खरतर ह्या लेखाचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा ‘ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग ‘ नक्की उमगेना ज्यावर चार पानी लेख लिहू शकेन . काळाचा पडदा बाजूला सारत आजवर घडलेल्या सर्व ठळक घटनांचा चलचित्रपट नजरेसमोरून कळत नकळत धावत होता. आप्तस्वकियांच्या आठवणी तर खूप आहेतच . काही सर्वसामान्य तर काही वैयक्तिक , खाजगी आयुष्याशी जोडलेल्या. काही अत्यंत हळवे , नाजूक क्षण तर काही नकोस वाटणारे अनुभव आणि त्यांच्या बोचऱ्या आठवणी . शेवटी हे आयुष्य आहे. मग त्यात सर्व काही आलेच !
पण एक आठवण मात्र कधी मधी येत राहते. ‘ तिची ‘ आठवण . का ते माहीत नाही !
‘ मीना ! ‘ ..…आमची शेजारीण . माझे स्वतःचे तिच्यासोबत खूप काही जिव्हाळ्याचे नाते होते असं नाही. माझं वय तसं लहानच होतं जेव्हा ते कुटुंब आमच्या बाजूला राहायला आले . मी अंदाजे नववीत असेन .आता कुठे जग पारखण्यासाठी लागणारा चष्मा हळूहळू डोळ्यांवर चढत होता आणि कुतूहल मांजरीच्या चोरपावलांनी मनी शिरत होते . भोवतालच्या जगाला समजून, जाणून घेण्याची खुमखुमी त्या उमलत्या वयात नसेल तर नवलच !
” आत्या , कशी दिसते ही पैठणी मला ? ” खळखळून हसत, पदराला हेलकावे देत मीना अशीच नेहमी आमच्या दारात उभी राहत असे.
माझ्या आईला ‘ आत्या ‘ म्हणायची ती . कोणतीही नवीन साडी नेसली किंवा नवा दागिना केला की पहिल्यांदा आमच्या घरी धाव घेत असे. माझ्या आईला दाखवण्यासाठी.
निमगोरा रंग , रेखीव चेहरा , सडसडीत बांधा गुडघ्यापर्यंत घोळणारी लांबसडक वेणी…..
चारचौघांमध्ये छान उठून दिसायची ‘ मीना ‘ !
पण तिच्या व्यक्तिमत्वाची खरी छाप पडायची ती तिच्या हसऱ्या , मनमोकळ्या स्वभावामुळे . बेधडक बोलणे अन् त्यात भरीस भर म्हणून नटण्या मुरडण्याची भारी हौस !
तशी संसारात कमी म्हणून कशाची नव्हती . पैसाअडका भरपूर त्यामुळे सणसमारंभ असला की मीना जरतारी साडी नेसून , दागदागिने लेऊन , मेकप करून नेहमीच नटायला, मुरडायला एका पायावर तयार .
सासू सासरे गावी असत. त्यामुळे मीना , तिचा पती , एक सात वर्षाची आणि एक तीन वर्षाची अश्या दोन गोड मुली. एवढंच चौकोनी छोटंसं कुटुंब मुंबईत स्थायिक . कोणाची रोकटोक नाही त्यामुळे वागणं , बोलणं , एकंदरीत राहणीमान अगदी बिनधास्त ! त्यात मुंबईचे पाणी चढल्याने वेगवेगळ्या फॅशन करायची हौस सुद्धा भारी. नवरा बायको दोघेही मुळातच बोलके असल्यामुळे पाहुण्यांची सुद्धा त्यांच्या घरी सतत रेलचेल असे. माहेरचे असोत वां सासरचे. घर सदैव माणसांनी भरलेलं . कधी मित्रपरिवार तर कधी नातेवाईक . कधी व्हेज तर कधी नॉनव्हेज . सण सोहळे आणि त्यासोबत पार्ट्या चालूच !
पण एक गोष्ट मात्र खरी की फक्त श्रीमंतीचा थाट म्हणून नव्हे तर सर्व पाहुण्यांचे स्वागत मीना प्रेमाने, अगत्याने करीत असे . तिच्या हाताला दानत व मनात आवड दोन्ही होती की !
काही खास मिष्टान्न बनवले तर आमच्या घरीसुद्धा ते अगदी न चुकता आलेच म्हणून समजा . घरी वडीलधारी कोणी नसल्यामुळे आईला ती खूप मानायची. त्यामुळे तिच्या ‘ अहो आत्या ss ‘ चा गजर अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सतत कानी पडत असे. आम्हालाही सवय झाली होती त्याची.
असं कुटुंब पाहिलं की पहिला विचार मनात येतो तो म्हणजे ‘ दृष्ट न लागो अश्या सुखी संसाराला ! ‘ ……पण म्हणतात ना नियती कधी तिचा खेळ खेळेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही..
साधारण तीन एक वर्षांनी काहीतरी बिनसले असल्याची चाहूल लागली. आजकाल मीना तिच्या सततच्या छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारींमुळे थोडी व्यस्त राहू लागली होती. चेहऱ्यावरचे हसू अजून कायम होते. पण डॉक्टरांकडे चकरा वाढू लागल्या .
” आत्या, पाहा ना पोट दुखतयं ….मळमळते आहे कालपासून ” …..
” आत्या, डोके जाम चढले आहे. काही केल्या उतरत नाही. काय करू समजत नाही. ”
” आत्या, काल रात्री आम्हा दोघांना दोन पर्यंत ताप चढला की हो ! ….डॉक्टर म्हणतात व्हायरल फिवर आहे. …. छोटीचे अंगसुद्धा तापलं आहे आज ! ”
अशी वाक्ये वारंवार कानावर पडू लागली .
त्यानंतर साधारण एका वर्षामध्ये मीना , तिचा नवरा आणि धाकटी मुलगी सारखे आजारी पडू लागले. डॉक्टर, टेस्ट रिपोर्ट्स , हॉस्पीटल ह्यांच्या चक्रव्यूहात जणू अडकले होते ते पार. कधी अपचन , पोटदुखी ….कधी हिवताप तर कावीळ…..एका पाठोपाठ एक आजार.
आम्ही सुद्धा थोडे गोंधळून गेलो होतो. तो नव्वदीच्या दशकाचा काळ होता , त्यामुळे अर्थातच ठोस माहिती अशी कोणालाच नव्हती. अगदी शिक्षित लोकांना देखील.
मीना तर पार खंगत चालली होती . तिच्या चेहऱ्यावरची रया पार उडाली . डोळे खोल गेले, केस विरळ होऊ लागले, हातापायाच्या काड्या आणि शरीराचा पिंजरा होऊ लागला . ऐन तारुण्यात अचानक एखाद्याला वार्ध्यक्य यावे तशी दिसू लागली. आमच्या घरचं तिचं येणं जाण कमी होत गेलं. खोकल्याची उबळ तिची प्रत्येक रात्र जागवत असे.…..तिचे ते जिवंत हसू पार गायब झाले होते. मीनाला ‘ टीबी ‘ ने ग्रासले होते. ….
पण त्याहीपेक्षा भयानक सत्य तिला दिवसागणिक पोखरत होते. ते म्हणजे तिला , तिच्या नवऱ्याला आणि धाकट्या मुलीला ‘ एडस् ‘ झाला होता.
इतके दिवस ऐटीत, ठसक्यात बिनधास्त वावरणारी मीना आता मात्र एखाद्या अपराध्यासारखी मान खाली घालून वावरत होती. कधी खिडकीतून नजर टाकावी तर भकास चेहऱ्यानं भिंतीवर शून्यात एकटक नजर रोखून पाहत बसलेली दिसे . नवऱ्याची तब्येत अजून तरी ठीक दिसत होती. पण मीनाला मात्र आजाराने चांगलेच पोखरले होते .
आजूबाजूच्या लोकांना कोणाकडून तरी तिच्या आजाराची खबर लागली आणि सर्वांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी संबंध कमी केले. एकंदरीत न बोलता वाळीत टाकण्याचा तो एक प्रकार होता असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. त्या मानसिक दबावाखाली तिचे आमच्या घरी देखील येणे स्वतःहून कमी केले .
त्या काळात ह्या आजाराविषयी समाजात बरेच गैरसमज होते . ह्या आजाराला स्विकारण्याची मानसिकता मुळीच नव्हती . ‘ एडस् ‘ च्या आजारावर जगभर संशोधन चालू होते. परंतु म्हणावे तशी त्याविषयी जागरूकता आणि माहिती समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचली नव्हती . त्यामुळे असे अनेक परिवार उध्वस्त होत होते . वाळीत टाकले जात होते . आजाराचे दुःख- वेदना, मृत्यूची सतत टांगती तलवार आणि सर्वात वेदनादायक म्हणजे लोकांकडून आपसूकच होणारी मानसिक कुचंबणा . नियतीने केलेली अशी क्रूर तिहेरी अवहेलना . तिला सामोरे जाणे त्या काळात रोग्यांना किती कठीण जात असेल !
माणसाचा शेवटचा प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याला ज्या आप्तस्वकीय किंवा मित्रपरिवाराच्या आधाराची सर्वात जास्त गरज असते तो ही ह्या रुग्णांच्या नशिबी येऊ नये ह्यापेक्षा क्लेशदायक ते काय ?
त्या संपूर्ण कुटुंबाचा होणारा विध्वंस आम्ही देखील मुक साक्षीदार बनून पहिला.
जीवाला सर्वात जास्त चटका लावून गेला तो म्हणजे तिचा शेवटचा अंतिम संस्कार . तो करण्याची व्यवस्था परस्पर हॉस्पीटलमधून मोजून दोन ते तीन माणसांनी केली असे कळले . मोठ्या मुलीला काही जवळचे नातेवाईक त्यांच्यासोबत आधीच घेऊन गेले होते .
कदाचित म्हणूनच तिची ‘ ही ‘ आठवण अधून मधून येते . कोणाचा तरी शेवटचा प्रवास असाही असू शकतो ह्याची जाणीव कायम ठेवण्यासाठी !
…..निवेदिता शिरवटकर
