योगदान पुरस्कार आणि अभिमान पुरस्कार
महाराष्ट्र मंडळ संस्थापक दिनाच्या निमित्ताने मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहसा हजेरी लावली जातेच. नवीन बघायला, ऐकायला मिळते, मित्र मैत्रिणींचा कौतुक सोहळा असल्याने अजून उत्साह येतो. मान्यताप्राप्त व्यक्तींचे विचार हे नेहमीच प्रेरणादायी ठरतात.
अशाच अपेक्षेने ह्या वर्षीही येणे झाले. सत्कार समारंभ आटोपून प्रमुख पाहुणे व्याख्यानासाठी म्हणून उभे राहिल्यावरही मन जरा साशंक होते. एक बांधकाम व्यावसायातील व्यक्ती किती प्रभावी संवाद साधू शकेल अशी जरा शंका होतीच.
प्रत्यक्षात मात्र अतिशय प्रसन्न असं व्यक्तिमत्त्व असलेले श्री. विनायक देशपांडे बोलायला लागले आणि पहिल्या चार पाच वाक्यातच आज काही तरी नवीन ऐकायला मिळणार ह्याची खात्री पटली.
उमदे व्यक्तिमत्त्व, मराठी भाषेवरील पकड आणि संवाद साधण्याची खुबी मनाला भावून गेली.
नवी दिल्ली येथे नव्याने उभारलेल्या संसद भवनाच्या उभारणीची सखोल, मुद्देसूद मांडणी साध्या व प्रभावी भाषेत ऐकताना अधिक गुंगून गेलो.
पायापासून कळसापर्यंत हा वास्तू निर्मितीचा प्रवास अतिशय साध्या भाषेत सुटसुटीतपणे सगळ्यांना समजेल, भावेल असा मांडला गेला व सोबतीला मागे पडद्यावर दिसणारी तिथली दृश्ये देखील अचंबित करणारी होती. ह्या सर्वांना श्री. विनायक देशपांडे ह्यांच्या वक्तृत्वाचा जो साज चढला तो फारच सुंदर होता.
अतिशय सूक्ष्म बारकावे टिपत ओघवत्या भाषेतील हे त्या इमारतीच्या निर्मितीचे चित्रण सर्वांगाने समर्पक होते. वक्ता जेव्हा.. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली ह्या सुंदर काव्यपंक्ती एका दगडांच्या, विटा सिंमेंटच्या इमारतीचे वर्णन करताना सहज गुंफून जातो तेव्हा त्यांची हा प्रकल्प हाताळण्यातील अनुभवांची गुंतवणूक ही फक्त ठोकताळे मांडण्यापुरती नाही तर अजून बरेच काही मर्म ह्यात सामावलेले आहे हे प्रकर्षाने जाणवले.
देशाच्या सर्वोच्च सन्मान असलेल्या ह्या इमारतीच्या मागे एवढे काही दडलेलंआहे हे समजल्यावर आपण खरोखरच भाग्यवंत असं नक्की कळून चुकते.
श्री.विनायक देशपांडे ह्यांनी काय तपशील सांगितला तर…. मी काय सांगणार? तुम्ही एका सुंदर अनुभवाला मुकला एवढेच म्हणेन.
हा अनुभव नसून ती त्या पलीकडे असणारी अनुभूती होती हे मात्र खरं.
श्री.उदय पळनिटकर
