डॉ.सौ. अनुराधा भागवत.
मागच्या वर्षींचा लॉकडाऊन संपला, आसपासच्या वातावरणा बरोबरच आयुष्यातही थोडा मोकळेपणा येऊ लागला. मोबाईल, ऑनलाइनच्या आभासी गप्पा, भेटीगाठींपक्षा प्रत्यक्ष भेटीचा आनंद हवासा वाटत होता, अर्थात मोबाइलची संवय अजून सुटली नव्हती… अशावेळी अचानक मोबाईलच्या आभासी दुनियेतच,जुलै महिन्यात ‘ साहित्यकलामंच ‘ या ग्रुपशी ओळख झाली. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या आमच्या सारख्या हौशी लेखकांच्या लेखणीला कुणी मैत्रीची साद घातली होती.
महाराष्ट्राबाहेर रहात असलो तरी आमचे मराठीवर,मराठी साहित्यावर प्रेम आहे. मराठी पुस्तके मिळवून वाचायचा आम्ही प्रयत्न करतो,मराठी कार्यक्रम बघतो जमेल तसे लिहितो सुद्धा… आज कुणीतरी त्याची दखल घेतल्यासारखे वाटले. माझा लेखनप्रवास आपल्या गतीने समोर दिसेल त्या वाटेने हळुहळु पुढे सरकत होता. मन सतत नवीन वाटांचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असे.मला हा ग्रुप म्हणजे एक नवीन दालन आपल्यासाठी उघडल्यासारखे वाटले. त्यांच्या दिवाळी अंकासाठी लेख लिहिण्याची जमवाजमव सुरु केली. ग्रुपमध्ये सामिल सदस्यांची हळुहळु ओळख होऊ लागली. माझे लेखन ही अगदी एकांडी शिलेदारी नाही, माझ्या सारखे इतरही अनेक आहेत हे जाणवले व सर्वांबद्दल एक वेगळाच आपलेपणा वाटू लागला. तशी या ग्रुपमध्ये कवी लोकांची खूप चंगळ होती, आम्ही त्यामानाने तटस्थ वाचकच.आणि एक दिवस साहित्योन्मेष स्पर्धेची सूचना ग्रुपवर आली. ही स्पर्धा वर्षभर चालणार होती, बारा महिन्यांचे बारा लेख… नियम व अटी मी परत परत वाचत होते.
कांही वर्षांपूर्वी मी लिहायला सुरुवात केली, कथा, लेख छापूनही यायला लागले.एक कथासंग्रह निघाला. आपण ‘ लेखक ‘आहोत असे वाटू लागले, पण यांत सातत्य, नियमितपणा नव्हता.घराच्या कामात, व्यापात,सर्व मागे पडायचे. खूप खूप दिवसात कांही लिहिणेच व्हायचे नाही,चुटपुट लागायची. तेव्हा वाटायचे आपल्याला एखादे’ सदर ‘ लिहायला मिळाले पाहिजे म्हणजे दर आठ–पंधरा दिवसांनी, महिन्याने कांहीतरी लिहिणे होईल. आपल्या लिहिण्यात खंड पडणार नाही. आजपर्यंत हे जमले नव्हते, अचानक ही संधी समोर आली होती. स्पर्धेत भाग घ्यावा असे वाटत होते… पण?
हा पण मोठा अवघड!आणि असे एक दोन पण मनाला भेडसावत होते. पहिला पण होता…’ मला जमेल कां? ‘ ही मनातील शंका. ही शंका पाय मागे खेचत होती व समोर आलेली संधी खुणावत होती. स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा प्रबल होत होती. दुसरा पण यांच्या नियम व अटी. म्हणे ‘ वर्ड ‘ मधे टाइप करा व ‘ मेल ‘ करा.कां?लॉकडाऊन संपल्यावरही ही अट कां? आम्ही लेख पाठवायचेत ना,मग पाठवू ना आम्हाला जमेल तसे. मेलच कां?म्हणजे आता लेख लिहायचा नाही,टाइप करायचा..मराठीत! त्यातल्या जोडाक्षरांचे काय, रफार,रूकार अशा प्रत्ययांचे काय?मग तो मेल करायचा, आणि तो गेलाच नाही पोचलाच नाही तर? ‘ नेटवर ‘ ,ऑनलाइनवर विश्वास वाटत नाही. काळाची गरज ओळखूनही मी स्वतःला फारसे बदलू शकले नाही, आणि आता त्यावरच विसंबून रहायचे?पण नियमच म्हटल्यावर काय करणार? मनात असे उलटसुलट विचार चालू असतांनाच मी मुलाच्या मदतीने डिसेंबरच्या सुरवातीला स्पर्धेचे रजिस्ट्रेशन तर केले. आणि मनाच्या अशा गोंधळलेल्या किंचित् साशंक अवस्थतेतच नवीन वर्षाबरोबरच मी या स्पर्धेत पदार्पण केले.
स्पर्धा पुढे सरकू लागली तसा आत्मविश्वास वाढला. मनांतील धास्ती कमी झाली.मनाला भेडसावणारे हे पण जिंकायला, लेखन प्रवासातील हे अडथळे ओलांडायला, या स्पर्धेने मला शिकविले. नंतर विषय आयते मिळू लागले मग लेख टाइप करून वेळेवर मेल करणे थोडे सहज, सोपे वाटू लागले.’ सनविवि ‘चा अंक दर महिन्याला मोबाईलवर येऊ लागला. मला ई-वाचनाची संवयच नव्हती, खरंतर कंटाळाच होता. माझा अंक वाचून होईपर्यंत ग्रुपवर अभिप्राय व चर्चा सुरू होत. अभिप्राय लिहून पाठवायचीही स्पर्धा होती, या स्पर्धेचाच तो एक भाग होता. ई-वाचन हा आजच्या जगांतला,माझ्या लेखन-वाचनाच्या छंदाचा एक भाग आहे आणि याला पर्याय नाही…. ही जाण मला या स्पर्धेने दिली.
अभिप्रायलिहून पाठवायला सुरुवात केली. अंक वाचतांना मला एखादा लेख आवडला कां,हा विचार मनात येऊ ला.आवडला तर कां आवडला?काय आवडले?आवडला नसेल तर कां आवडला नाही, काय खटकले?हे विचार मनात घोळत.ते कागदावर व्यक्त करावेसे वाटू लागले. याबरोबरच लेखकाची भाषा, भाषाशैली, विचार मांडायची पध्दत,शुध्दलेखन या सर्व गोष्टींकडे हळुहळु लक्ष जाऊ लागले, साहजिकच माझ्या स्वतःच्या लिहिण्यात या सर्व बाबतीत सुधारणा होत गेली. शब्दभांडारही वाढले. एखाद्या विषयाचे विविध पैलू लक्षात येऊ लागले, वेगवेगळ्या प्रकारे विचार करायची संवय लागली. अंकाच्या वाचनामुळे माझ्या द्रुष्टीकोनात कांही बाबतीत फरक पडला. माझ्यासाठी ही केवळ स्पर्धा उरली नाही, साहित्योन्मेषबद्दल एक वेगळीच आत्मियता निर्माण झाली.लेखातील विचार, लेखक थेट मनापर्यंत पोचू लागले. विषय आधीपासून माहिती होऊ लागल्यावर लेखक मित्रांच्या विचारांची मी उत्सुकतेने वाट पाहू लागले, यात व्यक्त होणाऱ्या मतांबद्दल आस्था वाटू लागली.
आपल्या वाचनात आलेली, आपल्याला आवडलेली, क्वचित् न आवडलेली, खटकलेली एखादी गोष्ट, एखादा मुद्दा, लेखांत जाणवलेले वेगळेपण, सुंदर भाषेचा, विचारांचा मनावर पडलेला प्रभाव, हे सर्व मनात ठेवून कालांतराने विसरून जाण्यापेक्षा याबद्दल स्पष्ट पण मोजक्या शब्दांत ‘ अभिप्राय ‘ लिहून आपले मत मांडून व्यक्त होणे व त्यांतून मोकळे होणे जमायला लागले. खरे सांगते यानंतर या स्पर्धेने मला काय दिले हा नुसता विषय न राहता मला काय काय दिले अशी माझ्या पुरती एक यादीच बनली.
– साहित्योन्मेष स्पर्धेने मला आत्मविश्वास दिला. माझ्या लेखनाला नियमितता, सातत्य व शिस्त दिली. इंटरनेटसारख्या आधुनिक गोष्टीशी घसट वाढवली. या तंत्राचीभिती कमी झाली, त्याबद्दल विश्वास वाटू लागला.’ मेल ‘ करायचा भरपूर सराव करून दिला. मराठी शुध्दलेखनाचे उपयुक्तधडे दिले त्यामुळे शुध्दलेखन सुधारले. स्पर्धेचा हा प्रवास गेले वर्षभर एकमेकांच्या साथीने करणाऱ्या, यांत स्पर्धक म्हणून सामिल झालेल्या सर्वांची मैत्री दिली. यांतील लेख लिहिण्यात इतकी गुंगून गेले की स्पर्धा असूनही मनात कुणाबद्दलही ईर्षा नव्हती. एका निकोप स्पर्धेचा ‘ अनुभव घेतला. गेल्या वर्षात मी जेवढे लेखन केले तेवढे एका वर्षात या आधी कधीच केले नसेल. भरपूर लेखन केल्याचे समाधान तर मिळालेच शिवाय स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहण्यात यशस्वी झाल्याचा आनंद ही मिळाला. या स्पर्धेने भरपूर शब्दभांडार दिले व त्याबरोबरच शब्दमर्यादा पाळावयाची शिकवणही दिली. आणि आता स्पर्धेचा शेवट आल्यावर कांहीतरी संपल्याचे, गमावल्याचे दुःख दिले, आणि निरोपाच्या वेळी नेहमीच जाणवणारी कातर रुखरुखही दिली!
