अभिप्राय

महानाद ढोल ताशा कार्यशाळा

ढोल ताशा म्हटलं की जाग्या होतात त्या महाराष्ट्रातील गुढी पाडवा आणि गणेशोत्सव मिरवणुकीच्या आठवणी, आणि त्या मिरवणुकींच्या पुढे असत ते दिमाखदार ढोल ताशा पथक – उर्जा आणि उत्साहानी भरलेला तो ताशा आणि ढोल ह्यांचा गजर आणि दिमाखात उंच नाचणारा ध्वज. ते वातावरण काही औरच  आणि महाराष्ट्राच्या बाहेर असा अनुभव मिळणे फारच दुर्मिळ. बेंगळुरू सारख्या दाक्षिणात्य शहरात हा अनुभव मिळणे शक्य केले महाराष्ट्र मंडळाच्या महानाद ह्या ढोल ताशा पथकाने. मंडळाच्या काही उत्साही सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी महानाद पथकाची सुरवात केली. त्यात बहुतेक सदस्यांना ढोल ताशा वादनाचा पूर्वानुभव नव्हता, पण मराठी संस्कृती राज्या बाहेर जोपासण्याची जिद्द असल्यामुळे त्यांनी वादन शिकून आणि जोमाने सराव करून पहिल्या वर्षी मंडळ गणेशोत्सवात पथकाचा श्री गणेशा केला. दुसऱ्या वर्षी जोम कायम ठेवून अकरा वेगवेगळ्या ठिकाणी पथकाचं वादन झाल.

पण महानाद पथक एवढ्यावरच समाधानी न राहता त्यांनी एक मोठे ध्येय पत्करले. पथकाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने नवीन सदस्यांना समाविष्ट करण्यासाठी नुकतीच १ व २ मार्च रोजी ढोल ताशा कार्यशाळा मंडळाच्या सभागृहात संपन्न झाली. २५ इच्छुकांनी त्या कार्यशाळेत भाग घेतला. मला नेहमीच ढोल ताशा पथकाची ओढ होती आणि त्यांच्या जोश पूर्ण वादनाचे नेहमीच अप्रूप वाटायचे.

 आपणही कधी अश्या पथकाचा भाग असू अशी एक सुप्त इच्छा नेहमीच मनात होती अन् ती प्रत्यक्षात उतरली ह्या कार्यशाळेमुळे. दोन दिवस ढोल ताशा पारंगत वादकांनी सगळे बारकावे आणि वादनाचे तंत्र यांचे फारच उत्तम पद्धतीने प्रशिक्षण दिले. उत्कृष्ट शिक्षक आणि उत्साही विद्यार्थी,ह्यामुळे कार्यशाळा खूप जोमात पार पडली. अत्यंत उत्तम आयोजनासाठी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद, तसेच महानाद पथकाची वादक संख्या लवकरच १०-१५ वरून ५० आणि त्यानंतर शंभरी गाठो अशा मनःपूर्वक शुभेच्छा.

संदीप पांढरे

७ मार्च २०२५

बेंगळुरू

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *