एक श्रावण संध्याकाळ मंगळागौर विशेष….
महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरु उत्तर विभाग यांनी ऋचिता दवंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक अविस्मरणीय असा मंगळागौर हा विशेष कार्यक्रम सादर केला.
मंगळागौरी हा महाराष्ट्रात नवविवाहित महिलांनी साजरा केला जाणारा श्रावण महिन्यातील एक उत्साहाचा व महत्त्वाचा सण. मंगळागौरी देवी ही सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनाची देवता मानली जाते. त्यामुळे या व्रताने स्त्रिया आपल्या पतीचे आरोग्य आणि दीर्घायुष्य तसेच सर्व कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पूजेनंतर स्त्रिया विविध पारंपारिक खेळ खेळतात. हे खेळ व गाणी स्त्रियांच्या एकत्र येण्याला प्रोत्साहन आणि त्यांच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करतात.
अगदी तसाच या श्रावण संध्याकाळी अनुभव आला.
सुरुवातीला ‘महानाद’ या ढोल पथकाने संपूर्ण हॉलमध्ये मंगलमय वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ‘सखी मंगळागौर’ या बेंगळूरु स्थित गृपने अर्थपूर्ण निवेदन करीत फुलपाखरू, कंबर फुगडी, कमळ, त्रिफुला, कोंबडा, ताक करू बाई, अग अग सासूबाई, दंड फुगडी, उठबशीची फुगडी असे अनेक विविध खेळ खेळून प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच परंतु घरगुती साधनं व सर्वांग सुंदर व्यायाम देणारे खेळ खेळत नकारात्मक वृत्तीचा त्याग करून सकारात्मकतेच्या लहरी उत्पन्न केल्या.
पारंपरिक पद्धतीने सर्वजणी नटून थटून आल्या होत्या. सभागृहात एक जल्लोष व आनंदाचे वातावरण होते.त्याच्या जोडीला विविध वस्तू विकणारे स्टॉल्स, पोटाची सोय करणारे खमंग व स्वादिष्ट घरगुती पदार्थांचे स्टॉल्स यांनी अगदी सर्वजणी तृप्त झाल्या. मनमुराद खेळण्याचा आनंद ही सर्वांनी लुटला.

महाराष्ट्र मंडळ उत्तर विभाग कार्यकारणी जातीने अगदी सर्वांची विचारपूस करीत होती.
महाराष्ट्र बाहेर आहोत असे काही काळ जाणवलेच नाही.
खूप खूप धन्यवाद सर्वांना पुढील अशाच एका नावीन्यपूर्ण कार्यक्रमाची वाट पाहत राहू.
जयश्री पोतनीस
