पृथ्वी,”त्यांच्या” नजरेतून…….
जून महिना चैतन्यदायी पर्जन्याचा, सर्जनशील जमिनीतून बाहेर येणाऱ्या हिरव्यागार आच्छादनाचा ,मातीच्या आणि हिरवाईच्या सुगंधाने सर्वांची मने जिंकणारा .
उन्हाळ्याने पोळलेल्या तप्त झालेल्या करड्या वातावरणाचे रूपच पालटून टाकणारा .हो ना! पण नियमितपणे येणारा हा पाऊस आलाच नाही तर ?कधी विचार केला आहे का ?

करून बघा ,अक्षरशः जीवाला घाबरे करणारे चित्र डोळ्यांसमोर येईल. वेळीच उपाययोजना झाली नाही तर…. गेल्या शंभर वर्षात बदलत गेलेली मानवी सृष्टी आणि आपणच केलेली निसर्गाची कत्तल, दिवसेंदिवस कमी होत जाणारे पृथ्वीचे हिरवे आच्छादन हे दाहक वास्तव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे आणि हे सगळे पुराव्यानिशी सांगणारा डेव्हिड ॲटनबरो !
एक शतक जगणारा नॅचरल हिस्टोरियन ,बायोलॉजिस्ट ,प्लॅनेट अर्थ, ब्लू प्लॅनेट सारख्या अत्यंत सुंदर एपिक टीव्ही सिरीयल्स बनवणारा माझा अत्यंत लाडका माणूस!
८ मे १९२६ साली जन्मलेल्या या माणसाने वयाच्या विसाव्या वर्षापासून ब्रिटिश ब्रॉडकास्टर आणि बायोलॉजिस्ट/ नॅचरलिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली.

अजूनही १०० वर्षांचे डेव्हिड लिहितात, सांगतात आणि महत्त्वाच्या निसर्ग डॉक्युमेंटरीला कन्सल्टेशन देतात .नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन आणि त्यांचे अतूट नाते आपण बघत आलेलो आहोत. निसर्ग… प्राणी,कीटक, पक्षी,जलचर,वृक्षवल्ली यांच्यावरच्या इतक्या डॉक्युमेन्ट्रीज मधून त्यांचा आवाज आता आपल्याला अगदी परिचित झालेला आहे .
साधारण १८ कोटी वर्षांपासूनचा पृथ्वीचा इतिहास बघितला तर आत्तापर्यंत पाच वेळेला काही ना काही कारणाने पूर्ण विनाश झालेत पण तरीही पृथ्वी त्यातून तरुन गेली .
होलोसीन म्हणजे हिमयुगानंतर साधारण ११७०० वर्षांपासून चालत असलेला काळ जो रिलेटिव्हली स्टेबल असतो. चांगले वातावरण त्यात राखले जाते आणि पृथ्वीवरील सर्व सृष्टी वाढते. एकमेकांच्या बरोबर नाते टिकवत राहते आणि भरभरून वाढते,समृद्ध होते.

हे होलोसीनअंदाजे दहा हजार वर्ष नीट राहते. समुद्रातल्या फायटोप्लँक्टन पासून पृथ्वीच्या उत्तर भागातील जंगलांमुळे वातावरणाचा समतोल राखला जातो .जास्तीचा कार्बन डाय-ऑक्साइड रोखला जातो आणि एका लयीत ऋतू बदल होत राहतात .ऋतुचक्र सुरळीत सुरू राहते.हे सगळे एकमेकांशी इतके निगडित आहे आणि एकमेकांवर इतके अवलंबून आहे की परिणामी यातील काहीही गोष्टींचा विनाश सर्वांवर परिणाम करत जातो आणि विनाशकारी ठरतो .
जसे जसे यांत्रिक शोध लागत गेले ,मानवाने निसर्गाचा कळत नकळत ऱ्हासच केला .
१९३७ साली जागतिक लोकसंख्या २.३ अब्ज होती ६६% जंगले (wilderness) आणि कार्बन (पीपीएम..parts per million) २८० होता .
१९५४ साली जागतिक लोकसंख्या ३ अब्ज झाली.रिमेनिंग वेल्डरनेस ६४% आणि कार्बन ३१५ पीपीएम.
यानंतर विमानांचे शोध, त्याच्यानंतर झालेले दुसरे जागतिक महायुद्ध, त्यानंतर त्याच्या अनुषंगाने निर्माण झालेले यांत्रिकीकरण, खनिज तेलांचा अतोनात वापर सुरू झाला. याच्या परिणामी १९७१ साली जागतिक लोकसंख्या ४.३ अब्ज, रिमेनिंग विल्डेरनेस ५५% ,कार्बन ३३५ पीपीएम झाला.वर्षानुवर्ष पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांची आपण लूट करत गेलो आणि आत्ताची २०२५ साली ८.३ अब्ज जागतिक लोकसंख्या .त्यातील जवळपास १.४७ दशलक्ष भारताची लोकसंख्या आणि १.४१ चीनची लोकसंख्या आहे.कार्बन ४२५ पीपीएम आणि उरलेला रिमेनिंग वील्डरनेस फक्त २३% पृथ्वीवर आणि १३%महासागरात इतकाच उरला आहे .
यावरून लक्षात येईल की जसजशी आपली लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणात कार्बन वाढत गेला.
झाडं ,प्राणी, पक्षी यांची संख्या कमी होत गेली.जंगले तोडून शेती झाली.त्यातून एकसारखी पिके घेण्याने जैवविविधता संपू लागली.
कार्बन कमी करणारी झाडे, जंगले वाढवायला हवी.कार्बन कमी करणारे पाण्याचे साठे वाढायला हवेत. ग्लोबल वॉर्मिंग कमी झाले नाही तर ध्रुवीय बर्फ विरघळतच राहील आणि सर्व सृष्टी वाचवायची असेल तर आता मात्र जोरात प्रयत्न करायला हवेत.
आपण स्वतः ,आपली गावे, आपले प्रदेश ,आपले देश या सर्वांनी प्रयत्न केले तर सृष्टी परत पुनरुत्जीवित होईल .
डेव्हिड म्हणतात अजूनही हातातून पूर्ण वेळ निघून गेली नाही.त्यासाठी पृथ्वीची बायोडायव्हर्सिटी/जैवविविधता वाढवायला हवी त्यासाठी पृथ्वीला rewild/पुन्हा जंगली करणे अत्यंत गरजेचे आहे. सूर्यप्रकाशातून आपल्याला तीन ट्रिलियन किलोवॅट अवर्स ऑफ एनर्जी रोज मिळते आहे ,त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला गेला पाहिजे. फॉसिल फ्युएलचा कमीत कमी वापर करून कार्बनची पातळी कमी व्हायला/करायला हवी .
सध्या सुरू असणाऱ्या तेलासाठीच्या युद्धातूनही आपण आता शहाणं व्हायलाच हवं .

डेव्हिड म्हणतात १९८६ च्या चेर्नोबील रेडिएशन नंतर सर्व काही उध्वस्त झालं. त्या भागातून माणूस निघून गेला,मरण पावला. किरणोत्सर्ग झाल्यामुळे तिथे आजही ह्यूमन पॉप्युलेशन नाही, पण आज इतक्या वर्षानंतर तिथे वनस्पती उगवल्या, प्राणी ,सृष्टी ,पक्षी आले. हळूहळू निसर्गाने आपले राज्य तिथे परत स्थापित केले. पण मानवाला ते शक्य आहे का ? तर नाही!
आज तरी आपल्या माहितीनुसार आपली पृथ्वी अंतराळात एकटी आणि असुरक्षित आहे . आपले अस्तित्वच तिच्यामुळे आहे. तिला संपवले तर आपले काय होईल, हे आपण सगळे जाणतोच. पृथ्वी ही आपल्या एकट्याची मानवाची मालमत्ता नव्हे. ती तर सर्व प्राणिमात्रांची, निसर्गाचीही आहे ,हे नक्की लक्षात ठेवायलाच हवे!
उद्ध्वस्त ,उजाड ,मेलेले जग द्यायचे आहे का आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला ?की छान हरीभरी वसुंधरा ! याचा जरा थांबून विचार करूया!
एक शतकातल्या प्रवासातले निसर्गातल्या घडामोडींचे अनेक टप्पे डेव्हिड एटनबरो यांनी स्वतः बघितले आहेत .
यांचे हे पूर्ण अनुभव बघण्यासाठी
A life on our planet ही फिल्म बघायलाच हवी. मी एक निसर्गप्रेमी सांगते म्हणून तरी नक्की बघा आणि नंतर अर्थातच त्यांच्या इतर डॉक्यूमेंटरीज देखील तुम्हाला नक्की बघाव्याशा वाटतीलच! ही खात्री आहे!
David Attenborough सरांना शंभराव्या वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
विद्या पळसुले
