सौ. विद्या चिडले, बंगलोर.
पुदिना (Mint)…..
अ,ब,क आणि ई ही जीवनसत्वे तसेच कॅल्शिअम, फाॅस्फोरस, लॅक्टिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड, झिंक इत्यादी जीवनावश्यक द्रव्य उपलब्ध असणारी सर्वांच्या परिचयातील आणखी एक औषधी वनस्पती म्हणजे पुदिना. खरं तर हे नाव ऐकलं की मला फक्त आणि फक्त चटपटा चाट व पाणीपुरी आठवते व तोंडातील लाळेच्या ग्रंथी उद्दीपित होतात. रोज खूप वैविध्यपूर्ण वापर होत असलेली पुदिना ही वनस्पती दक्षिण भारतात सहज उपलब्ध होते. आयुर्वेदात हिला प्रभावी वनस्पती मानलय. अजगंध हे संस्कृत नाव. ही वनस्पती वायुनाशक आहे.
ह्या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत.
१]हिच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.
२]वजन कमी होण्यास मदत होते.
३]प्रतिकारशक्ती वाढते.
४]हायपरटेंशनवर गुणकारी आहे.
कोलेस्टरॉल, हृदय विकार, डायबेटिस, यावर गुणकारी आहे.
५]ही वनस्पती शरीरातील वात, पित्त व कफ ह्या त्रिदोषांचे शमन करते.
६]स्मरणशक्ती, आकलनशक्ती वाढवण्यास मदत करते.
७]मानसिक व शारीरिक सतर्कता वाढवते.
८]ह्या वनस्पतीच्या सेवनाने सक्रियता वाढते.
९]पाण्यात उकळून नंतर ते पाणी थंड करून गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
१०]पुदिन्याची चारपाच पाने धुवून चावून चावून खाल्ल्यास दातदुखीवर,पायोरियावर, हिरड्यांच्या रक्तस्त्रावावर फायदा होतो. तोंडातील बॅक्टेरिया घालवतो.
११]पुदिन्याची पाने चहात टाकून उकळावी. ह्या चहाने गॅसेसचा प्राॅब्लेम दूर होतो.
१२]थकवा जावून तरतरी येते.
१३]पुदिन्याच्या पानांच्या रसात चिमूटभर सेंधेव मीठ घेतल्यास पोटाच्या विकारांवर फायदा होतो.
१४]पोट खराब झालय असं वाटलं तर पुदिन्याची पानं घालून चहा प्यावा.
१५]उलटी हगवण सर्दी-पडसे यावर उपयोगी आहे.
१६]अँटी-बॅक्टेरिल,अँटी इन्फ्लेमेटरी गुणामुळे श्वसनतंत्र सुधारते.
१७]पुदिन्याच्या पानाचा एक कप काढा दिवसभर थोडा थोडा सेवन केल्यास घश्याची सूज कमी होते.
१८]संक्रमणापासून संरक्षण मिळते
१९]त्वचेशी निगडित समस्या दूर होते.
पुदिन्याची पाने सनबर्न, त्वचेचा दाह त्वचेचे टॅनिंग ह्यावरही उपयोगी ठरतात.
२०]ही वनौषधी वेदनाशामक आहे.
२१]पानाची पेस्ट पाण्यात टाकून वाफारा घेतात असही वाचलय.
२२]आजकाल पुदिन्याचा उपयोग करून बरीच औषधं तयार करण्यात येत आहेत. जसे दंतमंजन, माऊथ फ्रेशनर, चुईंगगम, कँडी,इनहेलर, वेदनाशामक बाम ह्यात पुदिना वापरतात. त्यामुळे ह्या वनस्पतीला बाजारपेठ उपलब्ध आहे.
पुदिना कुठल्याही प्रकारे म्हणजे नुसतीच पाने चावून चावून खाणे, पाण्यात उकळून काढा घेणे, चटणी करून खाणे, किंवा बाह्योपचारासाठी तेल, ह्या कुठल्याही रुपात पुदिन्याचा वापर होतो.
आजकाल सलाड,चटणी,डेझर्टस्, सुदीज मध्ये पुदिन्याच्या पानांचा उपयोग करतात. फोडणीच्या ताकात पुदिन्याची पाने टाकल्यास छान सुगंध व चव येते तसेच डोळ्याचे पारणे फिटते. ते म्हणतात ना की कुठलाही पदार्थ आधी डोळ्यांनी नंतर ॲरोमा घेऊन व शेवटी चव घेऊन खावा. अगदी तसेच सौंदर्य, सुगंध व चव ह्या तिनही रुपांत पुदिना कामी येतो.
ही अशी बहुगुणी वनस्पती आपल्या छोट्याश्या बागेत नक्कीच लावता येते.
पुदिन्याचं बी ऑनलाईन मागवून ते पेरता येईल किंवा बाजारातून आणलेल्या पुदिन्याची, पाने काढून त्या काड्या पण लावता येतात. पुदिना लावायला साधारणतः उथळ व पसरट कुंडी घ्यावी. कम्पोस्ट खत वाळूयुक्त मातीत मिसळून कुंडी भरावी. कम्पोस्टमुळे मातीत आर्द्रता राहते. उन्हात कुंडी राहील याची दक्षता घ्यावी. भारतीय वातावरणात पुदिना उत्तम वाढतो. बिया किंवा बारिक तंतूमय मुळं फुटलेली रोपं किंवा पुदिन्याच्या काड्या पाने फुटतात त्याच्या खालून कापून ह्या पसरट कुंडीत तीन-चार इंच खोल पेराव्या. काड्यांना मुळं फुटलेली असतील तर पुदिना लवकर रुजतो. बियांपासून रोप व्हायला थोडा वेळ लागतो. पुदिन्याच्या काड्या खोचताना त्याची पाने काढून टाकवीत. खत नसेल तरी हरकत नाही. स्वयंपाक घरातील वेस्टची पेस्ट करुन ती पाण्यात मिसळून पंधरा दिवसांतून एकदा घालावी. ह्याला पाणी जास्त लागत नाही. थोडे थोडे रोज टाकावे. पाण्याचा निचरा होईल ह्याची दखल घ्यावी. बाराही महिने ही वनस्पती येते.
आरोग्यदायी लाभासाठी पुदिन्याची ताजी पानेच उपयोगात आणतात. पण ही पाने सुकवून ही खातात. परंतु ह्या वनस्पतीचेही अती सेवन योग्य नाही. लिव्हर, किडनीचे आजार असतील तर पुदिना खाऊ नये.
