‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’… ही उक्ती ज्यांच्यासाठी चपखल बसते, अशा डॉ. पुष्पा द्रविड यांचे चरित्ररुपी पुस्तक ‘कॅनव्हास ते वॉल’ श्रीमती शर्मिला पटवर्धन यांनी लिहून नुकतेच प्रकाशित केले.
या पुस्तकातील काही उताऱ्यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम लेखिका आणि पुस्तकाच्या प्रकशिका सुप्रिया यांनी ४ डिसेंबरला मंडळात सादर केला.
एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीचे जीवन चरित्र आपण जसे उत्सुकतेने वाचतो, तसेच आपल्याला परिचित असलेल्या व्यक्तीचे जीवन चरित्र वाचायला खूप आवडते.
डॉक्टर पुष्पा द्रविड त्यांच्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मुलामुळेच नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वाने बेंगळुरूमध्ये प्रसिद्ध आहेत, तसेच महाराष्ट्र मंडळाच्या जुन्या सभासदांना सुपरिचित आहेत. त्यामुळे साहजिकच त्याच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे अभिवाचन ऐकायला श्रोत्यांनी गर्दी केली होती.
सुप्रसिद्ध लेखिका सानिया यांनी पुस्तकाविषयी त्यांचा अभिप्राय सांगितला. जाईने त्यांच्या जीवनप्रवासाशी निगडित अशी मुलाखत घेतली.
एक कर्तव्यदक्ष गृहिणी, कर्तृत्ववान मुलांची आई आणि फाईन आर्टच्या प्रोफेसर ते म्युरल साकारणाऱ्या कलाकार ….अशा अष्टपैलू व्यक्तीच्या जीवनावरील पुस्तक बहुतांशी सर्व रसिक श्रोत्यांनी विकत घेतले आणि त्यावर पुष्पाताईंची स्वाक्षरी घेतली. पुष्पाताईंनी आनंदाने स्वाक्षरी तर केलीच पण त्या व्यतिरिक्त त्यावर प्रत्येकाला वेगवेगळे कॅरिकेचर काढून देऊन खूश केले.
