— रसिका राजीव हिंगे —
चला चला रे सवंगडयांनो
गंमत करु या अवघी सारी
अभ्यासाला देऊ विश्रांती
आली सुट्टी अपुल्या द्वारी
अशीच गंमत करणारे, स्वच्छंदी बालपण शोधण्याचे प्रयत्न करतांना काय हरवले, काय गवसले, याचा विचार करतच सुट्टीचे आत्मवृत्त लिहिलेले लेख वाचले. जाणिवेच्या अल्याड आणि पल्याड केलेले सुटीचे मंथन खरोखरीच विविध साहित्यरत्ने देणारे आहेत.
सुट्टीची खादाडी म्हणजे तर खरेच प्रत्यक्ष अन्नपूर्णा आली तर अव्याहतपणे सुरू राहील की काय असे वाटते. कोरोनामुळे या खादाडीशी चांगलीच गट्टी जमली.
मुले म्हणजे काय घाण्याला जुंपलेले बैल वाटतात की काय न जाणे. प्रत्येक क्षेत्रात अव्वल असावयास हवे असा अट्टहास धरणारे पालक अन त्यावर भाष्य करणारे हे प्रतिभासंपन्न लेखक. एकाच विषया भोवती फिरतांना वेगवेगळे शब्दांचे पदर असे काही उलगडत गेले की त्या पदराचा रेशीम स्पर्श विचार करायला भाग पाडत आहे. कुठे चालले बाल्य!
झुकूझुकूझुकू आगीनगाडी ह्या गीताचे बोल कानात गुंजारव करू लागले प्रवास एक गंमत वाचतांना. सुट्टी लागली की ही आगीनगाडी मामाच्या गावाला घेऊन जायची. भारीच मजा येते न. मग तो प्रवास मुलांच्या संगतीचा असो, लोकल मधून रोजचाच असो, की हरिहराचा असो, सगळेच जीवन प्रवास भासावेत असेच.
साहित्योन्मेषने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जे सुंदर कार्यक्रम आयोजित केले ते पहायला मिळाले असते तर…. अहाहा! नियमित सदरे तरी त्यातही विविधता आहेच.
बारा महिने बारा लेख ही स्पर्धा म्हणजे खरोखरच लेखणीचा कस लागतो आहे. प्रतिभेची देणगी लाभलेले इथले लेखक लेखिका आहेत. त्यामुळे दर महिन्याला उत्सुकता असते या महिन्यात काय काय छान वाचायला मिळेल. “जे जे ठावे आपणासी ते ते द्यावे इतरांसी” या न्यायाने साहित्योन्मेषच्या टीमने प्रतिभासंपन्न साहित्य संकलित करून अभिजात साहित्याचे दालनच उघडले आहे जणू, या स्पर्धेच्या निमित्ताने. खरोखरच मनःपूर्वक आभार साहित्योन्मेषचे. या स्पर्धेत सहभागी झाल्याचे खूप समाधान आहे. साहित्योन्मेषचा स्तुत्य उपक्रम.
