सनविवि अनुभव साहित्योंमेष स्पर्धेने मला काय दिले?

साहित्योंमेष स्पर्धेने मला काय दिले?

पुरुदत्त रत्नाकर

साहित्योंमेष स्पर्धेने माझ्या साहित्याला कुशीत घेतले.  

कवी मधुकर आरकडेंच्या शब्दांमध्ये:

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत

कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात

मी २०२० पासून ब्लॉगिंगच्या माध्यमातून लिखाण सुरू केले. पण ती वाट खडकाळ ठरली. सरासरी शेकडा वाचकसंख्या असली तरी पूर्ण वाचणारे हाता-पायांच्या बोटांइतके परिचितच आहेत आणि त्यातले उजव्या हाताच्या बोटांइतके माझा उत्साह टिकवण्यासाठीच बरे का, कौतुक करतात, हे कळायला लागले होते. त्यातच या स्पर्धेची घोषणा झाली. स्पर्धा असल्याने अन्य स्पर्धक, आयोजक, महाराष्ट्र मंडळाचे काही सदस्य आणि मुख्य म्हणजे परीक्षकपदापर्यन्त पोहोचलेले तज्ज्ञ माझे लिखाण वाचणार याची हमी मिळाली. नजर तरी नक्की फिरणार. थोडक्यात, मला कुशीत घेऊन, “विषयही आम्ही देतो, तू फक्त लढ (लिही).” म्हणत साहित्योंमेष वाचायला सरसावले. 

 

मराठीत बोलायला लागलो की कटाक्षाने पूर्ण वाक्य, संभाषण मराठीतच करण्याची मला सवय आहे. त्यामुळे विचार पोहोचवायला पुरेसा शब्दसाठा माझ्याकडे होता. पण नित्याच्या संवादांमध्ये वापरात नसल्यामुळे विस्मृतीच्या उंबरठ्यावर गेलेले शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांनी माझ्या प्रयत्नाला मान देऊन माझ्या लिखाणात महत्वाची जागा भूषवली. मी सुभाषिते शोधली, त्यांचा परिचय झाला. प्रत्येक कृती झटपट करायच्या सवयीत चांगलीच रसातळाला गेलेली खिलाडूवृत्ती पुनर्स्थापित झाली. याला कारण  म्हणजे लिहायला उपलब्ध असलेले ४-५ आठवडे, सलग १२ महीने सातत्याने चाललेली प्रदीर्घ स्पर्धा आणि अदृश्य स्पर्धक. स्पर्धक अदृश्य असल्यामुळे लक्ष लक्ष्यावर केन्द्रित राहिले आणि स्पर्धा स्वतःशी झाली. 

 

संकल्पना दिली. वाह! कया बात है. ३ महीने स्पर्धकाने स्वतःचे मन मोकळे करायचे. साचलेले विचार, विषय मोकळे करायचे. मग पुढचे नऊ महिने मिळालेल्या विषयांवर लिहायचे. मज नवोदिताला आणखी काय हवे? स्वतःचे १२ विषय लिहिणे म्हणजे परत ब्लॉगिंगसारखाच अनुभव झाला असता. शिवाय प्रत्येकाचे विषय वेगळे म्हंटल्यावर स्पर्धकांची तुलना करायची परिमाणे समजणे कठीण गेले असते. केवळ संकल्पनेची भुरळ पडली म्हणून मी या स्पर्धेत उतरलो. माझा सहभाग हा या संकल्पनेला मानाचा मुजरा आहे.

 

साहित्योंमेषने विविध सामाजिक, वैचारिक विषय आणि त्यावर लिहायचे धैर्य दिले. एप्रिलपासून कोणते विषय येतील त्याचे अंदाज मी जानेवारीपासून बांधत होतो. महिलासबळीकरण, निसर्ग हे विषय नक्की असणार असा होरा होता आणि महिलादिनाचे औचित्य साधून एप्रिलमधेच विषय आले. नंतर निसर्ग हा विषयही आला. रहस्यकथा, विनोदी लेख/ कथा हे प्रकार दिले गेले. काव्य, शास्त्र, विनोदात काळ व्यतीत झाला. प्रणयकथा हा प्रकार मात्र मिळाला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे विषय सामाजिक समस्यांवर आधारित होते. ते विषय नियंत्रित लिखाणापेक्षा निमंत्रितांच्या खुल्या परिसंवादाला साजेसे होते असे वाटते. स्वभाषा-परभाषा या विषयावर मी संशोधन करून आधी माझ्या आडात माहिती ओतून घेतली आणि मग स्पर्धेत पोहोरा पोहोचवला. त्यावर सर्वाधिक अभिप्राय आले. एकाप्रकारे साहित्योंमेषने स्पर्धकांमधली अभिव्यक्ती घडवली. इतर स्पर्धांमध्ये लिहायची एकच संधी असते. साहित्योंमेषमध्ये मिळालेले काही विषय हे असे स्वतंत्रपणे लिहायचे असते तर मी स्पर्धक झालो नसतो. ते विषय या मालिकेतला भाग असल्यामुळे मी धाडस केले. काही सामाजिक विषयांबाबत माझी मते पारंपारिक आहेत. त्याबाबतीत केवळ जगरहाटीमुळे लवचिकता आणून मी आधुनिक जीवनशैलीला वाव दिला आहे. पण व्यक्त होतांना मनाविरुद्ध लिहू शकत नाही. म्हणून अशी मते मांडण्याचे धैर्य माझ्यात नव्हते. स्पर्धेतही मी ती कधीतरी थेट, बर्‍याचदा गनिमी काव्याने मांडली असावीत. आता धीर चेपतो आहे.

 

मर्यादा प्रशिक्षण. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा म्हंटली की काही घटकांवर मर्यादा असते, असायलाच हवी. पण प्रांजळपणे सांगायचे तर काही वेळेला होती असलेली ७५० शब्दांची मर्यादा फारच तोकडी पडली. माझ्या काही वाचकांनी लेखनातल्या त्रोटकपणावर नाराजी व्यक्त करून ते अधिक खुलवायला हवे होते असे शेरे दिले. हा माझ्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार ठरला. कारण मुळात केलेल्या लिखाणातून काही वाक्ये केवळ शब्दमर्यादेत बसवायसाठी मी वगळली होती. सुरूवातीला माझी प्रचंड घुसमट झाली. पण मर्यादेत फार बदल करण्यात आला नाही. यादरम्यान मी वाचलेल्या/ चाळलेल्या पुस्तकांमधले ‘आतला आनंद’, ‘गप्पागोष्टी’, ‘कुणासाठी… कुणीतरी’, ‘कॅलिडोस्कोप’, अशा पुस्तकांमध्ये या मर्यादेच्या आतले लिखाण आढळले. तर प्रवीण दवणे, अभिमन्यू सूर्यवंशी, विजय देवधर, विजया जहागीरदार, सु.ल. खुटवड, वि. वा., व. पु., सुधा मूर्ती इत्यादि सिद्धहस्त लेखकांना बहुतांश वेळा गोष्ट, लेख, प्रकरण यासाठी सहस्त्राधिक शब्द लागतात असे निदर्शनाला आले. बुद्धिबळाला उत्तेजन देण्यासाठी आयोजलेल्या स्पर्धेत वेळ वाचावा म्हणून प्रत्येक सोंगटीला ५च चाली असा नियम केला किंवा बुद्धीच्या वापरावर बंधन घातले तर काय काय होईल अशी एक विनोदी गोष्ट लिहून मी माझी घुसमट दूर केली. ती गोष्ट मी लवकरच प्रकाशनयोग्य करेन; पण तेव्हा साहित्योंमेष नसेल. कारणेकरून, साहित्योंमेषने मला साहित्यस्पर्धक न बनवता थेट साहित्यसैनिक बनवले किंवा माझा मर्यादापुरुदत्त केला असे म्हणता येईल. 

 

लिखाण संक्षिप्त करण्याच्या प्रक्रियेमुळे संगती सुटली असेल तर तेवढी सुसंगती घडवायची, सृजनवाक्ये-चपखल सुभाषिते समाविष्ट करायची, कलंकित शब्द काढून विषय सर्वथा आवडो असा कारायचा. माझी ‘साहित्यिक उठाठेव’ अशी नियोजनबद्ध झाली. याचा परिणाम म्हणून, विचार आला की लगेच तो व्यक्त करणे हे उद्दीष्ट न रहाता, ‘थोडक्यात पण वाचनीय’ अशी अभिव्यक्ती हे उद्दीष्ट आणि लेखनप्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात तिला स्वतःपासून स्वतंत्र करणे असे एक अभिव्यक्ती(चे) स्वातंत्र्य अनुभवायला मिळाले. भविष्यात पाल्हाळ कमी करायला, बहुदुधी मजकूर(!) आखूडशिंगीही करायला हे तंत्र रामबाण ठरणार यात शंका नाही. मी आता साहित्योंमेष प्रशिक्षित लेखक आहे.  

 

मी महानगरात रहाणारा सदनिका संस्कृतीतला चाकरमान्या. मानव आणि यंत्रमानव यांच्या मधली पिढी म्हणजे आम्हा मानवयंत्रांची. अर्थार्जनाच्या रगाड्यात आम्ही आमचे आम्हालाही वाचत नाही. म्हणजे आपण काय प्रकारची व्यक्ती बनत चाललोय हेही आम्हाला माहिती नसते. अवांतर लेखन-वाचन तर दूरची बाब. पण हा वर्ग स्पर्धेला कायम तयार. कारण आयुष्यभर, क्षणोक्षणी तेच तर करतोय. म्हणून शालेय वयात पालकांनी लावलेली साहित्याची गोडी या दीर्घ स्पर्धेनिमित्ताने उन्मेषित झाली. ‘साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः’ याप्रकारचा पशू होण्यापासून या स्पर्धेने वाचवले.

 

या स्पर्धेने अज्ञात लेखकांचे साहित्य प्रकाशित केले. स्पर्धक लिहीते झाले तसेच वाचतेही झाले. सरासरी १८ लेख गुणिले १२ महिने एवढे साहित्य मला वाचायला मिळाले. मी सध्या साहित्यातला स्पर्धक असल्याने हे गणित तुमच्यावर सोडतो! साहित्योंमेषमध्ये जे एकूण स्पर्धक होते, त्यातले नियमीत लिहिणारे पंकज पंडित आणि मी असे दोघेच  पुरूष आणि २२ महिला. नवनिर्मितीत महिलावर्गाशी पुरुषांची स्पर्धा म्हणजे ससा-कासवाची शर्यत. दोन्हीही कासवांनी स्पर्धा पूर्ण केली आहे. या स्पर्धकांमधले काही आता परिचित झाले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्तही महाराष्ट्र मंडळाशी संलग्न असलेले काही नियमित वाचक मिळाले. ते चाहते झाले आहेत असे नसावे, पण माझे काही लेख त्यांना मानापासून आवडले आहेत. तसे त्यांनी माझ्या अपरोक्षही व्यक्त केले आहे. माझ्या लिखाणाला ओळखणारे पण मला अपरिचित वाचक ही साहित्योंमेषने मला बहाल केलेली सर्वोत्तम पुंजी आहे. 

 

आभार मानायची, ऋणानुबंध व्यक्त करायची ही जी संधीही सनविविच्या साहित्योंमेषने दिली आहे ती साधून मी आयोजन समिति, परीक्षक, स्वयंसेवक, प्रकाशक, महाराष्ट्र मंडळ, माझे स्पर्धक, अन्य सर्व संबंधित आणि सर्व वाचकांचे आभार मानून हा लेख  संपवतो. कळावे. वाचत रहावे ही विनंती विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *