सनविवि ललित,साहित्योन्मेष तेथे कर माझे जुळती

तेथे कर माझे जुळती

–वैशाली प्रसन्न सुळे–

बघता बघता नवीन वर्ष आले आणि चक्क त्याचे एक पान उलटून पण गेले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन, घेऊन होत नाही तोच संक्रांतीच्या तिळगुळाची देवघेव झाली आणि ती संपत नाही तोच 26 जानेवारी, राष्ट्रीय सण आला., आणि जानेवारी संपला सुद्धा !आता फेब्रुवारी म्हंटला की चटकन आठवते ती 14 तारीख.व्हेलेंटाईन डे अगदी सगळ्यांना माहिती आहे.मात्र याच फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती असायलाच हवी अशी एक अजून तारीख आहे .ती म्हणजे 26 फेब्रुवारी. स्वातंत्र्यलढ्याच्या अग्निकुंडात स्वतःसह संपूर्ण कुटुंबाची आहुती देणारे विश्वरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा आत्मार्पण दिन. ज्या वयात मुलांना व्हॅलेंटाईन डेची स्वप्न पडू लागतात त्याच वयात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची शपथ घेणारे स्वातंत्र्यवीर. खरंतर हे वयच वेडं. कुठल्या ना कुठल्या ध्येयाने प्रेरित होऊन भारलं जाऊन शपथा घेणे या वयात अगदीच सामान्य. पण भारतमातेला स्वतंत्र करण्याची शपथ घेऊन ती निभावणं नव्हे, तिच्या पूर्तीसाठी अख्ख्या जीवनाचे समर्पण फक्त आणि फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरच करू शकतात. वैयक्तिक, कौटुंबिक हितांना कायमची तिलांजली देऊन त्यांनी  राष्ट्र हेच सर्व परी मानले. प्रखर राष्ट्राभिमानी, ओजस्वी वक्तृत्व तेजस्वी बुद्धिमत्ता आणि प्रभावी नेतृत्व या सगळ्यांचा सुंदर संगम सावरकरांचे ठाई झाला होता. वडिलांनी केलेल्या वाचनाच्या संस्कारामुळे अगदी उपनिषदांपासून सगळे वाचलेले. तेच आत कुठेतरी रुजून सावरकरांची साहित्य प्रतिभा प्रस्फूटीत झाली. खरं तर सावरकरांच्या अंतःकरणातील राष्ट्रप्रेमाचा ज्वालामुखी इतका धगधगता होता की त्या पुढे त्यांचे इतर गुण करपून गेले. त्यातच त्यांची साहित्यिक प्रतिभा ही थोडी झाकोळली गेली. मात्र त्यांचे बरेचसे साहित्य हे राष्ट्रप्रेमासाठीच नीर्माण झाले. उदाहरणार्थ ,ने मजसी ने ,जयोस्तुते सारख्या अजरामर रचना. प्रचंड बुद्धिमत्ता. त्यामुळे बॅरिस्टरच्या अभ्यासक्रमाची निवड केलेली. तो पूर्णही केलेला. मात्र या शिक्षणा दरम्यानच सावरकरांच्या क्रांतिकारक हालचाली सुरू होत्या. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करूनही इंग्रजांनी पदवी नाकारलेली .एकीकडे प्रचंड विद्वत्ता ,वक्तृत्व यामुळे सावरकरांना अतिशय मानसन्मान, गौरव मिळाला तर अंदमान सेल्युलर जेलमध्ये पराकोटीच्या मानहानीलाही तोंड द्यावे लागले. दोन जन्मठेपांची शिक्षा झालेले. दोन परस्पर विरोधी आयुष्य जगलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी मार्सलेला मारलेली उडी त्रिखंडात गाजली .पूर्व योजनेनुसार न घडल्याने ही उडी फसली तरी या घटनेतून दुर्दम्य साहसाचे उदाहरण त्यांनी जगासमोर मांडलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव या घटनेतून विशेष अधोरेखित होतो. मार्सलेच्या उडी नंतर झालेली काळ्यापाण्याची सजा, कुटुंबीयांची झालेली ताटातूट, कोवळ्या प्रभाकरचा मृत्यू या लागोपाठ घडलेल्या  खेदजनक घटनांनी सावरकरांनी धिरोदात्तपणे तोंड दिले .पन्नास वर्षांच्या काळ्यापाण्याच्या सजेचेही व्यवस्थित नियोजन करून त्यांनी अद्वितीय असे कार्य अंदमानच्या काळकोठडीतही केले. सगळ्या राजबंद्यांना राजबंदी म्हणूनच स्विकारावे व तशी वागणूक मिळावी ही वारंवार इंग्रजांकडे लावून धरलेली मागणी, कित्येक बंद्यांना आत्महत्ये पासून परावृत्त करणे ,त्यांचे समुपदेशन, अशिक्षित बंद् यांसाठी चोरून साक्षरता वर्ग ,त्याद्वारे त्यांना जागतिक ,राष्ट्रीय ,भूगोल, राजकारण ,अर्थकारण यांचे ज्ञान त्यांनी दिले. विविध भाषा शिकवून उत्तम अशा बहुभाषिक वाचनालयाची निर्मिती केली. हिंदी हिच स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा व्हावी यासाठी सावरकरांनी जोरकस प्रयत्न केले. तिथल्या पठाणांनी चालवलेली सक्तीची  धर्मांतरणाची चळवळ हाणून पाडून कित्येकांचे शुद्धीकरण केले. पंजाबी, शिख ,सिंधी अशा कितीतरी बंद्यांना हिंदू एकसंध असण्याचे महत्त्व पटवून हिंदू या एका छत्राखाली सगळ्यांना आणले .नागरी जीवनातली कुठलीही सुख सुविधा उपलब्ध नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय तुटपुंज्या साधनातून आणि इंग्रजांच्या कडक पहाऱ्यातून हे कार्य केले. बंदयांमध्ये संभाषणासाठी, संदेश वहन होण्यासाठी कोठडीच्या दारावर वबेड्या आपटून केलेली सांकेतिक भाषेची निर्मिती, टोकदार काट्याने कोठडीच्या भिंतींवर लिहून केलेली साहित्यनिर्मिती ,गवत कापताना किंवा अंघोळीच्या हौदा जवळ घेतलेले साक्षरता वर्ग हे त्यांच्या कठीण परिस्थितीतिल कार्याचे काही नमुने .उत्कृष्ट वक्ता हजरजबाबी ,उत्तम संभाषणकौशल्याचे धनी, साहित्यिक ,इतिहासकार, कवी ,लेखक ,नाटककार, द्रष्टा ,समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, भाषापटू, साहसी , तर्कवादी—- सावरकरांच्या अंगी असणाऱ्या अशा या गुणांची यादी ही न संपणारी आहे. थोडक्यात स्वतंत्र भारताच्या प्रगतीच्या वाटेवर पहिले पाऊल सावरकर यांच्या रूपाने अंदमानातच पडले होते. अंदमानची ही बेटे म्हणजे स्वतंत्र भारताच्या सागरी सीमा रक्षणारी दुर्गे व्हावीत हे त्यांचे भाकीत खरे ठरले आहे. अंदमानचला प्रदीर्घ अकरा वर्षांची सजा भोगल्यानंतर रत्नागिरीच्या स्थानबद्धते मध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खूप मोठे असे भरीव कार्य केले. अस्पृश्यता निवारण, दलितोध्दार, स्वदेशीची चळवळ, साक्षरताप्रसार, सैन्य प्रशिक्षणाचे महत्त्व, महिला सबलीकरण, साक्षरता असे भरीव कार्य  त्यांनी रत्नागिरीमध्ये असताना केले .स्वतंत्र भारताचेऔद्योगिक, संरक्षणविषयक ,शिक्षण विषयक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक धोरण कसे असावे याबद्दल सावरकरांचे धोरण हे अतिशय स्पष्ट आणि निश्‍चित होते. या धोरणाआधारे भारताला महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. अशा या बहुआयामी अलौकिक व्यक्तिमत्वाने आपल्या कर्तुत्वाचा अमीट ठसा उमटवून २६फेब्रुवारीला आत्मार्पण केले. त्यांच्या बाबतीत एवढेच म्हणता येईल ‘असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर ,नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर’. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या आव्हानाचे अत्तर कायम छातीवर फासून आयुष्याला निर्भयपणे सामोऱ्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निर्वाणानंतर सगळ्यांच्याच मनात याचओळी नक्कीच रूंजी घालत असतील.’ करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना, गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर—–‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *