— पुरुदत्त रत्नाकर —
अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या दामिनीच्या कंपनीमधे नैतिक सदाचरण हे स्वतंत्र खातं होतं. त्याअंतर्गत प्रशिक्षणार्थी फळीतल्या फक्त मुलींसाठी महिला सबळीकरण हा एका आठवड्याचा खास प्रशिक्षण वर्ग होता. प्रशिक्षणादरम्यान ‘एक पूर्ण वाक्य- “नाही.” ‘ संबंधीची माहिती तिला फारच आवडली. किती सुटसुटीत शस्त्र आहे. फक्त ‘नाही’ म्हणायचं की झालं, सगळी यंत्रणा पाठीशी. तिने अत्यानंदाने घरी येऊन आईला सांगितलं, तर आई ढिम्म.
“वेडाबाई, मुलीचं ‘नाही म्हणजे नाही आहे’ हा धडा मुलींनाच दिला, म्हणजे पैसे वाया घालवले म्हणायचे. ढोंगी आहेत सगळे. ज्यांना ते ‘नाही’ पचवायाचंय त्यांनाही हे पढवणं आवश्यक नाही का?”… आईचं हे असंच होतं.
काही आठवड्यांनी प्रशिक्षणकालावधी संपणार होता. त्यानिमित्त उच्चपदस्थांनी सगळ्या प्रशिक्षणार्थी टोळीला मेजवानी ठेवली. दामिनी आईला त्याची चित्रफीत दाखवत होती. कार्यक्रमाच्या शेवटी डॅशिंग दामिनीने व्यवस्थापनाला पूर्वसूचना न देता बसवलेलं मुलींचं नृत्य-नाट्य सादर केलं आणि सगळ्यांना चकित करून सोडलं.
“आई, सांग ना, तुला काय काय आवडलं यात?”
“तुझा कार्यक्रम तर उत्तमच झाला… पण मला सर्वात आवडला तो, तो बाणेदार मुलगा. अशी संस्कारी मुलं अजून आहेत हे आशादायक आहे.”
हे ऐकून दामिनीने चक्क मोबाइल आपटला, फेकला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. कार्यक्रम संपायला १५ मिनिटं बाकी असतांना दामिनीने नृत्यनटिकेची कल्पना मांडली होती. एकच जल्लोष झाला. पण तो मुलगा… तो म्हणाला,
“हा कार्यक्रम नक्की छान होईल. मलाही बघायला आवडलं असतं. पण निर्धारित वेळेत हा संपणार नाही. माझी आई आजारी असते. तिच्या औषधांच्या वेळा चुकून चालत नाही. तुम्ही सगळे मस्त मजा करा. मी निघतो.”
सगळे प्रशिक्षणार्थी एकाच बसमधून आलेले असल्याने आता कार्यक्रम रद्द होतो की काय असं दामिनीला वाटलं. पण उपस्थित वरिष्ठांनी त्या उपटसुंभाला स्वतःची लॅम्बोर्घिनी चालकासहित दिली. चालक परत येऊन वरिष्ठांना घेऊन जाणार होता. कार्यक्रम छानच झाला पण तो मुलगा तिच्या डोक्यात गेला. आई नेमकं त्याचंच कौतुक करत होती.
काही दिवस गेले असतील. कंपनीच्या अंतर्गत संदेशयंत्रणेवर त्याच मुलाचा संदेश आला.
‘थोडं बोलायचं होतं. कॉल?’
दामिनीने प्रतिक्षिप्तपणे श्रावकपट्टी डोक्यावर चढवली. पण तेवढ्यात मनातल्या बदल्याच्या भावनेने बुद्धीला झाकोळलं.
‘मी महत्वाच्या मीटिंगमधे आहे’ तिचं उत्तर.
‘मीटिंग संपली की कळव. फक्त २ मिनिटं लागतील.’
दुसर्या दिवशी संध्याकाळी तो परत, ‘ठीक आहे मॅडम, तुम्हाला बोलायचं नसेल तर मी इथेच विचारतो.’
शाळेमधे असतांना दामिनीला मॅडम नावाने चिडवलं जायचं. वेगळ्या गावच्या ह्या मुलाला ते माहिती असायचं कारण नव्हतं पण दामिनी चिडलीच. तिने उत्तर लिहून टाकलं, ‘मी आजचं काम संपवत होते. नंतर बोलू.’
तिसर्या दिवशी परत त्याचा संदेश, ‘मॅडम, मी सर्व प्रशिक्षणार्थींच्या जन्मतारखेची यादी करतो आहे. कृपया तारीख कळवा.’
‘मी कळवू शकत नाही.’
त्याने एकदम कॉल लावला. दामिनीकडून तो स्वीकारला गेला.
“हॅलो मॅडम, मला….”
“नाही म्हणाले ना? परत कॉल करू नको.” म्हणत दामिनीने कॉल संपवला! थोड्या वेळाने तिला आपल्याच वागण्याची गम्मत वाटली. तरीही ‘जरा मजा करूया याची.. ‘ म्हणत, त्यांच्या संदेशांचे स्क्रीनशॉट ‘नैतिक सदाचरण समिति’ला पाठवून तक्रार दाखल केली. त्याला ताकीद देऊन सोडून देतील अशी तिची समजूत होती.
ह्या समितीत निवृत्त पोलिस अधिकारी, कायदेतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, महिला आयोग सदस्य, कंपनीतले वरिष्ठ व्यवस्थापक आणि मनुष्यबळ अधिकारी होते. दोघांच्याही सुनावण्या सुरू झाल्या. ‘खाजगी माहितीसाठी तगादा लावून मुलीला नको असलेली जवळीक साधायचा प्रयत्न’ असा आरोप होता. त्या मुलाचं म्हणणं होतं की त्याच्या साहेबांनी त्याला सर्व प्रशिक्षणार्थींची यादी करून जन्मतारखेला शुभेच्छा द्यायचं काम दिलं होतं. हे तोंडी सांगितलेलं होतं, त्यामुळे त्याचा पुरावा त्याच्याकडे नव्हता. मध्यंतरीच्या कालावधीत साहेबांचं अपघाती निधन झालं त्यामुळे त्यांच्याकडूनही खात्री करून घेता येत नव्हती. त्या मुलाने अन्य कोणाला जन्मतारीख विचारली नव्हती ही बाब त्याच्या विरोधात जात होती. पण त्याचा बचाव होता की इंग्रजी मुळाक्षरांप्रमाणे दामिनीचं नाव यादीत दुसरं होतं. पहिलं नाव अंजली. ती शाळेपासूनची वर्गमैत्रीण असल्याने त्याला तिची जन्मतारीख माहिती होती. दामिनीने त्याला नकार दिला. नंतर साहेबच गेले म्हणून त्याने मोहीम थांबवली.
हे कळल्यावर दामिनी चरकली. पण आता माघार घेतली तर तिच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता. तिने समितीला सांगितलं की फोनवर त्याने तिला आणखी खाजगी माहिती विचारली आणि काही गैरशब्द वापरले. कोणते ते सांगायला तिने नकार दिला. त्या मुलाने सांगितलं की तो फक्त ‘हॅलो’ म्हणाला, त्यानंतर संपर्क तोडेपर्यंत दामिनीने त्याला बोलायची संधीच दिली नाही. यात खरं-खोटं करणारा साक्षीदार किंवा ध्वनिमुद्रण उपलब्ध नव्हतं. सगळ्या बाबींचा विचार करून समिती मुलगा दोषी आहे असा निष्कर्श काढू शकली नाही. पण शंकेला जागा आहे असं समितीत बहुमत झालं. अशा प्रकरणांमधे संबंधित मुलाला नोकरीवरून डच्चू देण्याची तरतूद कंपनीच्या नियमावलीत होती. हे कळल्यावर दामिनीला धक्का बसला. एकदा तक्रार झाली की शिक्षा नियमावलीप्रमाणेच होते. तक्रारदाराच्या इच्छेमुळे त्यात सूट मिळू शकत नाही असं तिला सांगण्यात आलं. मजा या थराला जाईल असं तिला वाटलं नव्हतं. पण या प्रकरणात दोष सिद्ध झालेला नसल्याने त्या मुलाला डच्चू न देता फक्त त्याचा प्रशिक्षणकालावधी एक वर्ष लांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अटळपणे त्या मुलाच्या स्वाभिमानाला धक्का बसला आणि वैफल्यग्रस्त होऊन तो नोकरी सोडून निघून गेला. दामिनीला त्याची आजारी आई आठवली. मित्रमैत्रिणींच्या मदतीने तिने त्याचं घर शोधलं. तर त्याची आई वारली आणि तो ती जागा सोडून गेल्याचं कळलं. दामिनीने जंग जंग पछाडून त्याचं मूळ गावही शोधलं, पण तो तिथूनही निघून गेला होता.
परत आल्यावर दामिनीने आठवड्याभराची रजा टाकली. तिला जेवण जाईना झालं. शाळा-महाविद्यालयापासून तिने समाजकार्य म्हणून विरुद्ध तक्रार केलेल्या मुलांची तिने माहिती काढली. यातल्या खर्या तक्रारी वगळता काही प्रकरणांमध्ये तिने निष्पाप मुलांना कायद्याच्या जाळ्यात ओढलं होतं. आता धक्कादायक माहिती समोर आली. ही मुलं उध्वस्त झाली होती. कोणाची शैक्षणिक प्रगति खुंटली होती. कोणाला असा कलंक लागल्याने नोकरी मिळत नव्हती तर कोण सराईत गुन्हेगार झाले होते. कोणाला वेड लागलं होतं. डॅशिंग दामिनीची प्रतिमा तयार होतांना हे बळी गेले होते.
तिने अचानक राजीनामापत्र पाठवून दिलं. तिने राजीनामा देऊ नये म्हणून तिच्या वरिष्ठांनी प्रयत्न केले. शेवटी नैतिक सदाचरण समितीचे एक सदस्य तिला भेटायला आले. कंपनीतल्या प्रकरणात त्या मुलाचा हेतू वाईट दिसत नाही आणि सामोपचाराने मिटवता येईल असा प्रस्ताव त्यांनी दिला होता. पण मुलाने केलं ते सहेतूक नाही याचाही काही पुरावा नाही आणि मुलगी ठाम आहे हे मुद्दे समितीतल्या महिला सदस्यांनी लावून धरले. हा महिलाहक्क संबंधित मुद्दा असल्याने महिला सदस्यांच्या बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्यात आला होता.
‘राजीनाम्यानंतर दामिनी काय करणार?’ यावर ती म्हणाली की ती आता आत्मपरिक्षण करणार आहे आणि मग सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिते. दामिनीच्या वरिष्ठांनी तिचं खूप कौतुक केलं आणि तिने नोकरी न सोडता हे करावं असा प्रस्ताव दिला. तिने या तिच्या नवीन उद्दिष्टांना वेळ द्यावा आणि रोज ठरावीक वेळ तिचं कंपनीचं नियोजित कामही करावं. खाजगी नोकरीत अधिकचं काम न केल्याने तिला बढत्या देता येणार नाहीत पण तिची नोकरी कायम ठेवतील असं त्यांचं म्हणणं होतं. आई आणि उपस्थित सर्व वडीलधार्यांनी याला दुजोरा दिला आणि तिची दोन्ही आघाड्यांवर वाटचाल सुरू झाली.
आधी तिने स्वतः कंपनीमार्फत चालणार्या समुपदेशनाचा लाभ घेतला. समानता हा विषय आपण चुकीच्या पद्धतीने पहात होतो हे तिला कळून आलं. त्यानंतर तिने सामाजिक कायदा, गुन्हेकायदा अशा पदव्या घेतल्या. मानसोपचार आणि समुपदेशन यातलं प्रशिक्षण घेतलं. खाजगी उद्योगांमध्येही आरोपीची शिक्षा ठरल्यावर ती ठोठावण्याआधी त्याच्यावर अन्याय होत नाहीये ना हे तपासून अहवाल सादर करणारं उलटतपासणीचं एक पद नैतिक सदाचरण समितीमध्ये असावं असा आग्रह तिने धरला. तिच्या या कर्तुत्वावर वरिष्ठांचं लक्ष होतंच. ती आता नैतिक सदाचरण समितीची सदस्य होती. कंपनीत आणि समाजातही अनेक तरुण-तरुणींना तिने अन्याय्यपणे सावज बनण्यापासून वाचवलं. पण ती शोधत होती त्या मुलाला… त्याला, ज्याच्यावर ती अपरिपक्व असतांना विनाकारण केलेल्या तक्रारीमुळे अन्याय झाला होता… आणि तो तिला कधीच भेटणार नव्हता. तो भेटेपर्यंत ती अशीच अविरत झगडणार होती. सगळी मुलं मुलींना पीडा द्यायला आणि सगळ्या मुली त्यांच्याशी समानतेचं युद्ध करायला घरातून बाहेर येत नाहीत. युद्ध नसतांना शस्त्र परजायची नसतात, हा आईचा संदेश नव्या पिढीला पटवून देत रहाणार होती.
आज उंच माझा झोका पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायक्षेत्रात यशस्वीपणे, जिद्दीने भरारी घेणाऱ्या आणि त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक महिलांचा सत्कार होणार होता. पुरस्कार मिळाल्याबद्दल दोन शब्द सांगताना, दामिनीचा हा जीवनपट तिच्या मनःचक्षुंसमोरून तरळून गेला.
