचा आणि मग सर्व आवश्यक कायदेशीर सोपस्कार पार पडून चार वर्षांची „सुखदा“ घरी आली.
ती आली ती खरोखरीच सर्वांसाठी सुख घेऊन. सगळं घर तिची आतुरतेनं वाटच पाहात होतं . सुखदा मात्र तशी थोडी बुजलेलीच. आपल्या घराची आपल्या माणसांची सवयच नव्हती ना. मायेचा, वात्सल्याचा वर्षाव झाला अगदी तिच्यावर, तशी ती अजूनच बावरली. मग मात्र सगळ्यांच्या लक्षात आलं कि तिला वेळ द्यायला हवा. तिच्या मनात खूप संभ्रम असेल, जुन्या चांगल्या वाईट आठवणी अजून ताज्या असतील, संमिश्र भावनांचा मनात कल्लोळ असेल हे विसरून चालणार नाही. नवं घर नवी माणसं आपलीशी वाटायला काही काळ जाऊ द्यायला हवा. अर्थात याचे नाही म्हटले तरी सर्वांच्या मनावर थोडे दडपण आले होते. पण विभाला मात्र खात्री होती, कॉलेजमध्ये इतक्या विद्यार्थ्यांच्या आपण सहवासात येतो, त्यांना शिकवतो, त्यांच्या शंकांचे समाधान करतो, एवढेच नाही तर वर्गाबाहेरही विद्वयार्थी आपल्याकडे कौन्सेलिंग ला येतात इतका त्यांचा विश्वास आपण संपादन केलाय तर सुखदाला अगदी सहजपणे आपलेसे करु शकू.
नव्या नवलाईचे दिवस उलटून हळूहळू रोजचे आयुष्य सुरु झाले. सुखदा साठी करायला, बघायला, अनुभवायला रोजच नवीन गोष्टी होत्या. तिचा पहिला खेळगडी होता छोटा दादा आणि त्याच्याशीच तिची सगळयात आधी गट्टी जमली. त्याने तिला आपले खेळ देऊ केले, टीव्हीवरच्या कार्टून्सची ओळख करून दिली, आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर तिलाही सामील करून घेतले. इतके दिवस घरातले शेंडेफळ असलेला आपला धाकटा लेक सुखदा आल्यावर मोट्ठ्या भावासारखा वागताना पाहून विभा सुखावली. पण सुखदाची बाजू घेऊन इतरांशी भांडणारा दादा आणि सुखदा हळूहळू एकमेकांशीच भांडू लागले हे पाहून ती जरा भांबावलीच. कसे होणार आता हे असेच एकमेकांशी भांडत राहिले तर? पण नवऱ्याचे मत मात्र याउलट होतं. आपण भांडतो कोणाशी? आपल्याच माणसांशी ना ! मग ही तर चांगलीच गोष्ट आहे की, विभालाही पटले. धाकट्या भावाला सांभाळून घेणारा मोठा दादा तर आधीच सरावलेला होता. सुखदाला आपलंसं करणं त्याला जराही जड गेलं नाही. स्वतःच्या फोनमध्ये तिला आवडतील असे गेम्स डाउनलोड करून देऊन तो तिचा फेव्हरेट झालाच पण तिच्या किंडरगार्टेन शाळेतल्या अभ्यासातल्या शंका दादाच नीट सांगू शकतो अशी तिची पक्की खात्रीच पटली.
आता राहता राहिले आई-बाबा . मुलांपेक्षा आपल्याला खचितच जास्त वेळ लागेल पण आज ना उद्या हे जमेल नक्की असा विश्वास मात्र होता. मुलांचा बाबा तसाही जरा अबोलच. दोन्ही मुलांशी शनिवार रविवारी क्रिकेट खेळणारा बाबा सुखदाशी काय खेळावे याबद्दल जरा गोंधळातच होता. बरेच दिवस त्याचे लांबून लांबून पाहणे चालू होते पण वर्क फ्रॉम होम चा फायदा घेत त्याने सुखदाच्या बाहुलीच्या घर-घर च्या खेळात चहा प्यायला आणि गुळ शेंगदाण्यांचा लाडू खायला येणाऱ्या पाहुण्याची भूमिका काही कालावधी नंतर पटकावली. तिच्या कलाकलाने घेऊन , गोड बोलून तिचा विश्वास त्याने हळूहळू संपादन केलाच. तिला सायकल आणून देऊन ती चालवायलाही शिकवल्यावर तर तो तिच्यासाठी बेस्टेस्ट बाबा बनला जणू.
विभा मात्र जरा हिरमुसत चालली होती. आपल्याला का नाही जमत इतरांसारखे तिच्या लाडक्या बनायला? घरातल्या प्रत्येकाला तिच्याशी जुळवून घेता येतंय मग आपल्याला का नाही असा एखादा दुवा शोधता येत? आपण प्रेम तर कुठेच कमी करत नाही. आता तिला घरी येऊनही वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. बाबा आणि दादांकडून सुखदाचे सगळे लाड होता होता विभाला मात्र एका कडक आईची भूमिका बजावायला लागत होती. तिला चांगल्या सवयी लावणे, अभ्यासाची आवड लावणे, प्रसंगी ओरडणे ही जबाबदारी तर जणू तिच्याच डोक्यावर आली होती. शिक्षकी पैशातून आलेला कठोरपणा तिच्या अंगी होताच आणि नसत्या लाडाने मुले बिघडतात् हा ठाम विश्वासही. लाड करणे म्हणजेच काही प्रेम व्यक्त करणे नाही ना! मग कुठे चुकतंय आपले? का नाही आपली नाळ जुळत तिच्याशी अजून? हा विचार विभाला भंडावून सोडी.
आज मात्र गम्मतच झाली. सुट्टीचा दिवस म्हणून सगळे घरी होते आणि जुन्या फोटोंचे अल्बम उघडून बघणे चालले होते. दादांचे बाळपणीचे फोटो बघताना सुखदाला एकीकडे तर मजा वाटत होती , त्यांचे रांगत असतानाचे, आंघोळ करतानाचे फोटो पाहून हसूच आवारत नव्हते. हा दादाचा पहिल्या वाढदिवसाचा फोटो याच घरातला, हा तो चालायला शिकाला तेंव्हाचा इथेच अंगणातला , हा छोटया दादाचा शाळेत जाताना पहिल्या दिवशी काढला फोटो याच समोरच्या दरवाज्यातला. पण दुसरीकडे तिला आता रडूच फुटायला लागलं होतं … “आपले फोटो नाहीत यात… आपण कुठे होतो बाळ असताना इथे? हे तर काहीच नाही. आता बाबाने अजून जुना अल्बम काढला. त्यात तर बाबा छोटा असतानाचे फोटो आहेत आजी आजोबांबरोबरचे तेही याच घरातले. मग आता आईचेही असतीलच की.” ” नाही ग सोन्या, माझे कसे असतील?” विभा म्हणाली , ” मी तर लग्न झाल्यावर आहे इथे राहायला.”
सुखदाचे डोळे लकाकले. ” खरंच ! माझ्या सारखंच तुलाही घेऊन आला बाबा! म्हणजे आपण सेम सेम!” सुखदाने घट्ट मिठी मारली विभाला. तिच्याही डोळ्यातलया पाण्याला आता वाट फुटली होती. आनंदाचे अश्रू होते ते. त्यांना त्यांचा दुवा सापडला होता. अंतरीची खूण पटली होती.
