पत्रलेखन 

— शिल्पा धर्माधिकारी —

                             ||श्री||

तारीख: २५/५/२०२२

प्रिय निसर्गा,

 स.न.वि.वि.

माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटत असेल ना? हिला अचानक माझी आठवण कशी आली असा विचार तुझ्या मनात आला असेल ना?  पण कारणच मुळी तस काहीसं घडलं.  

मागच्या आठवड्यात जवळपास रोजच पाऊस आपली हजेरी लावत होता. एक दिवस अचानक आलेल्या पावसाच्या सरीने   भिजणारे कपडे  काढण्यासाठी मी बाल्कनीकडे धाव घेतली.  सहजच अवतीभवती नजर फिरवली आणि निसर्गा, तुझ्या बदललेल्या स्वच्छ, चित्ताकर्षक रूपाकडे मी बघतच राहिले.  हिरवागार रंग ल्यायलेलं तुझं मोहक रूप,  पानावरील ओघळणारे पावसाचे थेंब, अजूनच आकर्षित दिसणारे फुलांचे रंग, मन मोहून टाकत होते. छोटी मुले पावसात भिजत, साचलेल्या पाण्यात उड्या मारत होती, पावसाचा आनंद लुटत होती. हे सगळे पाहून मला तीव्रतेने जाणवले की आज कैक दिवसांनी मी स्वस्थ्य, मुक्त मनाने तुला न्याहळत होते. रोजच्या यांत्रिक जीवनात तू नियमाने घातलेली साद मला कधी ऐकूच आली नाही. पण आज अचानक का होईना ती माझ्या कानावर पडली.  पावसामुळे तुझ्या बदललेल्या स्वच्छ सुंदर आणि अजूनच मोहक रूपाने माझ्यावर मोहिनी घातली. नेहेमीच मुक्तहस्ताने लयलूट  करणार्‍या  तुझ्या उदात्ततेची पुन्हा एकदा साक्ष मिळाली.  तुझ्याशी संवाद साधावा आणि तुझ्यातील  उत्साहाची, तुझ्यातील गुणांनी माझी ओंजळ भरून घ्यावी अशी तीव्र इच्छा झाली. म्हणूनच हा पत्राचा घाट.  असो. 

 खरंतर तुझं अस्तित्वच आमच्या जीवनाला, जगण्याला आणि असण्याला कारणीभूत आहे.  आम्ही  तुझाच अविभाज्य घटक आहोत.  कारण जे मनुष्य निर्मित नाही ते म्हणजे निसर्ग अशी साधी सरळ तुझ्या विषयीची व्याख्या आम्ही शाळेत शिकलो.

 तुला माहितीये, शाळेमध्ये असताना निसर्गचित्र काढायला सांगितलं की प्रत्येकजण प्रत्येकाला दिसलेला निसर्ग कागदावर रेखाटायचा.  कुणाच्या चित्रात निळे आकाश, त्यात उडणारे पक्षी,  डोंगर, दोन डोंगरांमध्ये केशरी सूर्य, डोंगरावरची झाडे , डोंगर पायथ्याशी वाहणारी नदी , नदीकाठी नारळाची झाडे, एखादे कुंपण असलेले कौलारू घर असे चित्र रेखाटायचे, तर कुणी बागेमध्ये फुलावर गुंजारव घालणारे रंगीत फुलपाखरू काढायचे तर कुणी अथांग निळ्या समुद्रात मध्यावर असलेली वार्‍यावर फडफडणार्‍या शिडाची नाव काढायचे तर  कुणी पडणार्‍या पावसात आकाशात दिसणारा सुंदर इंद्रधनुष्य कागदावर उतरवायचे.  त्यावरून लक्षात येतं, निसर्गा  तुझ्या विषयीची प्रत्येकाची परिभाषा किती वेगळी पण तितकीच मोहक. आणि तरीही त्या प्रत्येक चित्रात तू आहेस. केवढी ही तुझी व्यापकता. 

सूर्य, चंद्र, तारे, नद्या, समुद्र, डोंगर, झाडे, पाने, फुले वाहणार वारा त्या वार्‍याबरोबर पसरणारा फुलांचा मंद सुगंध, कधी पावसाच्या सरीमुळे तयार होणारा मृदगंध.  ही सारी तुझीच तर रूपे.  निसर्गा,  तू आमच्या तनामनात ठसलेला,  वसलेला  आहेस.  खोल खोल रुजलेला आहेस.

सौंदर्यदृष्टीचं वरदान मिळालेले भाग्यवंत आम्ही. आम्हाला तू तुझ्या सौंदर्यानं स्तिमित केलेस. तुझ्या सौंदर्यावर आम्ही कायमच भाळलो. तुझ्या दातृत्वाने आम्ही कायमच भारावून गेलो. 

आपल्या नियमक्रमाशी एकनिष्ठ असलेल्या तू निसर्गा, अगदी बालपणापासून कित्ती कित्ती वेगवेगळ्या स्वरूपात आम्हाला दिसलास, भेटलास.   

बालवयात छोट्या इवल्याशा डोळ्यात हिरव्या गालिच्यावर खेळणाऱ्या फुलराणी  रूपात तू आम्हाला भावलास. तरुण वयात वार्‍यावर झुलणार्‍या  अल्लड फुलाबरोबर स्वप्नांच्या  झुल्यावर झोका घ्यायला तू शिकवलं.  प्रेमात रंग भरताना, संधीकाली प्रियकाराला भेटताना त्या धुंदलेल्या दिशांच्या रंगामध्ये तूच तर होतास. आमचं आयुष्यचमुळी  तुझ्या भोवती  कळत नकळत पिंगा घालत असतं.  नाही नाही, खरंतर तुझ्या हातात हात घालूनच तर आम्ही आयुष्य जगतो. 

रंगांची उधळण करत सूर्योदयाचा सोहोळा करणारा तू,  ऊन पावसाच्या खेळात आकाशात दिसणारा इंद्रधनुष्य तू,  प्रत्येक ऋतूमध्ये अचंबित करणारी तुझी मोहक रूपं.  वसंतऋतूमधील नवीन पालवीने परत एकदा आकाराला येणारी झाडे तू,  कोकिळेचा कुहू कुहू आवाजाने सारा आसमंत दुमदुमून टाकणारा तू  , वैशाखामध्ये आकाशावर विविध  रंगी  फुलांचे नक्षीकाम करणारा तू. कित्ती कित्ती म्हणून तुझ्या सौंदर्याचे वर्णन करावे.  नदीच्या पाण्यात खळखळाट करत स्वच्छंद वाहणारी जलधारा ही तू, आणि योगी पुरुषाप्रमाणे संथ, शांत, धीर गंभीर सागरही तू आणि  भरती ओहोटीची समुद्राची वेगळी रूपही तूच. फुलांचा सुगंध वाहणाराही तूच , पावसाच्या खुणा देणारा मृदगंध ही तूच. 

खर सांगू, तुझं सौंदर्य जेवढे भुरळ पाडणारे आहे तितकीच तुझी शिकवणंही.

पावसामध्ये जेव्हा ही सृष्टी नाहते तेव्हा तुझे पाचूसारखं हिरवकंच बनलेलं देखणं,  नवनव्हाळ रूप  पाहताना मला नेहेमीच असे वाटते की, प्रत्येकाने  मनावर साचलेली धूळ, असलेलं ओझं,  डोळ्यात दाटलेल्या पावसावाटे मोकळ करावं.  पुन्हा एकदा हलक्या झालेल्या  मुक्त आणि स्वच्छंद मनाने जगावं. नवीन मनमोकळ्या रूपात स्वतःला आणि जगाला बघावं.  

हिवाळ्यातील थंडीमध्ये तू जसा प्रत्येक जीवाला स्वतःच्या कोशात जायला लावतोस, त्याचप्रमाणे आम्हीही आयुष्यात अंतर्मुख होऊन स्वतःचं  आत्मपरीक्षण करण्याला वेळ देणं गरजेचं आहे हेच तर तू त्यातून प्रतीत करतोस.

झाडांची होणारी पानगळ आणि नंतर फुटणारी पालवी ह्या साऱ्यातून आम्हाला वाईट विचार, आठवणी झटकून नव्या उमेदीचे, विचाराचे कपडे ल्यायला  तर तू सांगत नाहीस ना असं मला वाटते. 

निसर्गा, तू आम्हाला जेवढा भरभरून देतोस,  तितकच भरभरून आम्ही दुसर्‍याला द्यावं,  आनंदाची उधळण आणि देवाणघेवाण करत रहावं हेच  तर तुझं यातून आम्हाला सांगणे आहे ना? 

मला माझी आई नेहेमी सांगायची,  “निसर्ग हा जशी सौंदर्यची खाण आहे तशीच आयुष्य कसं जगावं ह्याची शिकवण देणारी शाळादेखील आहे.  त्याच्या प्रत्येक रूपात एक शिकवण दडली आहे.  अंधारातून उजेडाकडे नेणारा,  केवळ ध्येयाची, सकारात्मकतेची दिशा  दाखवणारा सूर्य, आपल्या शांत वृत्तीने  शीतलता देणारा चंद्र, मनाची उदात्तता आणि मोठेपणा सांगणारं आभाळ , अनेक वादळात कणखरपणे उभा असलेला पर्वत, निर्मळ मनाची प्रतिमा देणारी नदी,  विचारांची खोली कशी असावी हे सांगणारा  अथांग सागर, विचाराची व्याप्ती कुठपर्यंत असावी याचे मोजमाप सांगणारं ते क्षितिज.  बेटा जेव्हा हे तू सारं समजून घ्यायला लागशील तेव्हाच तू ह्या निसर्गाचा एक सच्चा भाग असल्याची तुला जाणीव होईल.”

निसर्गा तुझ्या आमच्यावरील अनंत उपकारांना केवळ शब्दात मांडण्यासाठी माझी ही लेखणी किंवा शब्दसंग्रह देखील अपुराच आहे. 

पंचमहाभुतांनी व्यापलेल्या 

चराचर सृष्टीचे नीज रूप तू. 

सृष्टीचा लेवून भरजरी शेला

सौंदर्याची खाण तू.

श्वासात तू आमुच्या वासात तू

चराचरातील संजीवन तू.

अविरत जीवनक्रमाचा ध्यास तू .

जपावे पुजावे असे उदात्त दिव्य रूप तू.

निसर्गा, अश्या तुझ्या भव्य दिव्य रूपाला माझा सादर प्रणाम!

तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायमच राहू दे. 

तुझी कृपाभिलाषी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *