संवाद

नमस्कार,

विनंती विशेष,

नवीन रुपातील म्हणजे डिजिटल स न वि वि आपल्याला आवडला असेलच. नविन्यांची ओढ हीच माणसाची खरी ओळख आहे. तुम्हा चोखंदळ वाचकांमुळे नेहमी काहीतरी नवीन करावे अशी ऊर्जा मंडळाच्या कार्यकारणीला मिळते.

२२ जून २०२५ रोजी कर्नाटक राज्याचे राज्यपाल श्री थावरचंद गेहेलोत ह्यांनी भारतातल्या सहा राज्यांचे राज्य दिन साजरा करायच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते . तिथे आपल्या मंडळाच्या कलाकारांनी महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कला सादर केल्या ( दिंडी , अभंग , लावणी आणि ढोल ताशा ). आपल्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माननीय राज्यपालांनी आपल्या मंडळाचे विशेष कौतुक केले , ह्या कार्यक्रमाचे फोटो ह्या अंकात आपल्याला बघायला मिळेल.

१५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन, त्यानिमित्त  मंडळात झेंडावंदन होणार आहे, त्याबद्दलची अधिक माहिती लवकरच दिली जाईल.

ढोलताशा, नाट्यकार्य आणि लेझीम ह्या कार्यशाळेच्या आयोजनानंतर आता आपण श्री गणपती मूर्ती कार्यशाळा घेणार आहोत, त्याबद्दलची अधिक माहिती  ह्या अंकात आहेच, ती नक्की वाचा आणि मोठ्या संख्येने तुम्ही सहभागी व्हाल अशी आम्हाला खात्री आहे. ऑगस्ट महिन्यात मंगळागौरीचा “एक श्रावण संध्याकाळ ” हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याची माहिती ह्या अंकात मिळेल. तसेच “घे भरारी” हे प्रदर्शन ह्या वर्षी बंगलोरमध्ये आयोजित होत आहे, त्याची माहिती तुम्हाला ह्या अंकात वाचायला मिळेल.

बाप्पाच्या आगमनाची ओढ सगळ्यांनाच लागली आहे, तरी सगळ्यांनी सढळ हस्ते श्री कार्यास हातभार लावावा.

जूनच्या अंकात शब्दाक्षरी ह्या स्पर्धेबद्दलची माहिती आणि निकाल वाचला असेलच. ह्या स्पर्धेत सहभागी संघांचे मनोगत आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळेल.  त्याच बरोबर नेहमीची लोकप्रिय सदर आहेतच.

स न वि वि गणेशोत्सव साहित्य स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. सर्व सहभागी स्पर्धेकांचे मनःपूर्वक आभार. स्पर्धेचा निकाल ३१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशन समारंभात जाहीर केला जाईल.

आणखी एक सांगायचे म्हणजे आपले सोशल मीडिया हॅण्डल सगळ्यांनी फॉलो करा. गणेशोत्सवाचे महत्त्वाचे कार्यक्रम आपल्याला तिकडे लगेच कळतील आणि तुम्हाला नियोजन करायला सोपे होईल.

तुमच्या सूचना, अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या.

महाराष्ट्र मंडळाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती तसेच इत्तर अपडेट्स मिळण्याकरता आपले  सभासदत्वाचे लवकरात लवकर नूतनीकरण करून घ्या ही विनंती

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही श्री चरणी प्रार्थना.

स्मिता बर्वे

संपादक मंडळ 

स न वि वि

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *