–अजिता पणशीकर–
ओसरीवरून दिसणारा पाऊस काही वेगळाच असतो
त्याच्या मनातला सारा भाव त्यात सामावलेला दिसतो
आपण आपल्यातच एरवी इतके दंग रहातो
त्याच्या अंतर्मनाचा ठाव घ्यायला कुठे वेळ मिळतो?
त्याचा आक्रोश तो मुसळधार कोसळतांना जाणवतो
काळया ढगांसह, दशदिशा तो थरकावून जातो
त्याच्या यातना, त्याच्या वेदना ह्यांना वाट करून देतो
अन् ते समजणाऱ्याला अगदी हेलावून टाकतो.
संतत धारेत मात्र पाऊस खोल विचारात दिसतो
मूकपणे समर्पण करून धरतीत विलीन होतो
जलचक्राचं ओझं शांतपणे पेलत रहातो
मनुष्याच्या बेफिकिरीची, चुकांची किंमत मोजतो.
ऊन-पावसाचा अचानक जेव्हा खेळ सुरू होतो
त्याच्यातला खेळकर बालक नकळत डोकावतो
निसर्गाच्या चमत्काराचे अद्भुत दर्शन घडवतो
इंद्रधनुच्या कमानीने आपले मन भरून जातो.
कधी आपुलकीने विचारा हल्ली विचित्र का वागतो
वेळी-अवेळी येऊन पिकांना का नासतो
सांगेल मग तुम्हालाही त्याची सारी कथा तो
निवांत ओसरीवरूनच त्याच्याशी संवाद साधता येतो.
