माणुसकी

–वैशाली चौधरी —

(ही कथा तुम्ही https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1k6goo येथे ऐकूही शकता)

संध्याकाळचे साडे सहा वाजून गेले, तरी बस चा अजून पत्ता नव्हता. 

“छे! आज पुन्हा उशीर. “, 

घड्याळाकडे बघत प्रीती पुटपुटली. तोच लांबून येणारी तिची बस तिला दिसली, खचाखच भरलेल्या त्या बस मध्ये प्रीती कशीबशी घुसली. बस मध्ये इतकी गर्दी होती कि उभे राहायला सुद्धा जागा नव्हती, गर्दीतल्या लोकांच्या घामाचा तो कुबट वास आणि बंद खिडक्यांनी, तिला गुदमरल्यासारखे झाले होते. गर्दीतला प्रत्येक जण जागेसाठी तडफडत होता. खांद्यावर लॅपटॉप बॅग टाकून, बस मधील खांबाला एका हाताने पकडून प्रीती उभी होती. बाजूच्या सीट वर बसलेल्या मुलीला तिने खिडकी उघडायला सांगितले. खिडकी उघडताच थंड वाऱ्याची झुळूक आली, तेव्हा कुठे तिला थोडे बरे वाटले. तिचा स्टॉप शेवटचा, त्यामुळे तासभर असेच उभे राहावे लागणार होते. बॅग मधून मोबाइल- इअर फोन काढून तिने कानाला लावला आणि गाणी ऐकू लागली. साधारण वीस मिनिटांनी, बाजूच्या सीट वरची मुलगी उतरली. जाताना तिने तिची जागा प्रीतीला दिली. इतका वेळ ताटकळत उभी राहिलेल्या प्रीतीला  बसल्यावर हायसे वाटले.  

पुढच्या पाचच मिनिटात एक आजीबाई हातात पिशवी घेऊन बस मध्ये कशाबशा चढल्या आणि जेष्ठ नागरिकांच्या सीट कडे वळल्या. पण तिथे आधीच कुणीतरी बसलेले होते. हे नेहमीचेच होते. कधी कधी तर तरुण मंडळीसुद्धा  सुद्धा वृद्ध झाल्यासारखी, ज्येष्ठ लोकांच्या सीट वर बसून राहायची. हिरमुसलेल्या चेहऱ्याने गर्दीतून वाट काढत त्या आजीबाई जागा शोधू लागल्या. त्यांना पाहताच प्रीती पटकन उभी राहली आणि तिची सीट दिली. त्यांनी हसून मायेने तिला आशीर्वाद दिला. प्रीतीच्या चेहऱ्यावरही समाधान आले. 

 प्रीती खूपच भावुक आणि हळवी होती. दुसऱ्यांना मदत करणे हा स्वभावच होता तिचा. स्वतः कितीही थकली असली तरी, बस मध्ये मिळालेली जागा कितीदा ती गरजू व्यक्तींना द्यायची.  पुन्हा त्याच खांबाला पकडून ती गाणी ऐकत उभी राहिली. साधारण दोन स्टॉप झाल्यावर एक बाई बस मध्ये चढली. एका हातात ६-७ महिन्यांचे बाळ, दुसऱ्या हातात गाठोडे आणि साधारण ५-६ वर्षांची तिची मुलगी. हे सगळे सांभाळत ती बाई कशी बशी बस मध्ये पुढे सरकली. सडपातळ शरीरयष्टी, अंगावर मळकट साडी, मुलांचे जुनाट कपडे पाहून ती खूपच गरीब असावी.  एका हातात बाळ असल्यामुळे, तिला धड उभे राहता येईना, बस च्या ब्रेक ने सारखा तिचा तोल जायचा. तिची हि सर्कस प्रीतीला काही पाहवेना. तिने बाजूच्या सीट वर बसलेल्या एका स्त्री ला विनंती केली, 

“हाय, तुमची सीट या बाईंना द्याल का? त्यांच्या हातात बाळ आहे. त्यांना या गर्दीत उभे पण राहता येत नाहीये. आणि हि छोटी मुलगी पण आहे. तुम्ही सीट दिली तर त्या तिघांनाही बसायला मिळेल.”

“नाही हो, माझा शेवटचा स्टॉप आहे. माझ्या पायांना प्रॉब्लेम आहे. “, त्या स्त्री ने नकार दिला.

प्रीती ने आणखी एका कॉलेज स्टुडन्ट ला विनंती केली,

” तू देशील का ग तुझी जागा यांना?”

“नाही.”, त्या मुलीचे उत्तर.

“पण तू तर तरुण आहेस. तरुणांमध्ये ताकद आणि जोश जास्त असतो. “

“सॉरी, आज मला बरे वाटत नाहीये. “, ती मुलगी.

प्रीतीला काय करावं ते सुचत नव्हते. तिने कंडक्टर ला बोलावले.

“दादा, या बाईना कुणीच नाही सीट देत. काहीतरी करा ना.”, ती कळवळून बोलली.

ती बाई प्रीतीकडे खूप आशेने बघत होती. 

“मी काय सांगणार ताई, ज्याचे त्याला कळायला पाहिजे,” असे म्हणून तो तिकीट काढण्यास पुढे निघून गेला.

इतक्यात ड्राइवर ने कचकन ब्रेक दाबला आणि ती बाई समोरच्या एका मुलीवर आदळली. मुलीला खूप राग आला, तिने त्या बाईला बरेच काही ऐकवले. ती बिचारी ऐकून गप्प उभी होती. 

प्रीती भडकली,

“त्यांनी मुद्दाम थोडीच केले ? कडेवर बाळ आहे, इथे त्यांना नाही पकडता आले.”

“तुम्ही का मध्ये पडताय? तुमचा काय संबंध? इतक्या गर्दीत मुलांना घेऊन कशाला चढायचे हिने बस मध्ये?”, ती मुलगी.

आता मात्र प्रीतीची सटकली.

“वाह छान. एरवी लेडीज सीट वर कुणी पुरुष बसला तर किती गोंधळ घालता, हि आमची राखीव जागा आहे वगैरे वगैरे. पण स्वतः मात्र जेष्ठ नागरिक किंवा विकलांग यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागा पण तुम्ही बळकावता. असे लोक बस मध्ये चढले तर पटकन उठून त्यांची सीट त्यांना देत नाही. आणि अशा गर्दीत धक्का लागला तर समजून न घेता कांगावा करता. कुठे गेली हो तुमची माणुसकी”, प्रीती आख्या बसला बोलत होती.

“ह्या बाई गरीब दिसत आहेत त्यावरून तुम्ही त्यांना जज करून जागा तर देत नाहीच उलट त्यांनी कधी आणि कसा प्रवास करावा हे हि ठरवता …वाह ..”, बोलता बोलता प्रीती ला भरून आले. बस मध्ये शांतता… ती बाई तशीच शांतपणे उभी होती. नंतर पुढच्या स्टॉप वर ती उतरून गेली सुद्धा . 

शेवटचा स्टॉप जवळ आला. बरेच जण उतरल्याने बस रिकामी झाली होती.

थोड्या वेळाने कंडक्टर प्रीती जवळ आला ,”ताई, इतके नका मनाला लावून घेऊ. हे रोजचेच आहे. मी दिवसभर हेच बघत असतो. सगळे जागेसाठी भांडतात. काहीजण स्वतःची जागा हि  देतात. पण तुमच्यासारखे आगळी वेगळी माणुसकी असलेले, आज मी पहिल्यांदाच बघतो आहे.”

प्रीती ने शांतपणे ऐकून घेतले, “ह्म्म्म, निघते दादा. पण तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा गरजू लोकांना सीट मिळेल याचा प्रयत्न करा.”, असे म्हणून ती निघून गेली.

घरी पोचताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आईने विचारले, “काय झाले ग बाळ. अशी दु:खी का?”

आईला पाहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. घडलेला प्रकार तिने आईला सांगितला , “असे कसे ग आई, जगात माणुसकीच नाही उरली.”

“रडू नको बाळ. किती त्रास करून घेतेस. इतके वाईट नाहीये हे जग. तुझ्यासारखी प्रेमळ आणि दुसऱ्यांना मदत करणारी माणसे पण आहेतच ना या जगात. “

“मी एकटी नाही ग पुरेशी. आज त्या बाईला नाही मदत करू शकले मी. “, प्रीती नाराजीच्या सुरात म्हणाली.

“अग पण तू प्रयत्न केलास ना. ते महत्वाचे आहे. आणि त्या बाईने पण स्वतःसाठी काही प्रयत्न नको का करायला. “

“म्हणजे? ती काय करणार लाचार बाई?”, प्रीतीला समजले नाही.

“कुणी सांगितले ती लाचार होती? तिने स्वतःला तसे करून घेतले होते. आज तू तिच्यासाठी आख्या बस शी लढलीस. समजा, तू तिला सीट मिळवून दिली असती, तरी उद्या तिच्या आयुष्यात असे प्रसंग कितीदा तरी येतील. प्रत्येक वेळेस तू थोडीच असणार आहेस तिच्याबरोबर. तिने स्वतः हि स्वतः साठी लढायला नको का ?

जो स्वतःची मदत करतो, त्याचीच देव मदत करतो.”, आई.

“पटले मला आई, पण कधी कधी आपण स्वतःची मदत नाही करू शकत तेव्हा काय? जशी लहान मुले, त्यांना नाही येत स्वतःसाठी लढायला. सिग्नल वर किती लहान मुले मी भीक मागताना बघते. जीव तुटतो हे बघून “, प्रीती.

“असे अनेक गंभीर प्रश्न आहेत जगात, जे एका दिवसात नाही सोडवता येणार. पण असे रडून नाही चालणार, मन खंबीर केले पाहिजे. जेव्हा शक्य होईल तेव्हा तू तुझ्या परीने मदत जरूर कर परंतु नाहीच जमले तुला कधी, तर असे निराश आणि दु:खी नको होऊ. अशाने त्या व्यक्तीचे दु:ख जास्त वाढते. त्यापेक्षा तिथून निघताना तू त्या व्यक्ती साठी प्रार्थना कर. प्रार्थनेत खूप शक्ती असते, त्याने त्या व्यक्तीला पॉसिटीव्ह व्हायब्रेशन्स मिळतात आणि कुठल्याना कुठल्या मार्गाने त्या व्यक्तीला मदत मिळू शकते. बघ करून, तुझ्या मनाला नक्कीच शांती मिळेल कि काही नाही करू शकलीस तरी, प्रार्थना तरी केलीस त्यांच्यासाठी .”

“बरोबर आहे आई. इथून पुढे मी नाही निराश आणि दु:खी होणार.” आईच्या सल्ल्याने प्रीतीला पॉसिटीव्ह एनर्जी मिळाली आणि पुन्हा एकदा नव्याने ती रोजच्या प्रवासाला निघाली….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *