—रसिका राजीव हिंगे—
संवादन हे घडवित असते नात्याचे ते अतूट बंधन
सहवासाने कळते सारे सरते माझे माझे मी पण
“तीळगुळ घ्या गोड गोड बोला” असं म्हणत शेजारची धीटूकली माझ्याजवळ आली आणि तिच्या गोंडस, गोऱ्या, लहानग्या हातानी माझ्या हातावर तीळ गुळ दिला. देतांना तिच्या मनात काहीतरी चालले आहे, डोळे काहीतरी बोलतात आहे असे वाटले मला उगाच. ” काय ग तू खाल्ला का तीळगुळ? थांब मी देते तुला”
“काय ग मावशी, फक्त तीळगुळ दिला की आजच्या दिवशीच फक्त गोड बोलायचं असतं की नुसतच म्हणायचे असते असं?”
तसं काही नसतं ग! हे आपलं काहीतरी निमित्त असतं. तीळगुळ गोड असतो म्हणून” मी तिच्या प्रश्नांनी भांबावले होते.
” सगळे खोटं बोलतात, कुणीच खरं सांगत नाही. कोणाला बोलायला वेळ पण नाही. असे काहीतरी अस्पष्ट मनाशी बडबडत ती निघून गेली. ती निघून गेली पण मी मात्र विचारांच्या आवर्तनात गुंतत गेले.
संक्रांत! सूर्याचे मकर राशीत संक्रमण म्हणजे उत्तरायण प्रारंभ होतो तो दिवस किंवा उत्तरायणास गती देणारा म्हणून शुभ दिवस. पर्व काळ शुभंकर. तीळगुळा सम एकमेकांना धरून,गोडी कायम ठेवून जीवन जगण्याचा संदेश देणारा हा सण. असे आपले सगळेच सण आहेत, संस्कार आणि संस्कृती जपणारे, शिकविणारे तरीही आपण काय शिकतो आहोत. कुठे चाललो आहोत. त्या छोट्याशा मुलीला कळले कुणीच बोलत नाही कुणाशी, सगळेच आपल्यात मशगुल आहेत. का असे व्हावे, कुठे हरवते आहे आपली संस्कृती, कुटुंब व्यवस्था हाच आपल्या संस्कृतीचा पाया आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संवाद हा शब्दच शब्दकोशातून हरवला आहे का? ह्या प्रश्नांची रास माझ्यापुढे ठेवून ती गेली. जीवनाचे, जगण्याचे सार्थक व्हावे, म्हणूनच मानव जन्म लाभला आहे.
चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून आल्या नंतर मानवाचा जन्म मिळतो. जो सर्वश्रेष्ठ मानला जातो. अर्थात सगळेच प्राणीजीवन आपापल्या जन्मात श्रेष्ठच. पण कर्म करण्यासाठी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी म्हणजे मोक्षप्राप्ती साठीच मानवी जन्म आहे असे मानले जाते.
गर्भात सोहम सोहम म्हणणारा जीव या जगात आल्याबरोबर कोहम कोहम म्हणायला लागतो. इतका लगेच या नवीन जीवाला अहं चा वारा लागतो की पुढे तर योग्य काय अयोग्य काय ह्याचा विचार करणे सुद्धा दुरापास्त होते. स्वतःचा शोध थांबतो आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे असे आपण मानायला लागतो. मी आणि मी फक्त यामध्ये “तू” किंवा “तुम्ही” नाहीच, मग “आपण सगळे” तर दूरच राहिलो नाही का? त्यामुळे काय होतंय, संवाद होतच नाहीत. घरातल्या घरात बोलायला वेळ नाही. इतका मानव पळत सुटला आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे जीवघेणी स्पर्धा. स्पर्धा हवीच, त्याशिवाय खेळ कसा रंगणार? पण स्पर्धा ही निकोप हवी, हरण्यात सुद्धा विजयाची धुंदी यावी. पण कुणी पुढे जायला लागला की लगेच त्याचे पाय खेचायचे, षड्रिपू नी नुसते थैमान घातले आहे. पुढे कसे जाता येईल, मी कसा सर्वश्रेष्ठ हे सिध्द करण्यासाठी नुसती पळापळ, दमायला तर होणारच ना! दमला भागला जीव उशिरा घरी आल्यावर मुलांना, घरातील इतरांना वेळ देऊ शकत नाही.
साद घालता मिळतो
प्रतिसाद जेथे जेथे
सुख संवादन घडते
मनामनातील तेथे
प्रत्येक क्षेत्रात काळानुरूप बदल होत गेलेत. स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर कष्ट, मेहनत करावी लागेलच, तरी कुठेतरी मर्यादा यावी, स्वतः मर्यादा घालता यावी. काळाची गरज म्हणून दोघेही नोकरी करतात, मुलांना उच्च शिक्षण देता यावे, सगळ्या हौशी पूर्ण करता याव्यात, थोडक्यात काय तर सुखाने जगता यावे यासाठी ही धडपड. पण सुखाच्या मृगजळामागे धावतांना आपलं काय अमूल्य हरवत चाललंय हे कळत नाही. सुखाच्या भोवऱ्यात अडकतांना आपण आपली मुलं ज्यांना आपली गरज जास्त आहे ती विसरत आहोत. सगळं मुलांसाठीच आहे असे जरी असले तरी हे सगळं सुख उपभोगायला मुलांना तयार करणे,घडविणे हे आईबाबांचे कर्तव्य आहे. असं फुकट आई बाबा नाही होता येत कधी.
वीस बावीस वर्षाची मुलं आत्महत्या करतात. का? तर नैराश्य आले म्हणून. कुठून येतं हे नैराश्य. जगण्याला आता तर कुठे सुरवात होते आहे, सगळीकडून दडपण आलं असतं मुलांवर, मार्क्स मिळविण्याची सक्ती, इतके टक्के मिळायलाच हवे, सगळया कला क्षेत्रात पारंगत हवाच कारण किती स्पर्धा वाढली आहे. क्लास मध्ये ही आजपर्यंत माझ्या क्लासचा निकाल 100 टक्के आहे. प्रत्येकाने पास होणे गरजेचे आहे. अशा कितीतरी पद्धतीने मुलांवर आघात केले जातात. कोणी का विचार करत नाही त्याला जे व्हायचे असेल ते होऊ दे. कधीतरी आपल्या मुलांच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करून तर पहावा. आपलंच सगळं बरोबर हे कसं शक्य आहे. या दडपणाखाली मुलं येतात आणि आत्महत्या करतात.
घरात जेव्हा प्रेम, आपुलकी मिळत नाही त्यावेळी ही मुलं बाहेर ते मिळविण्याचा प्रयत्न करतात. एखादी अशीच फसव्या प्रेमाला भुलून नको त्या मार्गाने जात राहते. काही मुले व्यसनाधीन होतात. मग हेच पालक इतरांवर याची जबाबदारी टाकून मोकळे होतात. देशातल्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढून आपण किती जबाबदार नागरिक आहोत याचे दाखले देण्यात काय अर्थ. आधी आपण स्वतः ला बदलले पाहिजे. आपल्या बाळाला जर हवे ते देऊ शकत नाही तर इतरांकडून अपेक्षा का करावी? कारण अपेक्षा केली की अपेक्षाभंगाचे दुःख सहन करणे आलेच.
मानव अनुकरणप्रिय आहे. घरातूनच नकळतपणे मुलांवर संस्कार होत असतात. “ये बैस, मी तुझ्यावर संस्कार करते” असे म्हणून संस्कार होत नसतात. आपल्या देहबोलीतून, वागण्यातून मुलं संस्कारित होत जातात. संध्याकाळचे जेवण सगळ्यांनी एकत्रच केले पाहिजे असा माझ्या आईचा दंडक होता. जेवतांना हसत खेळत दिवसभरातील सगळा लेखाजोखा मांडला जातो. विचारपूस होते. मुलांच्या आनंदात सहभागी होता येतं. एकप्रकारे हा त्यांच्याशी साधलेला संवाद असतो. त्यातून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होते.
पूर्वी घरात संध्याकाळी सांजवात लागायची. आजी आजोबा सगळ्यांना घेऊन परवचा म्हणून घ्यायचे, कधी गोष्ट सांगायचे. गोष्ट का सांगायची? तर त्यातून स्थिर बसण्याची, एकाग्रतेची सवय लागते. श्रवण भक्ती ही अशी बालपणापासून शिकवली जाते,जोपासली जाते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांचा सहवास लाभतो.
आणि घडत जातो संवाद, जो नात्यांना करतो सुदृढ, सशक्त. आपल्या आजूबाजूला सुद्धा संवाद होणे गरजेचे आहे. उगाच वेळच नाही च्या सबबीखाली, आपले राहणीमान राखण्याच्या कारणास्तव शेजारी बोलायचेच नाही असे वागण्याचे काहीच प्रयोजन नाही. याउलट विचारांची देवाणघेवाण झाली तर नवं, चांगलं काहीतरी गवसेल, ज्यामुळे स्वतः तर मोठे होणारच, त्याचबरोबर देश ही मोठा होईल. स्वतःसाठी तरी कमीतकमी संवादन होऊ द्या. नात्याचे बंध अधिक पक्के होतील.
माणुसकीचा कर धरूनिया विश्वासावर जगते दुनिया
संवादाचे आंदण द्यावे बाल्य बहरते मोहरुनीया
