झिम्मा : आठवणींचा गोफ

झिम्मा – आठवणींचा गोफ हे विजय “बाई” मेहता ह्यांचे आत्मचरित्र. “बाई” ही विजय तेंडुलकरांनी त्यांना दिलेली पदवी आणि पुढे त्यांना सगळेच बाई म्हणायला लागले, त्यांची वेगळी अशी ओळख करून द्यायचे कारण नाही. त्यांचे मराठी आणि जागतिक नाट्य सृष्टीतली साठ – पासष्ट वर्षांची वैविध्यपूर्ण कारकीर्द, रंगायन, NCPA मधील व्यवस्थापन हेच पुरेसं आहे.
बाईंनी त्यांचे आत्मचरित्र साधारण चार भागात/टप्प्यात लिहिले आहे, बेबी (अगदी लहानपण, शाळकरी), विजू जयवंत (तरुणपण, महाविद्यालयातील [नाटकाचे दिवस] स्वातंत्र्य मिळाला तो काळ), विजया खोटे (लग्नानंतरचे दिवस, कुटुंब, नाटके, पतीचे आकस्मिक निधन) आणि विजया मेहता (दुसरे लग्न, इंग्लंड मधील शिक्षण, जर्मनीतील नाट्यप्रयोग, आणि भारत आणि भारताबाहेरची कारकिर्द,NCPA).
यात बेबीचा भाग बाईंनी तृतीय पुरुष एकवचनात आणि इतर तीन प्रथम पुरुष एकवचनात लिहिले आहेत आणि इथुनच हे आत्मचरित्र वेगळे आहे ह्याची जाणीव व्हायला लागते. अतिशय नेमकी मांडणी आणि आयुष्यातल्या टप्प्यात त्या वयानुरूप भाषेमध्ये लिहिले आहे. प्रत्येक प्रसंग अगदी बारकाईने उभा राहतो आणि त्यातले डिटेल्स अगदी भिडतात. उदा. भिवंडीच्या प्रशस्त घराचे वर्णन. बायजीचे व्यक्तीचित्र, तिच्या पदराला येणारा तपकिरीचा मंद वास वगैरे., किंवा फोटो काढायला स्टुडिओत जाताना केलेला व्हिक्टोरियातला प्रवास.
वाचक म्हणून मला अजून एक भावलेली गोष्ट म्हणजे, हे चरित्र लिहिताना अतिशय सुटसुटीत मांडणी, साध्या सरळ सोप्या शब्दात सांगितलेली गोष्ट आहे. (त्यांनी जर्मन, इंग्लिश लोकांबरोबर केलेल्या कामाचा परिणाम असावा) दुसरी गोष्ट म्हणजे बाई कुठेही, कसलेही उदात्तीकरण करत नाहीत , किंवा कुठेही भावनातिरेक न करता काय प्रसंग घडला आहे ते सांगतात. त्यांच्या आणि कुटुंबातल्या लोकांचे संबंध वगैरे वर अतिशय मोजक्या शब्दात भाष्य करतात. नातेसंबंधात त्यांच्याकडून झालेल्या चुका प्रांजळपणे कबुल करतात आणि त्या दुरुस्त केल्याचा प्रयत्न केल्याचे आवर्जून सांगतात. त्यांना पाठिंबा देणाऱ्या कुटुंबाचा (दुर्गाबाई खोटे, हरिन खोटे, फरोख मेहता, मुले) ह्यांचा उल्लेख करतात.
नाटक शिकताना, करताना. कुणाकडून काय शिकायला मिळाले, (इब्राहिम अल्काझी, अदि मर्झबान, डॉ भालेराव, केशवराव दाते) किंवा कुणाच्या इनपुट चा कसा वापर केला किंवा पु ल, किंवा कसे तेंडुलकरांना संहितेत बदल करायच्या सूचना अगदी मोकळेपणाने लिहितात.
नाटक किंवा परफॉर्मिंग आर्ट म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांशी संबंध, वैचारिक देवाणघेवाण आणि त्यातून तयार झालेले रंगावकाश ह्याची वर्णन वाचून एखादा नाट्यप्रयोग कसा घडत गेला, त्यामागे काय काय विचार होते हे समजत गेले. ह्या पुस्तकाच्या लिखाणावरून, बाई त्यांची नाटके कशी बसवत असत किंवा कलाकारांना साधारण काय पद्धतीने एखादी गोष्ट समजावून सांगत असतील, ह्याची थोडीफार कल्पना येते. त्याच बरोबर त्यांनी सुरू केलेल्या रंगायनची सुरुवात, त्याची जडणघडण, त्यामागचा त्यांचा विचार (नाट्य चळवळ, कमी किंमतीत नाटकाचा सेट उभा करणे वगैरे , वेगवेगळ्या कार्यशाळा, आयोजित केलेले विविध कार्यक्रम [ह्यात रविशंकर आणि १२ वर्षांचे झाकीर हुसेन ह्यांचा उल्लेख आहे]). रंगायन बंद केल्यावर त्यात भावनिक गुंतवणूक न करता “सुटले” अशी भावना व्यक्त करतात. रंगायन चालु असताना वेगवेगळ्या लोकांबरोबर आणि संस्थांबरोबर “Collab” करण्याचा प्रयत्न चांगला लक्षात राहतो.
बाईंनी ह्या पुस्तकात काही सुंदर शब्द/वाक्य वापरली आहेत. त्यांनी हे पुस्तक म्हणजे “The magic of theatre” चा शोध असं म्हणलं आहे. किंवा नाट्यप्रयोगाला केरळम मधल्या मुदियट्टू ची उपमा दिलेली आहे. किंवा प्रत्येकजण आपला स्वतःचा एक “टिप कागद” घेऊन येतो असं त्या म्हणतात. व्यावसायिक रंगभूमीला त्या “लोकमान्य” रंगभूमी म्हणतात .
एका घरंदाज, सधन कुटुंबात जन्म, सेवादलाचे दिवस, नाटकांची सुरुवात, अतिशय श्रीमंत घरात लग्न, पतीचे निधन, दुसरे लग्न, इंग्लंड, जर्मनीतले नाट्य शिक्षण आणि काम, परत आल्यावर व्यावसायिक रंगभूमीवरील काम, दूरदर्शन मालिका, चित्रपट, NCPA च्या व्यवस्थापिका , असा जीवनप्रवास अतिशय सुंदर पद्धतीने मांडतात.
त्यांना ह्यापुस्तकाकरता अंबरीश मिश्र ह्यांचे सहाय्य मिळाले आहे आणि हे राजहंस प्रकाशनातर्फे २०१२ला प्रसिद्ध झाले.
आपल्या वाचनालयात हे पुस्तक आहे, आपण ते जरूर वाचा.
– प्रसाद दाते
