पुस्तक परीक्षण

मराठीतील एक अजून एक दमदार थरारक कथा म्हणून “टार्गेट असद शाह” चा उल्लेख करता येईल.

लेखकाविषयी थोडंसं :वसंत वसंत लिमये हे मराठी वाचकवर्गात, गिर्यारोहकात आणि इतर अनेक क्षेत्रातल्या लोकात एक प्रसिद्ध नाव. (त्यांच्या संपूर्ण नावामुळे ते तसेही प्रसिद्ध आहेत). आय आय टी मधुन पदवी घेऊन नंतर अनेक क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी केलेली आहे. इंग्लडमध्ये व्यवस्थापकांना प्रशिक्षण देणारी संस्था “हायप्लेसेस” यशस्वीपणे चालवत आहेत. आतापर्यंत सुमारे दहा हजार विविध क्षेत्रातील व्यवस्थापकांना प्रशिक्षण.  “साद हिमालयाची”, “धुंद स्वच्छंद”, “कॅम्पफायर”, “विश्वस्त”, “लॉक ग्रिफीन” ह्या कादंबऱ्या आणि इतर विविध माध्यमात लेखन.

            पुस्तकाचा फॉरमॅट, वेगवेगळ्या कथा,  वेगवेगळ्या वेळी,  वेगवेगळ्या ठिकाणी देशात /परदेशात,  एकाच वेळेस घडत असतात आणि नंतर त्या कथा एकमेकात गुंफल्या जातात आणि अतिशय उत्कंठावर्धक शेवटाला आणून सोडतात, असा आहे.

            अतिशय वेगवान कथानक आणि कथेत आलेल्या प्रत्येक भौगोलिक स्थळाचे अतिशय बारकाईने केलेलं वर्णन ह्यामुळे तिथला परिसर (आपण गेलेलो नसतानादेखील) अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो. तिथल्या पात्रांचे संवाद आणि एकंदरीत डिटेलिंग (बोली भाषा, अन्नपदार्थांचे उल्लेख वगैरे), वरच्या दर्जाचे आहे.

            भारत देशाविरुद्ध घातपात आणि भारताच्या कर्तृत्ववान आणि यशस्वी पंतप्रधानाच्या हत्येचा व्यापक कट , त्यात सहभागी असलेल्या परदेशी गुप्तचर संस्था , त्यांनी आपल्या देशात विणलेले स्लीपर सेल्सचे जाळे, (४८ इमेल ऍड्रेस ).  धाडसी आणि बुद्धिमान भारतीय गुप्तचर अधिकारी, त्यांनी तयार केलेली टीम आणि इतर तज्ज्ञ लोकांची घेतलेली मदत आणि ह्या प्रत्येकाचे एक एक उपकथानक असा कादंबरीचा एकंदरीत बाज आहे.

            सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घटना घडत आहेत त्याच्याशी टार्गेट असद शाह चे कथानक सुसंगत आहे, इतके की वाचताना अगदी खऱ्या जगातल्या लोकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केली की संपेपर्यंत खाली ठेववत नाही इतकी वेगवान कथानक आणि ते मांडायची हातोटी ह्यामुळे ही कांदबरी लोकांना आवडली आणि प्रसिद्ध झाली

–प्रसाद दाते

अनुक्रमणिका

1 thought on “पुस्तक परीक्षण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *