— सौ. विद्या चिडले —
विड्याच्या पानाबद्दल काय लिहावं आणि काय नाही तेच कळत नाही. माणसालाच काय तर देवालाही आवडणार्या विड्याच्या पानाची वेल, जी नागवेल म्हणूनही ओळखली जाते, आपल्या बागेत असावी असं नक्कीच वाटतं. भारतीय जीवनातील विड्याच्या पानाचं गुणवर्णन सर्वच लोक करतात. अनन्यसाधारण गुणधर्म असलेल्या नागवेलीला भारतीयांच्या आयुष्यात अनन्यसाधारण स्थान आहे. संस्कृतमध्ये विड्याच्या पानाला तांबुल किंवा नागरवेल म्हणतात. इंग्रजीत betel leaf म्हणतात.
जड जेवण झाल्यावर विशेषतः गोडाधोडाचं आणि त्यातही वडा-पुरणाचं जेवण झाल्यावर विडा खाणाची इच्छा होत नाही अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. खरं तर विड्याचं पान आवडत नाही असं म्हणणारा एखादाच दिसेल.
विडा खाण्याची परंपरा भारतासह पूर्व आशिया व दक्षिण आशियात प्रचलित आहे. जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी, औषधी उपचार म्हणून जसे विड्याच्या पानाचे महत्त्व आहे, तसेच सणवार, पूजाअर्चा, शुभकार्य यातही विड्याचं पान मानाचं स्थान पटकावून आहे. कुठल्याही शुभकार्यापूर्वी देवासमोर विड्याची दोन पानं व सुपारी ठेवतात. देवीची, स्त्रियांची ओटी भरताना, हळदीकुंकवाला, विड्याच्या पानावर खण, नारळ व इतर सौभाग्य लेणे ठेवतात. नवग्रहाची मांडणी विड्याच्या पानावरच केली जाते. सणासुदीला विशेषतः गौरी गणपतीला तर नैवेद्यावर पाच पानांचा गोविंदविडा हमखास ठेवतात. ‘ विडा उचलणे ‘ म्हणजे एखादं आवश्यक पण अवघड असलेलं काम पूर्णत्वास नेण्याचा’ विडा उचलणे’. असा वाक्प्रचार प्रचलित आहे. म्हणजे देवाच्या नैवेद्यावर, नेमधर्म, सन्मानाचे प्रतिक , आरोग्य संवर्धक, त्रिदोषनाशक, प्रथा परंपरा, संस्कृतीचं प्रतिक, व्यवसाय, खाद्यसंस्कृती अशा फ्रंटवर विड्याचे पान खरेखुरे उतरले आहे.
काही काही घरी तर विड्याचे पान खाणे हा एक सोहळा असतो. मला आठवतं आमच्या घरी श्रीमहालक्ष्मी सणाला जेवायला आप्तेष्ट यायचे. श्रीमहालक्ष्मीची पूजा झाल्यावर पुरूष मंडळी जेवायला बसली की सर्वांसाठी विडे तयार करण्याचं काम एखाद्या जाणकार व्यक्तीकडे सोपवलं जायचं. मग त्या व्यक्तीस मदत म्हणून विड्याची पानं धुवून कोरडी पुसून देणं, देठ व पानाचं टोक कात्रीने कापून मोठ्या तबकात किंवा ताटात गोलाकार, दोनच्या पाढयानी पालथी लावून ठेवणं हे काम आम्हा बच्चेकंपनीला दिलं जायचं. पण त्यावर चुना, काथ व इतर मसाल्याचे पदार्थ घालण्यास आम्हास परवानगी नव्हती. थोडा कळीचा चुना व थोडाच काथ हलकेच पानभर पसरवून त्यावर बडीशोप, ओवा, विलायची, जेष्टमधाची पूड, किसलेलं सुकं खोबरं, गुलकंद, असल्यास चेरी, अस्मानतारा (थंडाई) असा पानाचा मसाला घालून, विडा त्रिकोणी किंवा लांबोळा बांधणे आणि तो सुटू नये म्हणून त्यावर लवंग खोचणे हे काम त्या जाणकार व्यक्तीचं असायचं. जेवण झाल्यावर सर्वांना हे बांधलेले विडे देण्याचं काम लहानग्याना करावे लागत असे. आई आम्हाला म्हणायची उघडा विडा द्यायचा नाही. एखादा चुकून उघडलाच तर तो पुन्हा नीट बांधावा लागत असे. काही विडे खलबत्त्यात बारिक कुटून तो तांबूल वयस्क लोकांसाठी डब्यात भरून ठेवत असत. त्या डब्यातल्या तांबूलावर मात्र आम्हा चिल्ल्या-पिल्ल्यांची नजर असे. तांबूल चविष्ट होणे ही पण एक पाककलेतील विशेषता. असो.
कपूरी पान व कलकत्ता पान, हिरवं पान व पिकलेलं पान ही नावं लहानपणापासूनच माहीत झाली आहेत. पिकलेलं पान खाण्यास चांगलं असलं तरी हिरव्या पानाचेही औषधीगुण अमाप आहेत.
आयुर्वेदिक उपचार पद्धतीत तर नागवेलीच्या पानाचा वापर अनेक प्रकाराने दिला आहे.
१) विड्याचे पान जेवणानंतर खाल्ले तर अन्न लवकर व चांगले पचते.
२) नाक सारखे वाहत असेल तर विड्याच्या पानाचा रस चिमूटभर मिरपूड व थोडे मध घालून सकाळ संध्याकाळ घेतल्यास फायदा होतो.
३) चार विड्याची पानं देठासकट वाटून त्यात दोन चमचे मध घालून सेवन केल्यास कफ कमी होण्यास मदत होते. तसेच दम्याचा त्रास कमी होतो.
४) पानाचा रस व मध याचे चाटण दिल्यास अपचन होत नाही व वाताने पोट फुगत नाही.
५) विड्याच्या पानात सैंधव मीठ घालून सेवन केल्यास भूक लागते.
६) विड्याच्या पानाला एरंडेल तेल लावून ते थोडे गरम करून ते पान किंवा पानाची पेस्ट करून त्याचा लेप गुडघ्यावर सूज असल्यास लावतात. त्याने सूज उतरते.
७) नागवेलीच्या पानाचा रस डोक्यावर लावला तर डोकेदुखी जाते.
८) गायीचे तूप लावून, विडा चावून चावून खाल्ल्यास तोंडातील अल्सर बरा होतो.
९) विड्याची पानं वाटून लेप डोक्यावर लावतात.
१०) विड्याच्या पानाला तेल लावून गरम करून लहान मुलांच्या छातीवर लावतात त्याने कफ कमी होतो. तसेच पोटाला गुब्बारा आला असेल तर पानाने पोटही शेकतात व गरम पान पोटावर बांधतात.
११) काही ठिकाणी असेही वाचले आहे की हळद व गायीचे तूप लावून पान जखमेवर बांधले तर व्रण लवकर बरा होतो.
१२) असे म्हणतात की विड्याचे पान विषनाशक आहे. त्यामुळे किडा चावला किंवा रगडला गेला असल्यास त्या भागावर पानाचा रस चोळला तर विषबाधा होत नाही व खाज येत नाही.
१३) भीमसेनी कापूर घालून हिरवे पान चावून चावून खाल्ल्यास दातदुखीवर फायदा होतो. भीमसेनी कापूर चांगला असतो त्याचा रस पोटात गेला तरी हरकत नाही. पण साधा कापूर असेल तर तोंडातील लाळ सतत थुंकावी. पोटात जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे भीमसेनी कापूर वापरतात.
१४) नागवेलीचे पान मलसारकही आहे.
१५) तोंडाची दुर्गंधी घालवतो.
१६) रक्तशुध्दी होते.
१७) वेलची, लवंग, दालचिनी व विड्याचेपान पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास भूक नियंत्रित होते.
१८) विड्याचे पान जंताच्या त्रासावर फायदेशीर आहे.
तिखट, तुरट, थोडी गोडसर, अशी चव व षड्रसांनी भरपूर असलेल्या नागवेलीच्या पानांत प्रथिने, खनिजं, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, फायबर, क जीवनसत्त्व,भरपूर प्रमाणात आहेत. तंबाखू व सुपारी न टाकता विड्याचे पान रोज जेवणानंतर खाल्ल्यास शरीरातील त्रिदोषांचे (वात, पित्त व कफ) नियमन होते. चुना कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. थोडा पानात घालून सेवन केल्यास फायदा होतो. रोज जेवणानंतर विडा खाणे हितावह असले तरी काही लोकांना विडा खाल्ल्यावर तोंड उतून येते. तेंव्हा अशा लोकांनी रोज विडा खाऊ नये. तसेच विड्याच्या अतिसेवनाने कर्करोग होतो.
सदाहरित अशा ह्या वेलीचे आयुष्य बरेच असते. दांड्या नाजुक व दुबळ्या असतात. त्याला कांड्या किंवा पेर म्हणतात. हे कांडे एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे जाते. ज्या ठिकाणाहून हे कांडे किंवा पेरं वळतात तिथे पान येते तसेच खाली बारिक मुळं फुटतात. मुळं फुटलेल्या काड्या कापून जमिनीत किंवा कुंडीत लावाव्या. ही वेल आधाराने छान वाढते. अंगणात लावल्यास एखाद्या झाडाच्या किंवा कंपाऊंड वाॅलच्या जवळ लावावी. बाल्कनीत कुंडीत लावल्यास रेलिंग जवळ किंवा माॅसस्टिकच्या आधाराने लावावी. ही पाने हृदयाच्या आकाराची व टोकदार तसेच ही चकचकीत असतात.
विड्याच्या पानाचे उत्पादन आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र, बिहार,बंगाल मध्यप्रदेश,मलबार,गुजरात ह्या भागात जास्त होते. उबदार, दमट हवामानात ही वेल चांगली वाढते. पाऊस असेल त्या भागात पानाचे मळे छान टिकतात.
नागवेलीला भुसभुशीत व सुपीक जमीन लागते. ओलसर माती असली की वेल वाढते. जास्त उन्हात वेल करपते. चांगली खतयुक्त माती कुंडीत भरावी. तंतूसारखी बारिक मुळं पेरावर जिथे पानं फुटतात तिथून कापून कुंडीत लावावी. कटिंग लावल्यावर मातीत ओल राहील याची काळजी घ्यावी लागते. अति पाणी किंवा मातीत कस नसेल तर वेल नीट वाढत तर नाहीच कधी कधी काळी बुरशी, किंवा पानाला मागे काळे डाग पडतात. पानं कधी टोकाकडून पांढरी पडायला लागतात अशी पाने लगेच काढून टाकवीत.
काही जातीची पानं जरड असतात. काहीच्या पेरावर बारिक दांडी फुटून त्यावर बारीक बिया लागतात. ह्या बिया पेरल्यानंतरही वेल लागते.
पूर्वी गोड पान किंवा मिठा पान, मसाला पान, साधं पान व तंबाखूयुक्त पान असे प्रकार होते. परंतु काही व्यावसायिकांनी विड्याच्या पानाच्या व्यवसायाला वैविध्यपूर्ण रंग दिलाय. लोकांच्या चवीनुसार बदल तर केलाच पण कल्पकतेने, विड्याच्या दर्दींना चवीतील अभिनव प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. त्यात गुलकंदाचं, केशराचं, सुपारीचं, वेलदोडा-लवंगिचं, बिना सुपारीचं, भीमसेनी कापूर घालून, असे विविध प्रकार आणले आहेत. इतकेच काय तर चाॅकलेटयुक्त, स्ट्रॉबेरीचे अशा आणखी बर्याच चवींची भर घालून लोकांच्या चवीवर impact घडवून आणला आहे.
जेवणानंतर विडा खाणे खूप आरोग्यदायी असले तरी त्याची सवय मात्र चांगली नाही.
