सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
सर्वप्रथम आपणा सर्वांना ६६ व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इ स न वि वि : मे २०२६ चा हा अंक आपल्यासाठी विविध कार्यक्रमांची माहिती घेऊन येत आहे.
मंडळी, आपल्या सर्व सभासदांच्या भेटीसाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. ह्यासाठीच एक दिवस राखून ठेवला आहे. त्याबद्दल अधिक माहिती आपल्यापर्यंत लवकरच
पोहोचविण्यात येईल.
मंडळातर्फे ‘हक्काचा कलामंच’ ह्या उपक्रमांतर्गत, पुष्प तिसरे : गायन कला विशेष ‘karaoke singing’ चा कार्यक्रम, १९ मे २०२६ रोजी आयोजित केला होता. त्याच बरोबर मराठी गझल लेखिका, सानिका दशसहस्त्र ह्यांनी त्यांच्या स्वरचित, भावपूर्ण अशा सुंदर गझला ऐकवल्या. आपल्या भरघोस उपस्थितीमुळे दोन्ही कार्यक्रमातील सहभागी सदस्यांचा उत्साह नक्कीच द्विगुणित झाला. ह्या कार्यक्रमाचा अभिप्राय आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळेलच.
‘हक्काचा कलामंच’ ह्या सदरातील पुढील पुष्प ‘नृत्य विशेष ‘ दिनांक ७ जून रोजी मंडळात आयोजित करण्यात येईल. अधिक माहिती अंकात पुढे आहेच.
मंडळातर्फे जून २०२६ मध्ये एक दिवसीय मराठी अभिवाचन कार्यशाळा आयोजित केली आहे. ह्या कार्यशाळेत प्रसिद्ध अभिनेते श्री. विघ्नेश जोशी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ह्याबद्दल अधिक माहिती अंकात पुढे आहेच.
तसेच, खास बेंगळूरुवासियांसाठी, आम्ही जुलै महिन्यात एक तुफान लोकप्रिय कार्यक्रम, ‘FOLK LOK’ घेऊन येत आहोत. अधिक माहिती अंकात पुढे.
मंडळात झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणे कधी कधी शक्य होत नाही. मात्र अशा वेळी कार्यक्रमाचा अभिप्राय तरी वाचायला मिळावा असे अनुपस्थित लोकांना वाटत राहते. त्यासाठी आम्ही नेहमी अभिप्राय देण्याची विनंती करत असतो. आपल्याला आवडलेला कार्यक्रम किती रंगला होता हे प्रेक्षकांनी इतरांना आवर्जून सांगितले पाहिजे म्हणजे असे कार्यक्रम परत करता येतील आणि बहुतेकांना ते पाहता येतील.
मंडळी, मंडळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेत, त्यात सहभागी होण्याकरता आपण आपल्या सभासदत्वाचे नूतनीकरण करून घ्या म्हणजे मंडळाशी संलग्न राहता येईल.
कळावे
लोभ आहेच, असाच वृद्धिंगत व्हावा
इ स न वि वि संपादक मंडळ
दीपा वैद्य
