शिल्पा धर्माधिकारी
बरेचदा आपली आवड, आपल्यातील कौशल्य आपल्याला ओळखता येत नाही किंवा माहीत असूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला ओळखून खतपाणी देऊन रुजवायचं असतं, आकार देऊन फुलवायचं असतं हे कधी कधी लक्षातच येत नाही. तर कधी कळतं पण वळत नाही.
अगदी तसेच काहीसे माझ्या लिखाणाच्या आवडीविषयी मी म्हणू शकते.
मला आठवते मी लहानपणी आमच्या घराजवळ राहणार्या बच्चे कंपनीला वेगवेगळ्या आणि सुचतील तशा परीकथा बनवून सांगत असे. “जादुई गुलाब”, “सोनेरी डोंगर ” आणि काय काय. ती बच्चे कंपनीदेखील त्या कथांचा मनमुराद आनंद लुटत असत. पण तेव्हा कुठे माहीत होते की हेच माझ्या लेखनाच्या गुणाचे बीज आहे म्हणून.
शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला निबंध लेखन हा विषय आवडीचा. मराठीच्या शिक्षिका माझ्या निबंध लेखनावर कायमच खुश असायच्या. असे असूनही आपल्यात लेखन कौशल्य आहे हे माझ्या ना लक्षात आले ना मी त्याला विकसित करायचा प्रयत्न केला.
नंतर नोकरी करायला लागल्यावरही हौस म्हणून ऑफिसला जाताना बसच्या प्रवासात माझ्या छोट्या डायरीत काहीतरी खरडत असे. कधी माझे विचार गद्य रुपात असायचे तर कधी पद्य रुपात. हे लिखाण किती चांगले जमायचे माहित नाही पण आनंद मात्र जरूर देऊन जायचे.
नंतर लग्न, मूलबाळ ह्यात माझे लिखाण मागे पडत गेले. इतके की लिखाण हे मला दुसर्या इतर आवडींपेक्षाही खूप जास्त आनंद देणारे आहे हे मी पार विसरून गेले. संसाराच्या रहाटगाडग्यात कर्तव्य हे आवडीपेक्षा जास्त महत्त्वाचे बनले.
नंतर प्राथमिकता बदलत गेल्या. लिखाणाऐवजी किराणा सामानाच्या यादीपुरतीच लेखणी हातात घेऊ लागले. घर हेच जणू विश्व बनले. अर्थात त्यातही मला आनंद मिळत होता. कारण तो माझ्या आयुष्याच्या कथेचा भाग होता.
पण आता एक दोन वर्षात संसाररुपी बोटीचा प्रवास आपली गती बदलू लागला आहे. जसे गतिमान आयुष्य हळूहळू संथ होऊ लागले तसे परत एकदा माझे कागद आणि लेखणीचे नाते मला खुणावू लागले.
मग बरेच वर्षानंतर आळस झटकून लेखनाच्या दृष्टीने कागदावर पुन्हा एकदा अक्षरे गिरवायला सुरवात केली खरी पण लेखन हे बाळबोध वळणावर जात आहे असे जाणवले. अर्थात ह्याचे वाईट बिलकुल वाटले नाही. उलट लेखनाशी असलेले आपले नाते दृढ होत आहे याचा आनंदच जास्त झाला.
हे सगळे घडत असताना अचानक साहित्योन्मेष लेखन स्पर्धा ह्या छान उपक्रमाशी मी जोडले गेले. ह्यातील स्पर्धा ह्या शब्दाचे मला कधीच दडपण आले नाही. कारण स्पर्धेपेक्षा मला बारा महिने सातत्याने लिहायची संधी मिळणार हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. हा प्रवासही खूप छान होता.
सुरुवातीचे तीन महिने साहित्योन्मेषने विषय न देता आमच्या आवडीच्या विषयांवर लिहिण्याचे दिलेले स्वातंत्र्य म्हणजे आमचे सातत्य टिकविण्याच्या दृष्टीने करायला लावलेला सरावच होता. जसे पेन्सिलने लिहिताना ती आधी तासून, धार करून लिहिण्यासाठी तयार करतात, खेळ खेळायच्या आधी वाॅर्म-अप करायला लावतात तसेच काहीसे वाटले.
पण नंतर लेखनासाठी दिलेले विषय म्हणजे नुसतेच आम्हाला विचार मांडायचे मिळालेले स्वातंत्र्य नव्हते तर ती कुठेतरी स्वतः च्या लेखनशैलीला आकार देण्याची सुरुवात होती. ह्यातून तुम्ही स्वतःला जसे घडवाल तसे लेखणीचे सौंदर्य खुलत जाईल हे जाणवून देणारी होती. ही प्रक्रिया म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. स्वतःला घडताना बघण्याचा आनंद काही औरच असतो नाही का.
साहित्योन्मेषने दिलेले वेगवेगळे विषय अभ्यास करायला भाग पाडत होते. खरेतर लिखाण जेवढे अभ्यासपूर्ण तेवढे जास्त खुलवता येते. शब्दांशी खेळत तो विषय जास्त चांगल्या प्रकाराने मांडता येतो. त्यामुळे विषयाची खोली समजून त्याला अजून योग्य शब्दात मांडता येते. आणि हेच ह्या अभ्यासपूर्ण लिखाणाचे फलित आहे असे वाटते.
साहित्योन्मेषने दिलेल्या विषयांमध्ये वैविध्य होते. जसे
लेख, कविता, कथालेखन, पत्रलेखन, विनोदी लेखन, भयकथा, गूढकथा, लहान मुलांसाठी कथालेखन वगैरै…
ह्यामध्ये कालबाह्य होत चाललेल्या पत्रलेखनात, “पत्रास कारण की…” हे शब्द जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेले.
“भाषेची शुद्धता”वरचे लेखन हा एक वेगळाच अनुभव होता. ह्यामुळे मराठी भाषेवर संस्कार करणार्या आणि भाषेच्या संस्कृतीला पुनर्जीवित करणार्या अनेक मोठ्या व्यक्तींच्या कार्याविषयी अभ्यास करायची संधी मला मिळाली.
दिलेल्या परिच्छेदातून कथा लिहायची हे तर कल्पनाशक्तीला दिलेले आव्हानच होते. हो, पण मी ते पेलण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला.
थोडक्यात स्वतःच्या लिखाणाचा कम्फर्ट झोन सोडून प्रत्येक प्रकारचे लिखाण करायची संधी साहित्योन्मेषने आम्हाला दिली. मी ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. ह्या प्रयत्नांत मी किती यशस्वी झाले माहीत नाही. पण जे मी स्वतःहून कधीच केले नसते ते करून स्वतः ला अजमावण्याचा, चौकटी बाहेर जाऊन वेगळे काहीतरी लिहायचा प्रयत्न करायला साहित्योन्मेषने भाग पाडले. आणि हेच संस्कार लेखनात महत्वाचे. ह्याने वेगळी लेखनशैली समजून घ्यायला, ती आत्मसात करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग फार उपयोगी ठरला.
ह्या स्पर्धेमुळे मी विविध लेखन प्रकार जरी हाताळले असले तरी मी “हलके फुलके” लिखाण जास्त चांगल्याप्रकारे करू शकते हे माझ्या लक्षात आले.
जशी कथा खुलवायला कल्पनाशक्ती लागते तशीच सर्व प्रकारच्या लेखनाला त्याची योग्य मांडणी, भरपूर शब्दसंग्रह त्याचबरोबर योग्य शब्दाचा वापर महत्वाचा हे ही लक्षात आले. मला माझ्या लेखनाचा आलेख उंचावायला ह्या सगळ्याची खूप मदत झाली.
लेखनात व्याकरण आणि शुद्धलेखन फार महत्वाचे आहे. ह्या लेखन स्पर्धेमुळे व्याकरणची उजळणी तर झालीच त्याबरोबर शुद्धलेखनाच्या नियमांवर बसलेली धूळ झटकली गेली.
थोडक्यात सांगायचे म्हणजे साहित्योन्मेषसाठीचे लिखाण म्हणजे माझ्या बारा महिन्याच्या लेखनाचा प्रवास आणि आलेख आहे. ह्यात वेगवेगळ्या विषयांची ओळख झाली, वेगवेगळे जाॅनर हाताळायला मिळाले. ह्या लेखनाच्या प्रवासात काही लेख, कथा जमून आल्या तर काहींमध्ये सुधारणा करायला हवी ह्याची जाणीव झाली. ह्यात खूप चांगले सहप्रवासी भेटले. प्रत्येकाची वेगवेगळी लेखनशैली वाचायला मिळाली. त्यांचे लिखाण बरेच काही शिकवून गेले.
ही सफर अतिशय सुंदर, आल्हाददायक आणि आनंद देणारी होती. स्पर्धेत पारितोषिक मिळविणे ह्यापेक्षा लिखाणामध्ये सातत्य आणि सुधारणा करण्याच्या दृष्टीने मिळालेली संधीच माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.
आजचा हा साहित्योन्मेष स्पर्धेचा शेवटचा लेख! दर महिन्यात दिलेल्या विषयाचा लेख २५ तारखेपर्यंत देणे हा जणू संकल्प असल्यासारखे झाले होते. ह्याची साखळी आता तुटणार. खरेतर ही साहित्याची सफर संपूच नये असे वाटते आहे. इथून पुढे महिन्याच्या प्रत्येक २५ तारखेला साहित्योन्मेषच्या आठवणीने मन हुरहुरेल जरूर.
हो, पण माझा हा साहित्योन्मेषबरोबरचा प्रवास “एक आनंद यात्रा ” म्हणून माझ्या मनात कायमच घर करून राहील हे निश्चित!
