–रसिका राजीव हिंगे–
वसंताची चाहूल ती
पालवीस ये बहर
कोकिळेचे कुहुकुहू
सुगंधित चराचर
आम्रवृक्ष भारावला
सुखावली ग धरती
मंत्रमुग्ध जाहले मी
ईश्वराची ही निर्मिती
ऋतुराज वसंताचे आगमन झाले की निसर्ग कोवळ्या पानांचे आणि गंधित फुलांचे तोरण लावून स्वागतास सज्ज होतो. पहाटेस शीतल वारा शीळ वाजवीत तर पानांची सळसळ जणू मृदुंगाच्या तालावर पदन्यास करीत आहे अन कोकिळ पंचम स्वर लावून ऋतुराजाचे स्वागत करण्यास उत्सुक झालेत असे वाटावे.
आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी आपली जीवनशैली बांधून घेतली होती. निसर्ग आणि मानव म्हणजे चित पट, एकाच नाण्याच्या दोन बाजू. निसर्गात प्रतिक्षण बदल होत असतात कारण सृष्टीचे सृजन ही प्रतिक्षण सुरू असते. हे होत असलेले निसर्गातील बदल अचूक हेरत त्याचे सौंदर्य रोमारोमात साठवत जगण्याची कला आपल्या पूर्वजांना अवगत होती. प्रत्येक बदल हा नवा आहे, काहीतरी देणारा आहे, सांकेतिक आहे याचा शोध अनुभवांती लागत गेला. त्या बदलाच्या शोधाचे नामकरण झाले ऋतू. असे हे अपूर्व संशोधन त्यांनी त्यांच्या योग शक्तीच्या द्वारे केले होते. तीच परंपरा पुढे चालत आली, ऋतुमागून ऋतू बदलत वर्तुळ पूर्ण होतं म्हणजेच ऋतुचक्र.यावरूनच त्यांची दिनचर्या ठरत असावी. या ऋतुचक्रामध्ये सहा ऋतू, वसंत,ग्रीष्म, वर्षा, शरद,हेमंत आणि शिशिर. वसंत ऋतू हा राजा. सम्राट. नवनिर्मितीचा उद्गाता.
सौंदर्याचे शिंपण करत येतो वसंत ऋतू. नवचैतन्याची लयलूट करत असतो निसर्ग. निसर्गाचे प्रत्येकच रूप मोहमयी असले तरी वसंत ऋतूत हा निसर्ग नवयौवना भासतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली षोडशा किंवा नुकतेच लग्न झालेली नववधू जशी मोहरलेली, फुललेली असते, तिचा प्रत्येक क्षण हा गंधित असतो तसाच हा वसंत, मोहरलेला,गंधाळलेला. कृष्णसख्यासारखा मनभावन. गीतेमध्ये विभूतीयोगामध्ये स्वतः कृष्ण च सांगतो “ऋतूनां(ङ्) कुसुमाकरः” मी ऋतूमध्ये वसंत आहे. असा दैवी अधिष्ठान लाभलेला वसंत, परमात्म्याचे रूप वसंत.
शिशिराच्या पानगळीनंतर साचलेल्या, वाळलेल्या पाचोळ्यावर चालत, पैंजणांचा नाद करत येतो वसंत. निष्पर्ण झालेल्या झाडांवर लाल, पोपटी, हिरवटसर पाने दिसायला लागतात. या ओल्या पानांचा कोवळा सुगंध साऱ्या चराचरात भरलेला असतो. हवेतील गारवा आल्हादक वाटतो. कधी शीतल लहर तर कधी उष्मा जाणवतो वातावरणात. संमिश्र वातावरण तरीही आल्हादक. नवे काही करण्याची उर्मी प्रदान करणारे, सृजनात्मक.
डेरेदार आम्रवृक्षावर लगडलेल्या मोहराचा गंध आसमंतात दरवळत असतो. सुगंधाने मोहीत होऊन पक्षांची वासंतिक सभा जणू या आम्र तरुवर भरते. वसंताचे आगमन झाले की कोकीळ कुहुकुहू गायला लागतो म्हणण्यापेक्षा कोकीळ गायला लागला म्हणजे वसंत आला असे पूर्वीचे ठोकताळे असायचे. कोकीळ स्वरासोबत भारद्वाज, दयाळ यासारखे पक्षी मधुर गायन करण्यात दंग असतात. सुंदरेसे घरटे बांधावे आणि आपल्या चिल्यापिल्याना सुरक्षित ठेवावे ही सगळ्याच प्राणिमात्रांची आस. मग पक्षी कसे सुटतील बरे यातून. काडी काडी गोळा करत फिरत असतात नर आणि मादी. कुठेतरी डेरेदार वृक्षावर, घराच्या बाल्कनीत, परसदारी बागेत यांची गडबड सुरू असते घरटे बांधण्याची. ही पण वसंताची चाहूल.
वसंताच्या सौंदर्यात भर घालणारे गुलमोहर, पळस, पांगारा, काटेसावर, बहावा हे वृक्ष. लाल फुले असलेला गुलमोहर गगनाला गवसणी घालत उभा असतो. सुरवातील लाल फुलांचे छोटे गुच्छ हिरव्या पानातून वर येत असताना ही रंगांची सरमिसळ विलोभनीय असते. पळस हा औषधी असलेला वृक्ष. पळसाची केशरी लाल फुले, पांगाऱ्याची पान नसतांना आलेली लालभडक फुले तसेच काटेसावरीची पर्णहिन वृक्षावरची लालचुटुक फुले, बहाव्याची पानोपानी फुललेली पिवळीधम्मक झुबकेदार फुले उन्हाच्या काहिलीत मनाला , दृष्टीला थंडावा देणारी आहेत. हा फुलांचा बहर म्हणजे जणू सृष्टीच्या प्रीतीला आलेला बहर आहे असे वाटते.
ग्रीष्मातील वृक्षराजी
लाल फुले बहरली
प्रीत तुझी लाभली
लाली गाली आली
ऋतूनुसार देत राहणे, समर्पण करणे हा निसर्गाचा स्वभाव आहे. आम्रवृक्षावर लागलेली हिरवीगार कैरी पाहूनच मन शांत झाल्यासारखे वाटतं. आत शीतलता झिरपायला लागते. घराच्या दारांना, खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून किंवा आजकाल कुलर, AC लावून घरात थंडगार कैरीचे पन्हे प्राशन करत दुपार पहुडलेली असते वसंतात.
सुगंध म्हणजे वसंत आणि वसंत म्हणजेच सुगंध हे समीकरणच आहे. वसंत ऋतूत सुगंधाचे आंदण देणारे फुल म्हणजे मोगरा. शुभ्र मोगऱ्याचे ताटवे बहरलेले असतात. काळसर हिरव्या पानाच्या आडून ही धवल फुले म्हणजे चांदवा आला उतरून धरेवर असे वाटते. पानापानात फुललेली मोगऱ्याची फुले आपला सुगंध लुटत सगळे चराचर गंधित करतो. हा गंध कुंतली माळला की मोगराही कृत्यकृत्य होत असावा. चाफ्याचे सोनचाफा, पिवळा चाफा, पांढरा चाफा, गुलाबी चाफा असे विविध रंग आणि प्रकार असले तरी वसंत ऋतूत आपल्या सौंदर्याचे आणि गंधाचे समर्पण करतो तो पांढरा चाफा. पांढऱ्या चाफ्याचा सडा जमिनीवर पडतो तेव्हा वाटतं नभीची नक्षत्र आहेत जणू सावळ्या भुईला सजविण्यासाठी आलेली. निशिगंध असेच पांढरे शुभ्र फुल. एकाच गुच्छात चारपाच फुल आपला सुगंध प्रदान करीत असतात. मोगरा, चाफा, निशिगंध ही सगळी पांढरी फुले. पांढऱ्या रंगात उष्णता शोषून घेण्याची शक्ती आहे. ही सगळी निसर्गाची किमया. वसंत ऋतूने सृष्टीला दिलेले हे आंदण आहे.
थबकला पहाट वारा
घेण्यास चाफ्याचा गंध
मोहरल्या वाऱ्यास करी
मोगऱ्याचा दरवळ धुंद
सृष्टीचा प्रियकर असलेल्या वसंतातील सांज तर अतिशय मोहक. हळूच पश्चिम क्षितीजाच्या गवाक्षातून डोकावलेली सांज केशरिया उधळत क्षितिजावर रेंगाळते. जाता जाता रविराज सांजेला कवेत घेतो, तिच्या आरक्त गालावरची लज्जा म्हणजेच जणू हा उधळलेला केशरिया आहे असे वाटावे, की त्या शशीकराची वाट पहाण्यासाठी ती उगाचच रेंगाळते आहे अन त्याच्या आठवात मोहरून अशी सलज्ज उभी आहे. दिवस मोठा होत असल्यामुळे रजनींनाथ यायला उशीर होतो आहे हे ठावे आहे तिला, म्हणूनच ती रेंगाळत असावी.
नाविन्याची सुरुवात, सृजनात्मक अश्या ह्या वसंत ऋतूत हिंदूंचे नवं संवत्सर सुरू होते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी याच ऋतूत अवतार धारण करून मीच हे सृष्टीरुप, विश्वरूप आहे, याचे संकेत दिले. मारुतीरायाने पण याच ऋतूत जन्म घेउन या वसंत ऋतूमध्ये किती शक्ती आहे याचे प्रात्यक्षिकच दिले आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात असाच आनंदी आणि चैतन्यदायी वसंत ऋतू यावा.
मुदित झाले वातावरण
ऋतुराजाच्या आगमनाने
धवल कुमुदिनी फुलल्या
भरला आसमंत सुगंधाने

Waw!gr8 अप्रतिम लिखाण केले आहे, रसिकाताई ऋतुराज वसंता चेआणि ओळी देखील सुंदर शब्दांत वर्णन केले आहे, माझ्या आवडत्या ऋतुराजचं,👌👍