–अनुराधा भागवत–
संपादक, ‘ स न वि वि,
सप्रेम नमस्कार,
आपला जानेवारीचा अंक वाचून संपवला. अंक आवडला. पहिल्या काही पानांवर आपल्या मंडळाच्या उपक्रमांची माहिती वाचून खूपच कौतुक वाटले. मंडळाचे काम खरंच जोरात व विविध प्रकारचे चालू आहे. सर्वच कार्यकारिणी त्यासाठी अभिनंदनास व कौतुकास पात्र आहे आणि या व्यस्ततेत भर म्हणून तुम्ही ही अंकाची जबाबदारी उचलली आहे, खरंच तुमची धन्य आहे.
अंकातील सर्वच लेख व कथा वाचनीय आहेत. दर्जा अपेक्षेप्रमाणेच आहे. विषयांत विविधता आहे पण कधीतरी आपल्या मनात येऊन गेलेले, किंचित् काळ मनात घोटाळत राहिलेले असेच आहेत. वाचताना मनात आलं आपल्या सारख्याच विचारांच्या, आपल्या सारख्याच लोकांमध्ये आपण आता सामिल झालो आहोत. आजपर्यंत अपरिचित असलेली, अजून चेहरेही माहीत नसलेली, दूर दूर कुठेतरी वसलेली, पसरलेली ही सर्व आपलीच प्रतिबिंबे,आपलीच रूपे आहेत.
पहिलाच लेख,’ खिडकी ‘ .मी लेखनाला सुरुवात केली तेव्हा माझा छापून आलेला पहिलाच लेख होता ‘ खिडकी ‘ जवळजवळ असाच. माझा लेख ‘ नूतन वर्षाभिनंदन।’ सुरूवातीला आहे व शेवटी शेवटी ‘ हैप्पी न्यू ईयर ‘. एकाच विषयावर दोन्ही लेख आहेत पण लिखाणात रिपीटिशन नाही हे विशेष. त्यांनी नवीन वर्षाचं साजरीकरण व इतर गोष्टींवर भर न देता संकल्प करण्यावर जास्त लिहिले आहे आणि मी शेवटी शेवटी संकल्पाचा उल्लेख केला आहे.
प्रत्येक लेखाबद्दल अभिप्राय व मत देणे अवघडच आहे. सर्वच लेख व कथा वाचनीय आहेत. एकनाथांच्या पादुकांची पदयात्रा हा लेख मला खूप आवडला. क्रमशः लिहिण्याची कल्पना ही छान. कथांपेक्षा लेख जास्त चांगले उतरले आहेत.’ तडजोड ‘ कथा नीटशी जमली नाही असं वाटतं, पण शब्दमर्यादा हेही त्याचे एक कारण असू शकतं. असो.
सर्वांना पुढील अंकासाठी शुभेच्छा!